चिखलोली धरणाचे पाणी पिण्यायोग्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jul-2018
Total Views |



अंबरनाथ: चिखलोली धरणातील पाणी आता पिण्यायोग्य असल्याचा अहवाल जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेने दिला असल्याने या धरणातील पाणी लवकरात लवकर नागरिकांना उपलब्ध करून द्यावे, असे आदेश आ. डॉ. बालाजी किणीकर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण खात्याच्या अधिकार्‍यांना दिल्या.  डॉ. किणीकर, नगराध्यक्षा मनिषा वाळेकर, नगरपालिका पाणीपुरवठा समिती सभापती संदीप भराडे आदींनी चिखलोली धरण आणि शहरातील वाढीव पाणीपुरवठा योजनेतील फुलेनगर, नारायण नगर येथील जलकुंभांना भेटी दिल्या.

 

अंबरनाथ शहराच्या शिवाजीनगर ,वडवली, महालक्ष्मीनगर आदी परिसराला पाणीपुरवठा करणार्‍या चिखलोली धरणाचे पाणी प्रदूषित झाल्याच्या घटनेमुळे नागरिकांना त्रास झाला होता, धरणातील पाणी प्रदूषित असल्याचा निष्कर्ष आला आणि नंतर या धरणातील पाणी पिण्यासाठी देऊ नये, असे सूचित करण्यात आले होते. जलसंपदामंत्री सदाभाऊ खोत यांनी अंबरनाथला भेट देऊन चिखलोली धरणाची पाहणी केली होती आणि पाणी प्रदूषित करणार्‍या कंपन्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश पाणी खात्याच्या अधिकार्‍यांना दिले होते. या धरणातील पाण्याचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यानंतर ३० जून रोजी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा, ठाणे यांनी चिखलोली धरणातील पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवाल दिला आहे.

 

आरोग्य प्रयोगशाळेच्या अहवालानुसार चिखलोली धरणातील पाणी नागरिकांना त्वरित उपलब्ध करून द्यावे, असे आदेश डॉ. किणीकर यांनी पाणी खात्याच्या अधिकार्‍यांना दिले. बांधून पूर्ण झालेल्या जलकुंभांचे उद्घाटन लवकरच करण्यात येईल, अशी माहिती आ. डॉ. किणीकर यांनी दिली. माजी नगराध्यक्ष विजय पवार, नगरसेवक सुभाष साळुंके, निखिल वाळेकर, पद्माकर दिघे, तसेच पाणी खात्याचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

@@AUTHORINFO_V1@@