भाजपा कार्यकर्त्यांचा ‘मिशन ५० प्लस’ चा निर्धार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jul-2018
Total Views |

नेत्यांचीही युतीबाबत दोलायमान स्थिती, पर्यायांची होतेय चाचपणी


जळगाव :
भाजपा-खाविआचा युतीचा निर्णय काहीही होवो. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मात्र, ‘मिशन ५० प्लस’ पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी अनेक पर्यायांची चाचपणी केली जात असून, युती झाल्यास ५० टक्के सुत्रानुसार जागा वाटपावर कार्यकर्ते ठाम आहेत. तसेच युतीऐवजी खाविआनेच भाजपात विलीन व्हावे, असा सूरही आता उमटू लागला आहे. ना. गिरीश महाजन व माजीमंत्री सुरेशदादा जैन यांनी युतीचे संकेत दिले असले, तरी त्यास कार्यकर्ते तयार नाहीत. उमेदवारांच्या मुलाखती होऊन गेल्या, गुरुवारी अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शनवर्ग झाला. एक-एक टप्पा पार पडत आहे मात्र, भाजपाचे अनेक कार्यकर्ते युतीविरोधातील आपली भूमिका सोडण्यास तयार नाहीत. पक्षाने जळगाव महापालिका ताब्यात घेण्यासाठी आखलेले ‘मिशन ५० प्लस’ कोणत्याही स्थितीत पूर्ण करण्याचा त्यांचा निर्धार आहे.
 
 
युतीसंदर्भात नेत्यांचा हट्ट कायम राहिल्यास रणनीती काय असावी? हेही ठरविण्यात आल्याचे कळते. महापालिकेत जागा ७५ आहेत. युतीधर्मात जागा वाटपाचे सूत्र ५०-५० टक्के राहिले पाहिजे. त्यानुसार ३७ ते ३८ जागा भाजपाला देण्यात याव्यात. युतीसाठी एवढा खटाटोप करण्यापेक्षा खाविआच युतीमध्ये विलीन करावी. म्हणजे पुढील धोके टळतील, असा सूरही कार्यकर्त्यांमध्ये ऐकायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी भाजपातर्फे इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यावेळी मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून वरिष्ठ नेतेही युतीबाबत दोलयमान स्थितीत असल्याचे एका कार्यकर्त्याने ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
 
विधानसभा-लोकसभा निवडणुकीत धोका
युतीच्या माध्यमातून महापालिका निवडणूक लढविली गेल्यास लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाचे नेते काय भूमिका घेतील? असा प्रश्‍न अन्य एका कार्यकर्त्याने ‘तरुण भारत’शी बोलताना उपस्थित केला. शिवसेना राज्य व देशपातळीवर भाजपाशी युती करण्यास तयार नाही. त्यांनी स्वबळावर या दोन्ही निवडणुका लढविल्यास भाजपा त्यांच्या विरोधात मैदानात उतरेल का? जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ आणि महापालिका कार्यक्षेत्र एकच आहे. खाविआ आणि शिवसेना एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे युती न झाल्यास नेमक्या याच मतदारसंघात भाजपाला आपल्याच मित्रांविरोधात लढावे लागेल. आता युती आणि भविष्यात विरोध अशा विचित्र स्थितीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांची मनस्थिती काय असेल? याचा विचारही नेत्यांनी आजच करणे आवश्यक असल्याचे हा कार्यकर्ता म्हणाला.
 
भाजपा उमेदवारांना मार्गदर्शन
भाजपा उमेदवारांना अर्जभरणा व कायदेविषयक अन्य बाबींबाबत गुरुवारी जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष आ. सुरेश भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शन करण्यात आले. यंदापासून ऑनलाईन प्रक्रिया आहे. त्याची माहिती देण्यात आले. अर्जा कसा भरावा, कायदेशीर तरतुदी व नियमांची माहिती कायदा आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी दिली. याप्रसंगी विशाल त्रिपाठी, सरचिटणीस दीपक सूर्यवंशी, महेश जोशी, जळगाव महानगर उपाध्यक्ष सुभाषतात्या शौचे, बापू ठाकरे, जनसंपर्क प्रमुख मनोज भांडारकर, कार्यालयमंत्री दत्तात्रय जाधव, शोभा कुलकर्णी, जयश्री पाटील, कायदे आघाडीचे ऍड. आनंद मुजूमदार, ऍड. उमेश पाटील, ऍड. दीपकराज खडके, ऍड. अविनाश पाटील आदी उपस्थित होते.
 
@@AUTHORINFO_V1@@