मदर तेरेसांच्या संस्थेत सेवेच्या नावाखाली नवजात अर्भकांची विक्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jul-2018
Total Views |


झारखंडमधील धक्कादायक प्रकार; गुन्हा दाखल-चौकशी सुरु

चार नन्सला घेतले ताब्यात

रांची: व्हॅटिकन सिटीने संत उपाधी दिलेल्या नोबेल पुरस्कार मिळालेल्या ख्रिस्ती धर्मप्रसारक मदर तेरेसा यांच्या मिशनरीज ऑफ चॅरिटी संस्थेवर नवजात अर्भकांच्या चोरी, अपहरण आणि विक्रीचा आरोप लावण्यात आला आहे. झारखंडची राजधानी रांची येथून या प्रकरणी दोन नन्सना बेड्या ठोकण्यात आल्या असून रांचीचे डीएसपी श्यामानंद मंडल यांनी या नन्सनी चार बालकांची विक्री केल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे.

 

राज्याच्या बालकल्याण समितीच्या प्रमुख रुपा वर्मा यांनी या प्रकरणी मिशनरीज ऑफ चॅरिटीविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर बालकल्याण समितीने नवजात बालकांना चॅरिटीमधून आपल्या ताब्यात घेतले. सध्या या बालकांना अन्य एका संस्थेत ठेवण्यात आले आहे. श्यामानंद मंडल यांनी याबाबत सांगितले की, आणखी काही अर्भकांचीदेखील अवैधप्रकारे विक्री केल्याची गोष्ट समोर आली आहे. त्या अर्भकांच्या मातांची नावेही पोलिसांना मिळाली आहेत. आता त्यांची चौकशीही करण्यात येणार आहे.

 

पोलिसांनी मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या केंद्रावर छापा मारुन एक लाख ४८ हजार रुपयेदेखील हस्तगत केले. पोलिसांचे म्हणणे आहे की, अटक केलेल्या आणि कारागृहात टाकलेल्या महिला कर्मचार्यांनी अर्भकांच्या विक्रीची गोष्ट स्वीकारली आहे. पोलिसांनी अशीही शंका व्यक्त केली की, अशा प्रकारे अर्भकांची विक्री करण्यामागे एखादी मोठी टोळीदेखील सक्रीय असू शकते. १४ दिवसांच्या एका नवजात अर्भकाला एका जोडप्याला एक लाख २० हजार रुपयांत विक्री केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. बालकल्याण समिती आणि पोलिसांचे म्हणणे आहे की, मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या महिला कर्मचार्यांनी चौकशीदरम्यान ही माहिती दिली. महिला कर्मचार्यांनी सांगितले की, या पैशांतील ९० हजार रुपये एका सिस्टरला दिले गेले. दरम्यान, भाजपचे खासदार समीर उरांव आणि भाजपच्या अनुसूचित जाती-जमाती मोर्चाचे अध्यक्ष रामकुमार पाहन यांनी एका पत्रकाद्वारे म्हटले की, सेवेच्या नावावर चालणार्या झारखंडच्या मिशनर्यांच्या काळ्या कारवाया आता उघड होत आहेत.

 

काय आहे प्रकरण?

मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या कर्मचार्यांनी उत्तर प्रदेशच्या सोनभद्र जिल्ह्यातील एका जोडप्याला एक लाख २० हजार रुपयांत १४ दिवसांचे मूल विकले. पण काही दिवसांनी चॅरिटीने विकलेले मूल पुन्हा आपल्या ताब्यात घेतले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने या जोडप्याने रांचीच्या बाल कल्याण समितीकडे मदर तेरेसांच्या संस्थेविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर अनिमा इंदवार या ननला अटक करण्यात आली. ती मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या निर्मल हृदय संस्थेत काम करते. चॅरिटीतर्फे अविवाहित मातासांठी आश्रय गृह चालवले जाते. या आश्रय गृहातील एका महिलेच्या पोटी जन्माला आलेले मूल विकल्याचा आरोप आहे.

@@AUTHORINFO_V1@@