मनसेकडून यंदाही आंदोलनात्मक करमणूक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jul-2018
Total Views |



 

डोंबिवली : ‘नेमेचि येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणेच डोंबिवलीत मनसेने यंदाही खड्ड्यांच्या समस्येबाबत आंदोलन छेडले होते. मात्र दरवर्षी मनसेकडून करण्यात येणारे आंदोलन हे आंदोलन राहिले नसून डोंबिवलीकरांसाठी तो करमणुकीचा विषय ठरत असल्याची चर्चा शहरात आहे.
 

खड्डेमय रस्त्याच्या निषेधार्थ गेल्या वर्षी मनसेच्या वतीने झंडू बाम आंदोलन, तसेच खड्ड्यांचे प्रदर्शन व प्रतिकात्मक गणपतीच्या माध्यमांतून खड्डे बुजविण्यात आले होते. तसेच दोन महिन्यांपूर्वी एमआयडीसीच्या नादुरुस्त रस्त्यांबाबत आंदोलन छेडण्यात आले होते. मात्र, हे रस्ते आजही याच परिस्थितीत आहेत. याच धर्तीवर लोकमान्य टिळकांची वेशभूषा करत पालिकेला मनसेकडून जाब विचारण्यात आला. मनसेची अनोखी आंदोलने ही परिणामशून्य असून त्यातून केवळ शहराच्या रस्त्यांवर मनसैनिकांची नाटुकली सादर होते. त्यामुळे समस्याग्रस्त डोंबिवलीकरांना तेवढाच विरंगुळा मिळत असल्याचे मत सुजाण नागरिकांचे आहे. महापालिकेच्या सर्व रस्त्यांवर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. कहर म्हणजे महिन्याभरापूर्वी दुरुस्ती केलेले टिळक पुतळा ते मंजुनाथ विद्यालय रस्ता, उद्योगनगर रस्ता हे रस्ते पूर्ण वाहून गेले आहेत. प्रशासनाच्या या कारभाराचा जाब विचारण्यासाठी महापालिकेचे डोके ठिकाणावर आहे का?, असे फलक झळकविण्यात आले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, शहर अध्यक्ष मनोज घरत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले व टिळकांच्या वेशामध्ये निलेश कानेटकर आणि मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे आता तरी या आंदोलनाचा प्रभाव पडेल का व रस्ते सुधारतील का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. मात्र, यावेळी मनसेचे विरोधी पक्षनेते मंदार हळबे व गटनेते प्रकाश भोईर यांनी मारलेली दांडी चर्चेचा विषय ठरली होती.

@@AUTHORINFO_V1@@