कपाळावर कुंकू, हातात बांगड्या!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

मुलींनी कपाळावर कुंकू लावू नये, हातात बांगड्या भरू नयेत, असा फतवा काढणार्‍या शाळांविरुद्ध पालक तक्रारी करतात. प्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा देतात. याची एक दिवस बातमी येते आणि नंतर सर्वकाही शांत. हा असा फतवा काढणार्‍या शाळा ख्रिश्चन मिशनरीजच्या असतात आणि या तक्रारी, या शाळेत आपली पाल्ये टाकण्यात प्रतिष्ठा आणि अभिमान बाळगणार्‍या पालकांच्या असतात. ही सर्व पालकमंडळी मध्यम व उच्च मध्यमवर्गातीलच असतात. या वर्गातील लोकांचे एक वैशिष्ट्य म्हणजे, ते प्रवाहासोबत वाहवत जातात. प्रवाहासोबत राहिले नाही तर जग काय म्हणेल, समाज काय म्हणेल, शेजारी काय म्हणतील याची या मंडळींना अतिशय काळजी असते. शेजार्‍या-पाजार्‍यांनी, मित्र-मैत्रिणींनी आपले कौतुक करावे, आपल्याला आधुनिक आणि पुढारलेले म्हणावे, यासाठीच या लोकांची सतत खटपट सुरू असते. प्रकरण एवढ्यावरच थांबत नाही. हीच मंडळी मग धर्म, संस्कृती, परंपरा, मातृभाषा यांचा र्‍हास होत आहे, म्हणून तावातावाने भांडतानाही दिसतात. धर्मादी परंपरांचे जतन करण्याचे काम जणूकाही आपले नाहीच, अशा गुर्मीत ही मंडळी वावरत असतात. ते काम विशिष्ट लोकांनीच केले पाहिजे. समाजसेवा विशिष्ट लोकांनीच केली पाहिजे. लोकशाहीचे रक्षण विशिष्ट लोकांनीच केले पाहिजे. भ्रष्टाचारविरहित राज्यकारभार विशिष्ट लोकांनीच केला पाहिजे. मग तुम्ही काय करणार? काही नाही. आम्ही फक्त येनकेनप्रकारे पैसा कमविणार. पाश्चात्त्यांच्या नादी लागून विविध शौक, फॅशन यांच्या आहारी जाणार आणि नंतर कुटुंब उद्ध्वस्त झाले की रडत बसणार...
 
 
प्रश्न हा आहे की, ज्या शाळांमध्ये हिंदू संस्कृती, हिंदू परंपरा, देशाभिमान, संस्कृतिरक्षण याच्याविरोधात वातावरण आहे, तशी शिकवणही आहे, त्या शाळांमध्ये आपल्या पाल्यांना टाकावेच का? ऐपत नसतानाही मुलांना अशा शाळांमध्ये टाकणारे असंख्य पालक आहेत. आता कसायाच्या दारातच अनायासे बकरा गेल्यावर, तो तरी काय करणार? त्यामुळे ही मंडळी जेव्हा अशा शाळा व्यवस्थापनाविरुद्ध नारेबाजी करतात, पेपरबाजी करतात तेव्हा त्यांची केवळ कीव येते. सर्वसामान्य लोकांची मुले ज्या शाळेत जातात, ज्या शाळेत अजूनही बर्‍यापैकी भारतीय वातावरण व संस्कार आहेत, अशा शाळांमध्ये पाल्यांना टाकण्यास यांचे हात कुणी बांधून ठेवले आहेत? ख्रिश्चन मिशनरीजना भारतातील यच्चयावत हिंदूंना ख्रिश्चन बनवायचे आहे. परंतु, ते चलाख आहेत. मध्यम व उच्च मध्यमवर्गातील मुला-मुलींना थेट धर्मांतरित केले त, त्याची समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटेल, हे ते जाणून असतात. त्यामुळे प्रलोभनाने, बळजबरीने धर्मांतराचे काम तिकडे दूर जंगलात, झोपडपट्‌ट्यांमध्ये, गरीब वस्त्यांमध्ये सुरू असते आणि इकडे शहरांमध्ये शाळा-महाविद्यालये उघडून त्यात येणार्‍या हिंदू मुला-मुलींवर अभारतीयतेचे संस्कार हळूहळू पण सातत्याने करण्यात येतात. त्यामुळे शिक्षण पूर्ण करून एखादा मुलगा किंवा मुलगी त्यांच्या शिक्षण संस्थेतून बाहेर पडली तर ती वृत्तीने व विचाराने पूर्णपणे अभारतीय झालेली असते. ख्रिश्चन मिशनरी एवढ्यावरच संतुष्ट असतात. कारण, आता यापुढे ही मुले-मुली त्यांचे कार्य अधिक प्रभावीपणे समाजात सुरू ठेवणार असतात. हा धोका, स्वत:ला बुद्धिमान व चतुर समजत असलेल्या मध्यम व उच्च मध्यमवर्गातील लोकांना लक्षात येत नसेल का?
 
या ख्रिश्नच शाळांमध्ये नैतिक शिक्षण (मोरल सायन्स) विषयाचा तास असतो. त्यात केवळ बायबलवरच माहिती दिली जाते. कथादेखील बायबलमधीलच सांगितल्या जातात. महापुरुषांची म्हणून जी चरित्रे सांगितली जातात तीही तिकडलीच. जणूकाही भारत हा एक विराण भूमीचा तुकडा होता आणि पाश्चात्त्यांनी त्याला पादाक्रांत केल्यावरच इथे सभ्यता, संस्कृती यांची रुजवात झाली. या असल्या शाळांची ही दादागिरी बंद करायची असेल तर कायदे, कानून लागू झाले पाहिजेत. सरकारने त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. काहींचे म्हणणे असते की, कर भरणार्‍या सर्व भारतीयांच्या पैशातून या शाळांना अनुदान दिले जाते, त्यामुळे त्यांच्यावर सरकारने कारवाई केली पाहिजे. युक्तिवाद शंभर टक्के बरोबर आहे. पण, सरकार कारवाई करणार म्हणजे काय करणार? अशा शाळांवर कारवाई करणे फार अवघड आहे, हे शिक्षणक्षेत्रातील कुणाही व्यक्तीला माहीत आहे. झाडाच्या फांद्या छाटण्यापेक्षा थेट मुळावरच घाव का नाही घालायचा? या शाळेत 90 टक्के मुले हिंदूंची असतात. हिंदूंनी ठरविले की, काहीही झाले तरी, कुणी माझ्या सोबत येवो अथवा न येवो, माझा पाल्य या असल्या शाळेत जाणार नाही. त्याच्यात प्रतिभा असेल, गुण असेल, हुशारी असेल तर तो कुठल्याही शाळेत शिकला तरी भविष्यात नाव काढेल. मुळातच पाल्यामध्ये काही गुण नसतील, तर त्याला कितीही नावाजलेल्या शाळेत घातले तरी काही फायदा नाही. हा साधा युक्तिवाद आहे. तो आम्ही अंमलात आणला पाहिजे. हिंदूंची मुले-मुली या शाळेत गेली नाहीत की मग बघा ही मिशनरीज मंडळी कशी नाक घासत तुमच्याकडे येतात ते! पण, ते आम्ही करत नाही. आम्हाला जमत नाही आणि महत्त्वाचे म्हणजे, समाज काय म्हणेल, या भीतीचा पाश तोडण्याचे आमच्यात सामर्थ्य नाही. फक्त दबक्या आवाजात ओरडायचे, नाही तर घरातल्या घरात घुसमटत जीवन जगायचे, हेच आम्ही ठरविले आहे. कुठल्याच काळात शक्तिहीनांना न्याय मिळत नसतो. बळी द्यायचा असला तरी तो निरुपद्रवी बोकडाचा देतात. वाघाचा किंवा हत्तीचा देत नाही. त्यामुळे या मध्यम व उच्च मध्यमवर्गातील लोकांवर सतत अन्यायच होत असतो. आपल्यावर कसा अन्याय होत आहे, याची रसभरीत वर्णने इतरांना ऐकवीतच यांचे आयुष्य संपून जाते. यालाच ही मंडळी जीवनाचा आनंद मानतात. जीवनाचे सार्थकत्व समजतात. अशा लोकांच्या मदतीला देवदेखील येत नाही!
 
 
ही असली परक्यांवर जगणारी वृत्ती या समाजात केव्हापासून आली, कळायला मार्ग नाही. ब्रिटिशांच्या गुलामगिरीमुळे आली असे मानले, तर आपल्या समाजात अशी कितीतरी मंडळी आहेत, ज्यांची ऐपत असतानाही त्यांनी या मानसिक दास्यत्वाच्या बेड्या तोडून फेकून दिल्या आहेत. गुलामगिरीचा परिणाम व्हायचा तर तो सर्वांवरच झाला पाहिजे ना! मग फक्त या मध्यम व उच्च मध्यमवर्गावरच तो अधिक का झाला असावा? महाराष्ट्रातली परिस्थिती तर अधिकच गंभीर आहे. संस्कृती, परंपरा यांचे निर्भीडपणे पालन करणे इकडच्यांना जमतच नाही. दक्षिणेकडील किंवा उत्तरेकडील समाज परंपरांचे, संस्कृतीचे बिनदिक्कत पालन करताना दिसतो. पण, आम्ही महाराष्ट्रीयनच मात्र बिचकतो. पुन्हा तेच- लोक काय म्हणतील?
 
 
 
आम्हाला आमच्या आयुष्याचा आलेख स्वत:च काढता आला पाहिजे. ‘‘मी माझ्या परंपरा, चालीरीती यांचे डोळसपणे पालन करीन. कट्‌टरतेने करीन. माझ्या बोलण्यात आणि वागण्यात विरोधाभास राहणार नाही. जे पटले ते उघडपणे करीन.’’ असा बाणेदारपणा दाखविण्याची गरज आहे. एखाद्या सुयोग्य आग्रहासाठी वेळ पडली तर आयुष्यदेखील झुगारून देण्याची तयारी असली पाहिजे. नाही मिळणार मानमरातब, आर्थिक लाभ, समाजात प्रतिष्ठा! त्याने काहीही बिघडायचे नाही. परंतु, ही व्यक्ती बाणेदारपणे जगली, असे तर लोक म्हणतील ना! तेवढे पुरेसे आहे. अशा भावनेने अनुप्राणित झालेली मंडळी समाजात अधिकाधिक संख्येने उभी झालीत, तर देशातील छुप्या शत्रूंची भीती बाळगण्याची गरजच उरणार नाही. गोष्टी खूप शौर्याच्या करायच्या, त्यागाच्या करायच्या, परंतु आचरण करताना मात्र त्या सर्वांचा विसर पडू द्यायचा. या असल्या वृत्तीमुळे मध्यम व उच्च मध्यमवर्गातील लोक जगात हास्यास्पद ठरू लागले आहेत. भाषा, वेषभूषा, सण, उत्सव, परंपरा, रिवाज या सर्वांमधून मनावर सतत संस्कार होत असतात. ते संस्कार कुठले व्हायला हवेत, हे विचारीपणाने ठरविले, तर या ज्या काही समस्या उद्भवतात, त्या कधीच निर्माण होणार नाहीत. पण हे सर्व हा समाज करेल का, हा एक प्रश्नच आहे...
@@AUTHORINFO_V1@@