दडविलेले उघड्यावर!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jul-2018
Total Views |


 

 

उपासना पद्धती कुठलीही असली तरीही ज्या प्रकारचे गुन्हे या मंडळींनी केले आहेत, ते कन्फेशन बॉक्समध्ये जाऊन कबुली देऊनही न धुतले जाणारे आहेत.

 

ख्रिस्ती धर्मगुरूंकडून झालेल्या लैंगिक अत्याचारांना, खुनाला वाचा फुटावी, तशी वाचा फुटायला आता सुरुवात झाली आहे. आपल्या पांढऱ्याशुभ्र झग्याच्या खाली ही मंडळी काय काय दडवू शकतात, याची कल्पनाही आपण करू शकत नाही. आकाशीच्या देवाची साक्ष काढत इतरांना दया, करुणा आणि सद्वर्तनाची शिकवण देण्याचा आव आणणाऱ्या पाद्रयांची प्रकरणे एक एक करून बाहेर येत आहेत. ख्रिस्ती धर्माचा बालेकिल्ला झालेल्या केरळमधूनच याची सुरुवात होऊन ही वावटळ धर्मांतरणाला भरपूर वाव असलेल्या छत्तीसगढपर्यंत जाऊन पोहोचली आहे. छत्तीसगढ यासाठी की, तिथे धर्मांतरणाला सुपीक असलेले वनवासींचे मागे राहिलेले जनजीवन आहे. त्यांना सेवेच्या जाळ्यात फसवून धर्मांतरित करणे, कधीही सोपेच. त्यामुळे अधिक लोकसंख्या असलेल्या महानगरांपेक्षा अशा दुर्गम भागांत जाऊन काम करणे ख्रिस्ती धर्मगुरू पसंत करतात, ते यासाठीच. लैंगिक शोषणाचे चर्चवर होत असलेले आरोप आजचे नाहीत. ते यापूर्वीही होत आले आहेत. एखाद्या आसाराम बापूने लैंगिक शोषणाचे उद्योग केले की, ‘ब्रेकिंग न्यूजमागे पागल असलेले चॅनेलवाले आज चिडीचूप आहेत. ते चिडीचूप असण्याचे मुख्य कारण, या मंडळींचे कंपू इतके पोहोचलेले आहेत की, ते इतरांना शहाणपणा शिकविण्याचा आव आणणाऱ्या संपादकांनाही त्यांचे अग्रलेख मागे घ्यायला लागू शकतात. ताकद इतकी असली तरी खुद्द धर्मगुरूंची कुकर्मे इतकी जास्त आहेत की, एकामागोमाग एक प्रकरणे बाहेर पडायला लागली आहेत. केरळच्या थिरूअनंतपुरममधील प्रकरण तर खुद्द आकाशीच्या बापाच्या संकेतांनाच काळिमा फासणारे आहे. एक मुलगी ख्रिस्ती परंपरेनुसार आपण केलेल्या तथाकथित पापाची कबुली द्यायला चर्चमधील कन्फेशन बॉक्समध्ये जाते आणि तिचा कबुलीजबाब ऐकून तो धर्मगुरू तिला सगळ्यांना प्रकरण सांगायची धमकी देतो आणि लैंगिक अत्याचार करतो. इतक्यावर हे प्रकरण थांबत नाही तर तो अन्य धर्मगुरूंनाही हे सगळे सांगतो आणि तेही या कुकर्मात सहभागी होतात, असा हा घटनाक्रम. खरंतर या सगळ्या प्रकरणानंतर पोलिसांनी स्वत:हून तक्रार दाखल करून घ्यायला हवी. मात्र, तसे काहीही होत नाही. स्वत: चर्चच या प्रकरणाची चौकशी करणार, असे म्हणते. म्हणजे आम्हीच चोर, आम्हीच पोलीस आणि आम्हीच न्यायाधीश.

 

छत्तीसगढला तर सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात एका धर्मगुरूचे नाव आले आहे. आरोपींना अटक व्हायला सुरुवात होते आणि त्याचबरोबर एक आर्चबिशप उठतो आणि सरळ हा धर्मगुरू कसा निर्दोष आहे, हे सांगणारी पत्रकार परिषद घेतो. कायद्याच्या भाषेत बोलायचे तर हा सरळसरळ तपास अधिकाऱ्यावर दबाव आणण्याचाच प्रकार असतो. आता जे प्रकरण समोर येत आहे, ते असेच गंभीर आहे. झारखंडच्या रांचीमधील ख्रिस्ती मिशनऱ्यांवर लहान मुलांची विक्री केल्याचा आरोप होत आहे. अनाथ मुलांना सांभाळण्याचे मोठे काम ख्रिस्ती विचारांतून चालणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून केले जाते. ही सगळी मुले पुढे जाऊन कोणत्या मूल्यांचे अनुयायी होतात, हे वेगळे सांगायला नको. पण, याबाबत जेव्हा माणुसकीचा तर्क लढविला जातो तेव्हा काहीच म्हणता येत नाही. छत्तीसगढमधील घटना अनैतिक तर आहेच, पण सेवेच्या बुरख्याआड काय काय सुरू आहे याची झलक देणारी मानावी लागेल. रांची येथील बाल कल्याण समितीपुढे एक तक्रार दाखल झाली. अपत्यहीन असलेल्या एका दाम्पत्याने आपल्याकडून १.२ लाख रुपयांची रक्कम घेऊनही आपल्याला बाळ न सुपूर्द केल्याची ही तक्रार होती. मिशनरीज ऑफ चॅरेटीजया मदर तेरेसांनी नावारूपाला आणलेल्या संस्थेची कार्यकर्ती असलेल्या अनिमा इंदवर या महिलेपर्यंत हा तपास जाऊन पोहोचला. या महिलेच्या अटकेनंतर तिच्या घरी सापडलेल्या ६० हजारच्या रकमेचे कुठलेही स्पष्टीकरण तिला देता आलेले नाही. अशाप्रकारे अन्य काही मुलांची विक्री केल्याचेही हळूहळू उघडकीला येत आहे. याप्रकरणी मिशनरीज ऑफ चॅरेटीजच्या दोन जोगिणींचीही चौकशी करण्यात येत आहे. हा सगळाच प्रकार माणुसकीला काळिमा फासणारा आहे. स्वत:ला मानवतेचे मसिहा म्हणविणारे आणि एरवी या देशात कसे असहिष्णुतेचे वातावरण निर्माण झाले आहे, हे सांगणारे ठिकठिकाणचे फतवेधारी धर्मगुरू आता चिडीचूप आहेत. गुजरात, गोवा आणि मुंबई या ठिकाणी निवडणुकीच्या आधी देशाच्या लोकशाहीविषयीच्या चिंतेचे कड आणणारे बदमाश आता गप्प आहेत. महिलांचे मूलभूत अधिकार, लहानग्यांचे कोवळे भावविश्व यासारख्या गोष्टींशी त्यांना काहीही देणेघेणे नाही.

 

युरोप व अमेरिकेत चर्चमधील धर्मगुरूंनी केलेल्या लैंगिक अत्याचाराची प्रकरणे मिटवता मिटवता रोम कॅथलिक चर्चच्या नाकीनऊ आले आहेत. हजारो मिलियन डॉलर यासाठी खर्च झाले आहेत. यावर व्हॅटिकन म्हणते की, “ही तर अमेरिकेची संस्कृतीच आहे. हे चालणारच.जर हे चालणारच असेल तर धर्म म्हणून आपण कोणता मूल्यात्मक बदल घडवून आणला? असा सवाल व्हॅटिकनला केला पाहिजे. मॅथ्यूने लिहिलेल्या प्रभू येशूच्या चरित्रातील चौथ्या अध्यायात परमेश्वराचीच परीक्षा पाहण्याविषयी उत्तम कथा सांगितली आहे. पांढऱ्या वेशातील हे धर्मगुरू सध्या परमेश्वराचीच परीक्षा घेण्याचे उद्योग करीत आहेत. परमेश्वर त्यांना याची शिक्षा देवो न देवो, कायद्याने त्यांना त्याची शिक्षा जरूर दिली पाहिजे. उपासना पद्धती कुठलीही असली, तरीही ज्या प्रकारचे गुन्हे या मंडळींनी केले आहेत ते कन्फेशन बॉक्समध्ये जाऊन कबुली देऊनही न धुतले जाणारे आहेत.

@@AUTHORINFO_V1@@