मुंबई-गोवा, अलिबाग-रोहा मार्गावर कोंडी; तर मुंबईत रेल्वे वाहतूक उशिराने

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jul-2018
Total Views |



मुंबई : रायगड आणि मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचा आजचा दिवस वाहतूक कोंडीचा ठरला आहे. रायगड येथे मालगाडी बंद पडल्याने तर मुंबई-गोवा महामार्गावर ट्रक बंद पडल्याने प्रवाशांना वाहतूक कोंडीत अडकावे लागले आहे. आधीच पावसाची रिपरिप आणि त्यात वाहतूक कोंडी यामुळे प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

 

मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवरील वाहतूक उशिराने

मुंबई आणि परिसरात बुधवारी रात्रीपासून पावसाची संततधार असून याचा फटका रेल्वे प्रवाशांना बसला आहे. मध्य रेल्वेवरील वाहतूक सुमारे २० ते २५ मिनिटे उशिराने सुरु आहे. तर हार्बर रेल्वेवरील वाहतूक १० ते १५ मिनिटाने उशिरा सुरु आहे.

 

मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली

मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. रायगड जिल्ह्यातील महाडनजीक केंबुर्ली गावाजवळ पहाटे साडेपाचच्या सुमारास ही दरड कोसळली. त्यामुळे कोकण आणि मुंबईच्या दिशेने होणारी वाहतूक ठप्प झाली. दोन्ही बाजूला पाच ते सात किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जवळपास चार तासांनी दरड हटवण्यात यश आले असून दोन्ही मार्गांवरील वाहतूक संथगतीने सुरु आहे.

 

मालगाडीचं इंजिन बंद पडले

आज सकाळी ८ वाजता रायगड येथे रोह्याजवळ पलम रेल्वे फाटकाजवळ मालगाडीचे इंजिन बंद पडले. त्यामुळे रेल्वे क्रॉसिंगचा रस्ता बंद झाल्याने पलम फाटकाजवळ वाहतुकीची कोंडी झाली आहे. या इंजिन बिघाडामुळे अलिबाग ते रोहा रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे अलिबाग आणि रोह्याकडे जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

@@AUTHORINFO_V1@@