तुकोबांच्या पालखी सोहळ्याचे आज पंढरीकडे प्रस्थान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jul-2018
Total Views |




देहू (पुणे) : जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आज पंढरीच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. यंदा हे पालखी सोहळ्याचे हे ३३३ वे वर्ष असून पंढरीच्या दिशेने जाण्यासाठी हजारो-लाखो भाविक आज देहू गावामध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान पालखी सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण झाली असून आज दुपारी २ वाजता पालखी सोहळा पंढरीकडे आपले प्रस्थान ठेवणार आहे.

आज पहाटेपासूनच मंदिरातील मुख्य पूजेला आणि पाद्यपूजेला सुरुवात झाली आहे. पालखी रथाच्या सजावटीचे काम देखील अंतिम टप्प्यात आले असून वारीसाठी आलेल्या भाविक देखील दर्शनासाठी मंदिरात गर्दी करत आहेत. मंदिर परिसरात सगळीकडे भाविकांनी विसावा घेतला असून अनेक ठिकाणी अभंग आणि कीर्तनाचे कार्यक्रम रंगत आहेत. आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तुकोबाच्या पालखी मुख्य देऊळवाड्यातील भजनी मंडपात आण्यात येईल. तुकोबांच्या पादुकांची पुन्हा एकदा पूजा करण्यात येईल व त्यानंतर देऊळवाड्यात पालखी प्रदक्षिणा होऊन पालखी इनामदारवाड्यात मुक्कामी पोहोचेल.

दरम्यान पालखी सोहळ्यानिमित्त संपूर्ण देहू गाव आणि आसपासचा परिसर वारकऱ्यांनी आणि भगव्या पताकांनी फुलून निघालेला आहे. गावामध्ये सगळीकडे वारकऱ्यांचे सोयीसाठी अन्नछत्र आणि इतर सुविधा उभारण्यात आल्या आहेत. गावात सगळीकडे वारकरी पुरुष आणि महिला अभंगाचे गायन करताना दिसून येत आहे. देहू गावातील बाजारपेठ देखील वारकऱ्यांच्या आगमनामुळे फुलून गेली आहेत.
@@AUTHORINFO_V1@@