वर्ल्ड क्लास व्यवसाय : कार्यपद्धती आणि दृष्टिकोन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jul-2018
Total Views |


जिथे रस्त्यावरून प्रवास करताना लोकांना स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी नाही, जिथे सुरक्षिततेचे नियम पाळले जात नाहीत, तिथे मला हवा असलेला माल योग्य प्रकारे, वेळेत व अचूक बनेल याची काय खात्री?
 

यूट्यूबवर मुंबईतील रणजीत सिंग रिक्षावाल्याचा व्हिडिओ आहे. रणजीत सिंगची रिक्षा जरा हटके आहे. रिक्षात छोटा पंखा, पिण्याचे पाणी, मोबाईल चार्जिंगची सोय, चॉकलेट्स, छोटा टीव्ही, प्रथमोपचार पेटी, छोटीशी कचराकुंडी आणि अजून बरेच काही आहे. विमान प्रवासात मिळणार नाहीत इतक्या सोयी-सुविधा रणजीत सिंगच्या रिक्षात आहेत. काही फुटाच्या रिक्षात एवढ्या सोयी कशाला? एखाद्या चिकित्सकाच्या मनात हा प्रश्न उपस्थित होईल. पण का नसाव्यात या सोयी-सुविधा आपल्या छोट्याशा रिक्षात, असा विचार करणार्‍या रणजीत सिंगचे खरंतर कौतुकच! नकारघंटा वाजवत बसण्यापेक्षा एका रिक्षावाल्याने आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. रिक्षावाल्याचे एक वेळ ठीक, दुसरे एक उदाहरण पाहू. दोनेक वर्षांपूर्वी काही कारणाने मला जव्हारला पावसाळ्यात जाण्याचा योग आला होता. सकाळाची पावसाळी हवा, अश्यावेळी गरम गरम चहा हवा होता आणि योगायोगाने थोड्याच वेळात समोरील फुटपाथवर एक चहाची टपरी उघण्याची लगबग सुरू झाली. पांढरा स्वच्छ शर्ट आणि पँट घातलेला एक माणूस आला. त्याने चहाची टपरी उघडली, बादलीत पाणी व फडके घेऊन त्याचा मदतनीस टपरी स्वच्छ पुसू लागला. टपरी पुसून झाल्यावर उदबत्ती लागली, शेगडी पेटली आणि चहाचे आधण शेगडीवर. मदतनीसाने तोपर्यंत टपरीबाजूचा परिसर स्वच्छ केला होता. चहा झाला आणि छोट्या काचेच्या ग्लासातील त्या चहाचा घोट कुठल्याही पंचतारांकित हॉटेलमधील चहापेक्षा कित्येक पटीने ‘उत्कृष्ट’ होता. चहाची ती टपरी उत्कृष्टतेचा आदर्श होती. स्वच्छ, चकचकीत, नीटनेटकी टपरी, टपरीचा मालक हसतमुख, चहा बनवण्याचे त्याचे काम किती मनापासून करत होता. पाहता-पाहता आमच्या ग्रुपने दोन-तीन कप प्रत्येकी चहा घेतला. यूट्यूबवरील व्हिडिओतून भेटणारा रिक्षावाला असो अथवा प्रत्यक्ष बघितलेली चहाची टपरी असो, काय साम्य आहे या दोन उदाहरणांत?

 

ग्राहक समाधान : दिखावा की ध्येय?

काही वर्षांपूर्वी नाशिकमधील एका उद्योजकाला आलेला अनुभव. जर्मनीतील एका कंपनीत त्यांना काही माल पाठवायचा होता. प्राथमिक बोलणी, ‘sample approval’ इ. झाले होते. पुढील मोठी ऑर्डर काढण्याआधी त्या जर्मन कंपनीतील ऑडिटर नाशिकमधील कंपनीत येऊन ‘सिस्टम ऑडिट’ करणार असे ठरले. साहजिकच परदेशी ग्राहक येणार म्हणून जय्यत तयारी झाली. ऑडिटर जर्मनीतून पुण्यात आले व पुण्याहून कारने नाशिकला पोहोचले. ऑडिट सुरू झाले. आधी पाठवलेला “sample lot” ग्राहकाच्या प्रत्येक निकषांनुसार होता, त्यामुळे उद्योजक आणि त्याची टीम निर्धास्त होती. पण, ऑडिटर मात्र प्रत्येक बाबतीत खोलात जात होता. ‘हे कसे केले? कसे मोजले? किती वेळ लागला? कच्च्या मालाची गुणवत्ता कशी मोजता? तुमच्या कडे कुठली “instruments”आहेत? ...काय, कसे... प्रत्येक बारीक-सारीक गोष्ट ऑडिटर वारंवार तपासात होता, त्याचे पुरावे मागत होता. शेवटी उद्योजकाने न राहवून विचारले की, काही प्रॉब्लेम आहे का? कारण, उद्योजकाला आणि त्याच्या टीमला कळत नव्हते की, क्वालिटी योग्य असूनही ऑडिटर का एवढा चिकित्सक का आहे? आपल्या जर्मन खाक्याने शांतपणे ऑडिटरने उद्योजकाला सांगितले, “हे बघा, मी आज पुण्याहून नाशिकला येताना हायवेवर वाहतुकीचे नियम न पाळणारे कितीतरी लोकं पाहिलेत. आमच्या या प्रॉडक्टचा उपयोग गतिरोधक यंत्रप्रणालीत होतो. माल जर काळजीपूर्वक बनला नाही, सदोष असला तर गतिरोधक काम करणार नाही आणि त्याने काय अनर्थ ओढावेल हे सांगण्याची मी गरज नाही.” ऑडिटरचे बोलणे ऐकल्यावर उद्योजकाने व त्याच्या टिमने शांतपणे त्याच्या सर्व शंकांचे निरसन केले.

 

मालाची गुणवत्ता नसेल तर कुठलाही उद्योग फार काळ स्पर्धेत टिकत नाही. गुणवत्तेची हमी तर हवीच, त्यापलीकडे सातत्य, वाजवी दर, वेळेची बांधीलकी आणि ग्राहकाला अपेक्षित असलेली परंतु कागदोपत्री न मांडलेली काही मूल्यं ओळखून त्यानुसार माल बनवणे आणि ग्राहकापर्यंत पोहोचविणे म्हणजे खर्‍या अर्थाने ग्राहक समाधान.

 

वर्ल्ड क्लास’ म्हणजे काय ?

‘वर्ल्ड क्लास’ म्हणजे जागतिक दर्जा. जागतिक दर्जाचा माल बनवणे किंवा जागतिक दर्जाची सेवा देणे यामध्ये मानसिकतेचा वाटा अधिक आहे. लेखाच्या सुरूवातीस दिलेल्या रिक्षावाल्याचे आणि चहा टपरीचे उदाहरण बोलके आहे. साधनांच्या कमतरतेपेक्षा, ‘चलता है’, “adjust” करून घ्या’, ‘कशाला एवढी काळजी करायची’, ‘काय फरक पडतो..थोडं इकडच तिकडे झालं तर’, अशा सर्व तोकड्या कारणांच्या आवरणाखाली आपण उत्कृष्ट सेवा देण्यात कमी पडतो आणि त्याचे वैषम्य न वाटता पुढे जातो. उद्योजकाला उत्कृष्टतेचा ध्यास असेल तर उद्योग कुठलाही असला तरी काही कार्यपद्धती त्याला मार्गदर्शक ठरतात. “World class practices” म्हणजे जागतिक दर्जाच्या कार्यपद्धती. व्यवसाय कुठलाही असो, या कार्यपद्धती त्या त्या व्यवसायाला लागू पडतात. ‘5 ड’ (सफाई, नीटनेटकेपणा, सुसूत्रता नियम) असो किंवा सुरक्षा नियम, पर्यावरण संवर्धन, मालाची विश्वासार्हता आणि आपल्या उद्योगाची तुलना करण्याचा मानक (Benchmark) हे आणि इतर अनेक कार्यपद्धती “World class practices” च्या अंतर्गत येतात. उद्योगाची वाढ सुदृढ आणि फायदेशीर व्हावी असे उद्योजकाला जर वाटत असेल तर या वाढीला पूरक कार्यपद्धती अमलात आणण्याशिवाय पर्याय नाही. ग्राहकाने सांगितले म्हणून मारून मुटकून, ऑडिटचा केवळ दिखावा करून कुठलेतरी ‘क्वालिटी सर्टिफिकेट’ भिंतीवर टांगण्यापेक्षा, उद्योगाला प्रगतीपथावर नेण्यासाठी मानसिकतेतला बदल आणि त्याबरोबर “World class practices” शीची जोड म्हणजे ‘सोने पे सुहागा.’

 

कुठल्याही लहान उद्योगाची वाढ शास्त्रशुद्धारित्या झाल्यास, वाढ होताना येणार्‍या अडचणींवर मात करणे तुलनेने सोपे असते. उद्योगाची वाढ होताना, जर तिथे आधी उत्तम कार्यपद्धती अस्तित्वात असतील, तर ती वाढ केवळ कार्यपद्धतीचा विस्तार या स्वरूपात होऊ शकते. पण जर आधीच सावळा गोंधळ असेल तर मात्र उद्योग विस्तार करताना, अनेक अडचणी उभ्या राहतात. अनेकदा लघु किंवा मध्यम उद्योजकांच्या मनात शंका असते की ‘आमचा व्यवसाय तर लहान आहे, मग एवढे सारे कशाला...आम्हाला जे गरजेचे वाटते, ते आणि तेवढेच आम्ही करू. इतक्या वेगवेगळ्या गोष्टी करत बसलो तर काम कधी करायचे?’ हा युक्तिवाद वरवर बघता खरा वाटतो, पण ‘आधी कोंबडी का अंड?’ या अनुत्तरीत प्रश्नासारखा हा प्रश्न अनुत्तरीत नाही. याचे उत्तर हे आहे की, आपल्या उद्योगाकडे बघण्याचा उद्योजकाचा दृष्टिकोन कसा आहे. आपल्या स्वत:च्या उद्योगाकडे, त्यात ग्राहक, कर्मचारी, उत्पादन क्षमाता, उपलब्ध साधने, आर्थिक बाजू इ. सर्व बाबीकडे उद्योजक कशा दृष्टीने बघतो, एक उदरनिर्वाहाचे साधन की स्वत:च्या क्षमतांचा कस लागेल अशी वाटचाल, हा दृष्टिकोनातील फरक उद्योग वाढीसाठी दीपस्तंभासारखा मार्गदर्शक आहे. उत्कृष्टतेला कुठलेही बंधन किंवा सीमा नसते. उत्कृष्टता सर्वसमावेशक आणि सर्वव्यापी होऊ शकते, जर आपला दृष्टिकोन उत्कृष्टतेला पूरक असेल तर.

-ऋता पंडित

@@AUTHORINFO_V1@@