त्रिपुरा केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. वि. ल. धारूरकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jul-2018
Total Views |
 
 

त्रिपुरा केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. वि. ल. धारूरकर

जळगाव, ५ जुलै
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे माजी प्रमुख डॉ. वि. ल. धारूरकर यांची त्रिपुरा केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड करण्यात आली आहे.
 
डॉ. वि. ल. धारूरकर गेली अनेक वर्षे जगभरातील विद्यापीठात माध्यम व पुरातत्त्व या विषयातील संशोधक व विद्वान म्हणून विख्यात आहेत. ते सध्या विद्यापीठ अनुदान आयोगाचे एमिरिट्स प्रोफेसर असून, भारतीय सामाजिकशास्त्रे संशोधन परिषदेचे वरिष्ठ प्राध्यापक आहेत. त्यांनी ‘वेरूळच्या जैन लेण्यातील कला व मूर्तीविज्ञान’ या विषयावर प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळवली. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागात पुरातत्त्व संशोधक म्हणून काम करत असताना धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात वरसूस येथे दक्षिण भारतात पहिल्यांदा सिंधू संस्कृतीचे अवशेष शोधून काढले. विद्यार्थीदशेत दै. सोलापूर संचार, दै. अजिंठा आदी दैनिकात त्यांनी पत्रकारिता केली. माध्यम समीक्षा, संपादन कला आणि शास्त्र, जनसंवाद सिद्धांत, आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर, स्वातंत्र्यवीर सावरकरांची पत्रकारिता, स्वामी विवेकानंद, आम्ही पाहिलेले बाबासाहेब (संपादित) अशी त्यांची ३५ पुस्तके आहेत.
 
अमेरिका, चीन, जपान, इटली, जर्मनी, कॅनडा आदी अनेक देशांमध्ये संशोधन परिषदांत त्यांनी शोधनिबंधांचे वाचन केले आहे. जगभरातील नामांकित रिसर्च जर्नल्समध्ये त्यांचे निबंध प्रकाशित झाले आहेत. देशातील एखाद्या केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू होण्याचा मान मिळवणारे डॉ. धारूरकर मराठवाड्यातील पहिलेच व्यक्ती आहेत. त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण उमरगा येथे झाले असून, पदव्युत्तर शिक्षण औरंगाबाद येथे झाले आहे. काहीकाळ ते कोल्हापूर विद्यापीठात वृत्तविद्या विभाग प्रमुख होते.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@