पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरण्याचा विरोधकांचा प्रयत्न!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 
 
लोकसभा निवडणुकीला वर्षभरापेक्षाही कमी कालावधी राहिला असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील विरोधकांचे हल्ले वाढले आहेत, त्यांना बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मोदी भाजपाचा हुकमाचा एक्का आहेत. मोदींची जनमानसातील लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. मोदींच्या लोकप्रियतेच्या जवळपास जाणारा एकही नेता विरोधकांजवळ नाही.
 
2014 ची लोकसभा निवडणूक मोदी यांनी भाजपाला एकहाती निवडून दिली. 2019 ची निवडणूकही ते भाजपाला निवडून देणार आहेत. याची भाजपाच्या नेत्यांनाच नाही तर विरोधकांनाही पूर्ण खात्री आहे. त्यामुळेच मोदी जोपर्यंत आहेत, तोपर्यंत सत्तेवर येण्याचे आपले स्वप्न पूर्ण होणार नाही, याची जाणीव विरोधकांना आहे. त्यामुळे मोदींवरील हल्ले वाढले आहेत, जनमानसातील त्यांची प्रतिमा मलिन करण्याचे, त्यांना वेगवेगळ्या मार्गाने बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मोदींना बदनाम केल्यावरच आपण भाजपाचा विजयरथ रोखू शकतो, असे विरोधकांना वाटते आहे.
फक्त एवढेच केले असते तरी ते एकवेळ समजण्यासारखे होते, पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मोदी यांच्या हत्येचे कारस्थान रचण्याचे प्रयत्न नक्षलवादी संघटनांनी सुरू केले आहे. त्यांना प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे विरोधकांची साथ मिळते आहे. जेव्हा आपली रेषा मोठी करता येत नाही, तेव्हा दुसर्‍याची रेषा छोटी करण्याचे षडयंत्र रचले जाते. दुसर्‍यापेक्षा आपली रेषा मोठी करायला मोठे कर्तृत्व आणि क्षमता लागत असते. ज्यांच्याजवळ असे कर्तृत्व आणि क्षमता नसते, ते दुसर्‍यांना संपवण्यातच धन्यता मानत असतात. आपल्या देशातील विरोधी पक्षांची स्थिती आज अशीच झाली आहे.
कोणताही एक विरोधी नेता वा त्याचा पक्ष आज मोदी यांच्या आव्हानाचा आणि नेतृत्वाचा सामना करू शकत नाही. त्यामुळे सर्व विरोधी पक्षांनी मोदी यांना घेरण्याचे, त्यांची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. महाभारताच्या युद्धातही अभिमन्यूला विरोधकांनी चक्रव्यूहात घेरले होते, चारीबाजूने घेरून अधर्माने त्याची हत्या केली होती. कारण त्या अभिमन्यूला चक्रव्यूहात शिरण्याची कला माहिती होती. आईच्या गर्भात असताना त्याने तेवढेच ऐकले होते. चक्रव्यूहातून बाहेर कसे निघायचे हे त्याला माहिती नव्हते. याची किंमत त्याला आपले प्राण गमावून द्यावी लागली होती.
 
 
पण, आजच्या आधुनिक भारतातील लोकसभा निवडणूकरूपी चक्रव्यूहात मोदींना असेच घेरण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. पण, त्यावेळच्या अभिमन्यूत आणि आजच्या अभिमन्यूत म्हणजे नरेंद्र मोदी यांच्यामध्ये एक मोठा फरक आहे. त्यावेळच्या अभिमन्यूला फक्त चक्रव्यूहात शिरता येत होते, निघता येत नव्हते, आजच्या अभिमन्यूला म्हणजे मोदी यांना चक्रव्यूहात शिरताही येते आणि विरोधकांचा पाडाव करून त्यातून यशस्वीपणे बाहेर निघताही येते!
 
 
मोदी यांच्याविरोधात आघाडी उभी करण्याचा पहिला प्रयत्न कॉंग्रेसच्या नेतृत्वात सुरू आहे. दुसरा प्रयत्न तिसर्‍या आघाडीच्या काही प्रादेशिक पक्षांनी सुरू केला आहे. यात गैर असे काही नाही. राजकारणात हे स्वाभाविक म्हणावे लागेल. सत्तेवर असलेल्या पक्षाच्या विरोधात सर्वच विरोधक एकजूट होण्याचा प्रयत्न करत असतात. या आधी आणिबाणीनंतर जनता पक्षाच्या रूपात तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र आले होते. मात्र, अशा प्रकारे एकत्र आलेल्या विरोधकांची एकजूट जास्त दिवस टिकत नाही. सत्तेसाठी एकत्र येणार्‍या विरोधकांचे ऐक्य नंतर मिळणार्‍या सत्तेमुळे फार काळ टिकू शकत नाही, हा इतिहास आहे.
 
मोदींवर सातत्याने टीका करण्यापेक्षा, त्यांना बदनाम करण्यापेक्षा आपण सत्तेवर आल्यानंतर काय करणार, विकासाचा आपला अजेंडा काय आहे, हे विरोधकांनी जनतेला सांगितले पाहिजे. उगीच साप समजून भुई धोपटण्यापेक्षा नेमकी वस्तुस्थिती जनतेसमोर मांडली पाहिजे. पण, विरोधकांची नेमकी अडचण इथेच आहे. मोदींच्या नावाने थयथयाट करण्याशिवाय त्यांच्याजवळ देशाच्या विकासाचा कोणताच अजेंडा नाही. त्यामुळे मोदींना बदनाम करण्याचा सोपा मार्ग त्यांनी निवडला आहे.
 
पण, या देशातील जनता अतिशय हुशार आहे, विरोधकांची जी कोल्हेकुई सुरू आहे, ती नेमकी कशासाठी आहे, देशाचे भले कशात आहे, कोणाच्या हातात सत्तेची सूत्रे सोपवली म्हणजे देशाचा विकास होऊ शकेल आणि कोणाच्या हातात सत्तेची सूत्रे गेली म्हणजे देशाचे वाटोळे होऊ शकेल, याची जनतेला जाणीव आहे. लोकशाहीचे विश्वस्त म्हणून या देशातील जनतेने या आधीही अनेक वेळा आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. मात्र, ज्यांच्या रक्तातच बेईमानी भरली आहे, अशा विरोधी पक्षांचे ऐक्य फार काळ टिकू शकत नाही. सत्तेचा फेविकॉलही त्यांना फार काळ जोडून ठेवू शकत नाही. कर्नाटकात आपण याचा अनुभव घेतला आहे.
 
 
चार वर्षांपासून सत्तेत नसल्यामुळे कॉंग्रेस पूर्णपणे अस्वस्थ आणि निराश झाली आहे. काहीही करून तिला सत्तेवर यायचे आहे. सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही पातळीवर जायची कॉंग्रेसची तयारी आहे. कॉंग्रेसचा अंत:स्थ हेतू भाजपाला सत्तेवर येण्यापासून रोखण्याचा आहे. त्यासाठी काही वेळेला माघार घ्यावी लागली तरी माघार घेण्याचीही कॉंग्रेसची तयारी आहे. कर्नाटकात स्वत:जवळ जास्त जागा असतानाही कॉंग्रेसने कमी जागा असलेल्या जनता दल सेक्युलरला मुख्यमंत्रिपद दिलेले देशाने पाहिले आहे.
मुळात 1977 आणि 1989 मध्ये झालेले विरोधकांचे ऐक्य आणि आजचे तथाकथित ऐक्य यात खूप फरक आहे. 1977 मध्ये देशातील सर्व विरोधी पक्ष लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आले होते, तर 1989 मध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात सज्ज झाले होते. त्या वेळी विरोधी पक्षांचे ऐक्य फार काळ टिकले नसले तरी त्यांचा प्रयत्न प्रामाणिक होता, त्यांच्या हेतूवर शंका घेता येत नव्हती. पण, आज एकत्र येणार्‍या विरोधकांचा हेतू प्रामाणिक नाही. आजच्या विरोधकांना लोकशाहीशी तसेच भ्रष्टाचाराशीही काहीच देणेघेणे नाही. विरोधकांच्या आघाडीचे नेतृत्व करण्याचा प्रयत्न करणारी कॉंग्रेसच भ्रष्टाचाराने पूर्णपणे बरबटलेली आहे. अन्य विरोधी पक्षांची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही.
 
राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव चारा घोटाळ्याच्या प्रकरणात तुरुंगाच्या वार्‍या करत आहेत. सपाच्या अखिलेश यादवांची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. सरकारी बंगला सोडताना त्यांनी त्याच्या फक्त भिंती आणि वरचे छत उचलून नेले नाही. बाकी पूर्ण बंगला रिकामा केला. तृणमूल कॉंग्रेसच्या ममता बॅनर्जीही अपवाद नाही. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबद्दल बोलावे तेवढे कमी आहे! यातील एकाही जवळ घराणेशाहीचे पाठबळ सोडले तर कोणतेच कर्तृत्व नाही, जनतेच्या प्रश्नांबद्दल तळमळ नाही. देशाच्या विकासाचा कोणताच कार्यक्रम नाही. तरीही या सगळ्यांना पंतप्रधानपदाची स्वप्ने पडत आहेत.
 
आपला शर्ट भ्रष्टाचाराने तसेच अन्य राजकीय अवगुणांनी भरलेला असल्यामुळे मोदी यांचा भ्रष्टाचाराचा डाग नसलेला पांढरा स्वच्छ शर्ट या सगळ्यांच्या डोळ्‌यात खुपतो आहे. त्यामुळे मोदी यांच्या शर्टावर चिखलफेक करण्याचे प्रयत्न या सार्‍यांनी सुरू केले आहेत. मात्र, विरोधकांच्या अशा एकत्रित होण्यामुळे घाबरण्याएवढे मोदी लेचेपेचे नाहीत, तर या सार्‍यांना पुरून उरणारे आहेत. मोदी अशा अनेक विरोधकांचे बारसे जेवून आले आहेत! कारण त्यांचा स्वत:च्या कर्तृत्वावर आणि देशातील जनतेवर विश्वास आहे.
 
 
मोदी यांची वाटचाल विकासाच्या मार्गाने सुरू आहे आणि देशातील जनतेला विकास हवा आहे. त्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींना बदनाम करण्याचे कोणी कितीही प्रयत्न केले, तरी मोदींचा विकासरथ कोणीही रोखू शकत नाही. कारण जनतेचा मोदींच्या नेतृत्वावर आणि कर्तृत्वावर पूर्ण विश्वास आहे. मोदीच्या कुशल आणि खंबीर नेतृत्वातच भारताचा विकास होऊ शकतो, भारत महासत्ता बनू शकतो, याबद्दल कोणाच्या मनात शंका नाही. त्यामुळे रात्र वैर्‍याची असली तरी घाबरण्याचे कारण नाही.
 
 
श्यामकांत जहागीरदार
9881717817
@@AUTHORINFO_V1@@