अपूर्ण सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करा : मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jul-2018
Total Views |
 
 
 
 
नागपूर : वाशिम जिल्ह्याचा सिंचन अनुशेष जास्त आहे. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण देखील कमी आहे. शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुबार व तिबार पिके घेण्यासोबतच त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी जिल्ह्यात अपूर्णावस्थेत असलेले सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विधान भवनातील मंत्री परिषद सभागृहात वाशिम जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन आज करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री संजय राठोड, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यासह अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.
 
 
 
सिंचनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या बोरव्हा, घोटा शिवणी आणि सत्तर सवंग येथे बलून बॅरेजच्या उभारणीचा सुधारित प्रस्ताव एक महिन्याच्या आत शासनाला सादर करावा. याबाबत शासन एका महिन्यात निर्णय घेईल. पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन जिल्ह्यात सिंचन प्रकल्पाचे काम करावे. जे प्रकल्प होऊ शकतात, तेच प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विशेष लक्ष देण्यात यावे, असे मुख्यमंत्री म्हणाले. जिल्ह्यातील छोटे सिंचन प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीला दिलेल्या ३० कोटी रुपये अतिरिक्त निधीतून निधी उपलब्ध करून द्यावा. जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील नदी खोलीकरणासह इतर प्रस्तावित कामे विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.
 
 
पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकासाच्या दृष्टीने आणखी ५ कोटी रुपये शासनाकडून त्वरित उपलब्ध करून देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (मनरेगा) योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यात ६ हजार विहिरी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी केवळ ८७९ सिंचन विहिरी पूर्ण झाल्या आहेत. तसेच ४८३४ विहिरींचे काम प्रगतीपथावर आहे. या विहिरी तातडीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायतीसोबतच इतर यंत्रणांनाही या कामामध्ये सहभागी करून घेण्याच्या सूचना फडणवीस यांनी दिल्या. तसेच धडक सिंचन विहीर योजनेतून जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या विहिरींपैकी ज्या शेतकऱ्यांना विहिरींची आवश्यकता नाही, त्यांच्याऐवजी लाभार्थी निवड यादीतील गरजू शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
 
 
 
जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सन २०१५-१६ ते सन २०१८-१९ पर्यंतच्या कालावधीत ७०४ कि.मी. लांबीचे रस्ते तयार करण्याचे उद्दिष्ट देण्यात आल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, हे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने उर्वरित सर्व कामांना ३० ऑगस्टपर्यंत मान्यता घेऊन ही कामे तातडीने सुरु करावीत. तसेच जिल्ह्यातील इतर जिल्हा मार्गमधून प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून घोषित केलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
 
 
वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पाचा पाणीसाठा वाढविण्यासाठी या प्रकल्पाच्या सांडव्याची उंची एक मीटरने वाढवावी, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, तसा प्रस्ताव संबंधित विभागामार्फत शासनाला सादर करावा. पैनगंगा बॅरेज परिसरात कृषिपंपांना वीज जोडणी देण्यासाठी ९५ कोटी रुपयांचा आराखडा करण्यात आला आहे. जलसंपदा विभागाने यापैकी २५ कोटी रुपये महावितरणला उपलब्ध करून दिले आहेत. या कामाला गती मिळण्यासाठी जलसंपदा विभागाने एकूण रकमेच्या ५० टक्के रक्कम तातडीने महावितरणला उपलब्ध करून द्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. तसेच जिल्ह्यातील प्रलंबित कृषिपंप वीज जोडण्या लवकरात लवकर देण्यासाठी महावितरणने पायाभूत आराखड्यामध्ये मंजूर झालेली वीज उपकेंद्रांची कामे तातडीने पूर्ण करावीत. ज्या गावांमध्ये ग्राम विद्युत व्यवस्थापकांची आवश्यकता आहे, अशा गावी आयटीआयमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तींची निवड करून त्यांना महावितरणमार्फत पुन्हा एकदा आवश्यक प्रशिक्षण देऊन त्यांची नियुक्ती करावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
 
@@AUTHORINFO_V1@@