उद्योग आणि समाजकार्याचा साकव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jul-2018
Total Views |



सदाशिव लोकरे, याच गिरणी कामगारांपैकी एक. कोल्हापूरमधून येऊन लोअर परळच्या प्रकाश कॉटनमध्ये काम करु लागले. बायको, दोन मुलं आणि एक मुलगी असा प्रपंच सांभाळू लागले. मात्र, संप घडला आणि सगळा संसार रस्त्यावर आला. 

गिरणी कामगार... मुंबईची कोण्या एकेकाळची ओळख. मात्र, १९८२ साली दत्ता सामंतांनी गिरणी कामगारांचा संप घडवून आणला आणि एकेकाळी रुबाब असणारा हा गिरणी कामगार देशोधडीला लागला. गिरणी कामगार म्हटला की त्याचा रुबाबच न्यारा असायचा. मुंबईच्या चाळीत राहणारे हे गिरणी कामगार महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून मुंबईत आले आणि गिरणीमध्ये नोकरीस चिकटले. मुंबई हे नैसर्गिक बंदर आहे, हे ओळखून इंग्रजांनी मुंबईचा विकास केला. त्यानंतर आलेल्या यांत्रिकी युगामध्ये मुंबईत कापड गिरण्या फोफावल्या. चांगला पगार, दिवाळीला बोनस, इतर भत्ते आणि वरुन कापड स्वस्त दरात, एवढं सगळं मिळत असल्याने गिरणी कामगारांचा डौल न्याराच होता. १९८२ नंतरच्या संपानंतर मात्र हे सारं चित्र बदललं. गिरण्या बंद पडल्या. गिरणी कामगार रस्त्यावर आला.

 

मात्र, सदाशिव लोकरेंच्या पत्नीने मालूबाईने त्यांना खंबीर साथ दिली. त्या भायखळ्यावरुन भाजी आणून विकू लागल्या. प्रपंच सावरु लागल्या. त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा सोबत असायचा, पुंडलिक. आपल्या आईवडिलांची ही होणारी ससेहोलपट तो पाहत होता. त्याचवेळी त्याने मनाशी पक्कं केलं की आपण नोकरी करायची नाही तर नोकरी द्यायची. सातवीपर्यंत महानगरपालिकेच्या गणपत कदम मार्ग शाळेत शिकला. अकरावी, बारावीचे शिक्षण एम.डी महाविद्यालयातून पूर्ण केलं. मात्र, परिस्थितीमुळे त्याला पुढे शिकता आलं नाही.

 

शालेय शिक्षण घेत असल्यापासूनच कंदील बनवून विकणे, सरबत विकणे, साईन बोर्ड रंगविणे आदी लहानसहान कामे पुंडलिक करु लागला. लहानपणापासूनच उद्योजकतेचे धडे गिरवू लागला. जे व्यवसाय केले ते सगळे हंगामी होते. मोठा व्यवसाय करायचा म्हणजे भांडवल आलं. तेवढी परिस्थिती नव्हती आणि भांडवल देण्यासारखे दूरवर कोणीच दिसत नव्हतं. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे घरी काहीतरी नियमित येणे आवश्यक होते. त्यामुळे काही काळ नोकरी करणं गरजेचं झालं. एका खाजगी सुरक्षा कंपनीमध्ये त्याला बॅक ऑफिसचं काम मिळालं. पुंडलिकच्या कामातील गतीमुळे आणि प्रामाणिकपणामुळे अल्पावधीतच ‘ऑपरेशन हेड’ व पुढे ‘ऑपरेशन चीफ हेड’ अशा बढत्या मिळाल्या. दरम्यान, या नोकरीमुळे कंपनीची सुरक्षा असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची त्याला संधी मिळाली. या कार्यालयात गेल्यानंतर तिथे कोणत्या प्रकारची सेवा गरजेची असते हे पुंडलिकने पाहिले. या निरीक्षणातूनच त्याने आपला मित्र सुधीर पाटील याच्या मदतीने जून २००२ मध्ये ‘लाईफलाईन सर्व्हिसेस’ नावाची कंपनी सुरु केली. पाण्याच्या टाक्या साफ करण्याचं काम ही कंपनी करायची. ही कंपनी अवघ्या २० हजार रुपये भांडवलावर उभी राहिली. नोकरी सोडून व्यवसाय करण्याच्या निर्णयाला सगळ्यांनी विरोध केला. मात्र, पुंडलिकच्या आई मात्र त्यांच्या पाठिशी ठामपणे उभ्या राहिल्या. एवढंच नव्हे, तर अर्ध भांडवल त्यांनी दिलं. आईचं एवढं मोठं पाठबळ मिळाल्यावर कोणत्याही मुलाला अडविणं अवघडंच! त्याचा प्रत्यय पहिल्याच वर्षी आला. पहिल्या वर्षी दोन कामगार आणि ३० -४० ग्राहक असा कंपनीचा पसारा सुरु झाला. हळूहळू कंपनीचा व्याप वाढला. अवघ्या पाच वर्षांत ५०० ग्राहक वाढले.

 

मात्र, २००७ साली ही भागीदारी संपुष्टात आली. भागीदारी संपुष्टात जरी आली तरी मैत्री मात्र कायम आहे. पुढे पुंडलिक लोकरेंनी ‘मॅक्स फॅसिलिटीज’ नावाने नवीन कंपनी सुरु केली. ही कंपनी कार्यालयीन स्वच्छता, इमारती काच सफाई, पेस्ट कंट्रोल आदी काम करते. वेगवेगळं होताना परस्पर संमतीने सुधीर पाटील आणि पुंडलिक लोकरे यांनी २५० -२५० असे ग्राहक वाटून घेतले. आज पुंडलिक लोकरेंच्या ‘मॅक्स फॅसिलिटीज’कडे ९०० ग्राहक असून या ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी २१ कर्मचारी सदैव कार्यरत असतात. ‘मॅक्स फॅसिलिटी’ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, जीवन विमा निगम, हिंदुजा रुग्णालय, नेरुळचं डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय आदी नामांकित ग्राहकांना सेवा देते. हे सर्व ग्राहक अनेक वर्षांपासून पुंडलिक लोकरेंसोबत जोडलेले आहेत.

 

परळसारख्या कामगार चळवळीच्या परिसरात जन्म झाल्यानेच पुंडलिक लोकरेंच्या रक्तात ती चळवळ आपोआप आली. चर्मकार समाजातील विविध विचारसरणींना सांधणारा पूल म्हणजेच ‘साकव’. या साकव संघटनेची स्थापना पुंडलिक लोकरे यांनी २००७ साली आपल्या अन्य सहकार्‍यांसोबत केली. ही संघटना चर्मकार समाजातील विविध विचारसरणींना एकत्र आणू पाहत आहे. तसेच आपल्याला उद्योजक म्हणून आपल्याला किती संघर्ष करावा लागला याची पुंडलिक लोकरेंना जाणीव होती. आपल्यासारखा संघर्ष मराठी तरुणांच्या वाट्यास कमी यावा, मराठी तरुणांनी नोकर्‍या न करता व्यवसायाची कास धरावी, यासाठी लोकरे यांनी २००९ मध्ये आपल्या अन्य व्यावसायिक मित्रांसोबत एकत्र येऊन ‘मराठी बिझनेस क्लब’ची स्थापना केली. ही संस्था मराठी उद्योजकांना व्यावसायिक कौशल्याचे धडे देते. त्यांना व्यावसायिक व्यासपीठ मिळवून देते. तसेच, या उद्योजकांचा व्यवसाय वाढावा यासाठी प्रयत्न करते.

 

विविध सामाजिक संस्थांमध्ये कार्यरत असताना त्यांना जाणवलेली एक गोष्ट म्हणजे अंत्यसंस्कार. पूर्वी अंत्यसंस्कारास लोक आवर्जून जात. आता मात्र परिस्थिती बदललेली आहे. अमेरिकेत तर काही ठिकाणी सोमवारी जरी मृत्यू झाला तरी शनिवारी किंवा रविवारी अंत्यसंस्कार केले जातात. कारण, या दोन्ही दिवशी सुट्टी असते. थोड्याफार फरकाने ही परिस्थिती भारतात देखील येऊ शकते. किंबहुना, मुलं परदेशात असणार्‍या वृद्ध पालकांची अवस्था बिकट झाली आहे. काळाची ही गरज लक्षात घेऊन पुंडलिक लोकरे यांनी महेश चव्हाण, दत्ता अदाटे, संजय रामगुडे आणि सुरेश साळुंखे यांच्या सोबतीने २०१३ साली ‘सुखान्त फ्युनरल मॅनेजमेन्ट सर्व्हिस प्रा.लि.’ ही अंत्यसंस्कार विधी पुरविणारी कंपनी सुरु केली. या कंपनीसंबंधी संशोधन करत असताना ‘अवयवदान’ ही नवीन गरज त्यांच्या लक्षात आली. कोणतीही व्यक्ती काही अवयवाचे घटक जिवंतपणी तर काही मृत्यूनंतर दान करु शकतो. या दानामुळे काहीजणांच्या आयुष्यातील आनंद परत येऊ शकतो. हा आनंद मिळवून देण्यासाठी पुंडलिक लोकरे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी झोनल ट्रान्सप्लान्ट को-ऑर्डिनेशन कमिटीचा अवयवदानाविषयीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. आता ते अवयवदानाविषयी लोकांत जागरुकता निर्माण करत आहेत.

 

‘स्वच्छ भारत’ मोहिमेत सहभागी होऊन ते ‘शून्य कचरा’ अभियानासाठी पूर्ण झटून काम करत आहेत. आभार फाऊंडेशनच्या माध्यमातून ते शून्य कचरा मोहीम प्रभावीपणे राबवित आहेत. कचरा हे सोनं आहे. हा एक प्रचंड मोठा उद्योग असून जर कोण्या मराठी तरुणाला या उद्योगक्षेत्रात यायचं असेल तर आपण सर्वतोपरी मदत करण्यास तत्पर आहोत, असे लोकरे सांगतात. ‘लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशिप अ‍ॅण्ड एक्सलन्स’ या संस्थेतर्फे ‘लक्ष्यवेध व्हिजनरी आंत्रप्रिन्युअर अवॉर्ड’ नुकताच त्यांना प्रदान करण्यात आला.

 

कोणताही उद्योजक हा कुटुंबाच्या पाठिंब्याशिवाय उभा राहू शकत नाही. पुंडलिक लोकरेंच्या पाठिशी त्यांची आई ठाम उभी होती म्हणून ते उद्योजक झाले. पण, या उद्योजकाचा कायापालट केला ते पुंडलिक यांच्या अर्धांगिनी रागिणी लोकरे यांनी. गृहखातं सांभाळून ‘मॅक्स फॅसिलिटीज’चा कारभार देखील त्या पाहतात. आदिती आणि आयुष ही दोन मुले देखील तेवढीच तोलामोलाची साथ आपल्या वडिलांना देत आहेत. उद्योग आणि समाजकार्य या दोहोंची सांगड घालून माणुसकीचा उत्तम साकव त्यांनी साकारलेला आहे.

 

-प्रमोद सावंत

 
@@AUTHORINFO_V1@@