जहाँ हुए बलिदान मुखर्जी, वह कश्मीर हमारा है...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jul-2018
Total Views |


 

भारतीय संस्कृतीचे निस्सीम उपासक, थोर शिक्षणतज्ज्ञ, भारतीय जनसंघाचे संस्थापक, लोकशाही संकेताचे भाष्यकार, अद्वितीय संसदपटु आणि काश्मीरसाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे भारतमातेचे थोर सुपुत्र डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी

राजकारणाला नैतिक अधिष्ठान असावे. राजकारण युद्ध असावे, असा उपदेश अनेक महाभाग करीत असतात. पण, मुळात ते राजकारणात सहभागी होतात, तेच मुळी काही स्वार्थी हेतू मनात ठेवून. नाव, लौकिक, पैसा, सत्ता स्थानावरुन इतरांना उपकृत करण्याची संधी मिळल्यामुळे वाढणारे स्वत:चे महत्त्व अशा एक ना दोन अनेक तर्‍हांनी राजकारणापासून होणारा लाभ पदरात पाडून घेण्यासाठी राजकारणाची कास घेणारेच अनेकजण आढळतात. अंगीकृत ध्येयवादाला व राष्ट्रीय स्वाभिमानाला प्रतिबंध होऊ लागला, तर प्राप्त कर्तव्य म्हणून राजकीय आघाडीवर झुंजण्यासाठी पुढे येणारे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींसारखे दशसहस्त्रेषु एखादेच.

 

आदर्शवादावर या देशातील राष्ट्रीय अभिमान स्थानांवर, प्रतिष्ठाकेंद्रावर होणारे प्रहार थांबविण्यासाठी, या प्रहारांना प्रतिप्रहारांनी उत्तर देण्यासाठी डॉ. मुखर्जी यांनी राजकीय आघाड्यांवर झुंज दिली. त्यांच्या प्रखर राष्ट्रनिष्ठा असलेल्या दृष्टीला हे कळून चुकले की, या देशाचे चैतन्य जोपासावयाचे असेल, तर केवळ एका विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात काम करून भागणार नाही. या देशाच्या सार्‍या प्रेरणाच नष्ट करण्याची कारस्थाने गतिमान होत असताना चौफेर लढा देणे जरुरीचे आहे. जनजागरणाचे या देशाच्या राष्ट्रीय अस्मितेचे हे पवित्र कर्तव्य पार पाडण्याच्या भूमिकेतून श्यामाप्रसाद राजकीय आखाड्यात उतरले. त्यांच्या राजकीय कार्याचा पाया हा असा उदात्त ध्येयवादी होता. त्यामागची प्रेरणा वैयक्तिक स्वार्थाची नव्हती. संधीसाधू अधिकार-लालसेची नव्हती, तर पडतील ते कष्ट सोसून, वाट्टेल त्या पराकोटीचा त्याग करून भारताचे राष्ट्रीय जीवन उन्नत करण्याची नैतिक प्रेरणा त्यांच्या राजकारण प्रवेशामागे होती. त्यामुळे त्या राजकारणाला स्वाभिमानाची प्रखर धार होती. त्यांत सहभागी होणार्‍यांना राजकारणातल्या पावित्र्याचा नैतिक धाक होता. हेतू शुद्धतेचा आत्मविश्‍वास होता.

 

आपल्या उंच व धिप्पाड देहाने आणि आजवरच्या तेजस्वी जीवनाने प्राप्त झालेल्या नैतिक शक्तीने या देशाचे आपण उत्तम प्रकारे संरक्षण करु, त्यांचे चैतन्य प्रज्वलित करू, अशी ग्वाहीच जणू राजकारणात प्रवेश करून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींनी जनतेला दिली. स्वातंत्र्य आणि स्वाभिमान यांच्या प्रवाहांनी गतिमान झालेल्या या गंगेला राजकारणात साथ देणे आणि प्रखर हिंदुत्वाच्या राष्ट्राभिमानाने खळखळणार्‍या नाशिकच्या गोदावरीने हात पुढे केला. बंगालच्या फाळणीचे वेळेस कर्झनचा कर्दनकाळ झालेले लाल-बाल, १९३२ नंतर मुखर्जी-सावरकर झाले. केवळ ब्रिटिशांशीच नाही, तर त्यांना साथ देणार्‍या जातीय मुस्लीम लीगशी व या दोघांच्या कुटील कारवायांचे भक्ष बनलेल्या काँग्रेसशी तिरंगी सामना देण्यासाठी हा गोदा-गंगा संगम खळखळत पुढे आला. सार्‍या देशांत स्वाभिमानाचे, जागृतीचे, राष्ट्रीय अस्मितेचे प्रवाह वाहू लागले. रत्नागिरीच्या नजरकैदेतून मुक्त झालेले स्वातंत्र्यवीर सावरकर आणि कलकत्ता विद्यापीठाची धुरा उतरवून ठेवून देशकार्यासाठी चौफेर नजर टाकणारे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची कलकत्ता येथे झालेली भेट हा एक अपूर्व आणि कांचनयोग मानला पाहिजे. ब्रिटिशांच्या चिथावणीला बळी पडून हिंदुस्थानच्या राजकारणात मुस्लीम लीगने कालवलेले जातीयतेचे विष पचवायचे असेल तर या देशात बहुसंख्येने असणार्‍या हिंदूंचा स्वाभिमान व राष्ट्र कर्तव्याची भावना चेतवली पाहिजे, ही जाणीव दोघांनाही झाली होती.

 

कलकत्ता विद्यापीठ व बंगाल विधानसभा यामधील दहा वर्षांच्या कटू अनुभवांनी डॉ. मुखर्जी यांची ही खात्री पटली होती की, या देशाची मातृभूमी म्हणून चिंता करणार्‍या हिंदूंची सुख-दु:खे समजून घेऊन त्यांच्याशी समरस होण्याऐवजी या देशाचे तुकडे करावयास निघालेल्या मुस्लीम लीगशी जवळकीने वागण्याचे काँग्रेसचे धोरण हे आत्मघातकी अनुनयाचे आहे. त्यामुळे देशाखेरीज अन्यत्र कोठेही आसरा नसणार्‍या या देशाशी स्वाभाविक निष्ठा निगडीत झालेल्या बहुसंख्य हिंदू जनतेलाच अपमानास्पद जीणे जगावे लागत आहे. येथील राष्ट्र जीवनाच्या जीवंत प्रवाहाचे त्यामुळे डबके बनत आहे आणि नाना विकृतींचे डास-कीटक त्या समाजाला पोखरत आहेत. अशावेळी हिंदूंच्या हिताला प्राधान्य देणार्‍या राजकीय, सांस्कृतिक संघटनाच या देशाचे खरे कल्याण करू शकतील, या स्वा. सावरकरांच्या व डॉ. हेडगेवार यांच्या विशुद्ध विचारसरणीचा प्रभाव डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यावर पडला. त्यामुळेच कलकत्ता येथील हिंदू महासभेच्या अधिवेशनात श्यामाप्रसादांनी अतीव हिरीरीने व तळमळीने भाग घेतला. हिंदू महासभेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची या अधिवेशनात निवड झाली. या पदावरून त्यांनी केलेले राष्ट्रजागृतीचे प्रभावी कार्य देशात नवचैतन्य निर्माण करणारे ठरले.

 

भारतीय राजकारणाचा एक तेजस्वी कालखंड सुरू झाला. आज पाकिस्तानची भारतविरोधी, शत्रुत्वाची ठाम भूमिका काँग्रेसलाही क्षणोक्षणी कबुल करावी लागते. हे पाहिल्यावर डॉ. मुखर्जींचा निर्णय किती ऐतिहासिक, महत्त्वाचा व मोलाचा होता याची प्रचिती सहजतेने येते. भारतातील विचारवंत मुस्लीमही आज जेव्हा मुस्लीम लीग फुटीरतेबद्दल व भारताच्या हितसंबंधांच्या आड येणार्‍या तिच्या हिंदूद्रेष्टेबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करणारी भाषणे व लिखाण करताना दिसतात. तेव्हा बॅ.जीनांच्या मुस्लीम लीगच्या करस्थानाची पावले वेळीच ओळखून देशाला सावध करणार्‍या डॉ. मुखर्जी यांच्या दूरदृष्टीबद्दल आदरच वाटतो.

 

अव्वल दर्जाचा थोर शिक्षणतज्ज्ञ म्हणून सर्वांगी नावाजलेले डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी या देशाच्या भूत, वर्तमान व भविष्याशी निगडीत झालेल्या व या देशात संख्येनेही बहुसंख्य असणार्‍या हिंदूंवर होणारा हा अन्याय सहन करू शकत नव्हते. कोणत्याच तर्काला, राज्यशास्त्रीय सिद्धांताच्या कसोटीला हा विरोधाभास उतरत नव्हता. या देशाचे उज्ज्वल भवितव्य घडविण्याची आकांक्षा बाळगणारे सारेच हिंदू या अल्पसंख्याकांच्या हितसंबंधी राजकारणापायी होरपळून निघत असताना वैयक्तिक लाभ वा कीर्ती, चांगली नोकरी मिळविण्यासाठी किंवा तथाकथित प्रतिष्ठित राजकारण करणेसाठी काँग्रेसशी जवळीक यातले काहीही करणे हाडाच्या या देशभक्ताला मानवणारे नव्हते. त्यांनी राजकारणात उडी घेतली ती या देशातील बहुसंख्य जनतेचा अन्याय थांबविण्यासाठी. तिची विस्मृती घालवून तिला कार्यप्रवण करण्यासाठी या देशाचे चैतन्य जागविण्यासाठी. त्यांचा निर्णय किती अचूक होता व जनतेला धीर देणारा होता, याची प्रचिती लगेचच आली. पाकिस्तानचा एक महत्त्वाचा घटक म्हणून मुस्लीम लीगने व ब्रिटिशांनीही बंगाल कटकारस्थानाचे प्रभावी केंद्र बनविले होते. डॉ. मुखर्जींनी हिंदू महासभेच्या सुरू केलेल्या कार्याला बंगाली सुशिक्षितांचा पाठिंबा जोरदारपणे मिळू लागला. आपल्या अलौकिक नेतृत्वगुणांनी व हिंदू राष्ट्रीयत्वाची न्याय्य भूमिका यशस्वी झालीच पाहिजे, या तळमळीने सारा बंगाल नवचैतन्याने ओसंडून जाऊ लागला आणि त्या लाटांच्या खळखळाटाचे पडसाद सर्वत्र ऐकू येऊ लागले. डॉ. मुखर्जी हे जितके लोकशाही संकेताचे आग्रह धरणारे आहेत, तितकेच त्यांचे अनुयायी लोकशाही सभांवर गुंडगिरीने हल्ला करणार्‍यांचा समाचार घेऊन लोकशाहीचे संरक्षण करणारे आहेत, हे सुभाषचंद्र बोस यांना कळून चुकले. त्यांनी डॉ. श्यामाप्रसादांची अधिक मैत्री व्हावी म्हणून हालचाल सुरु केली व राष्ट्रासाठी चळवळ करणार्‍या आपल्या पुढील संकल्पना सांगून डॉ. मुखर्जींचे मार्गदर्शन घेतले. डॉ. मुखर्जी सुभाषबाबूंचे आदरणीय नेते बनले. भारतीय राजकारणात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हे एक प्रभावी शक्तिकेंद्र म्हणून सर्वत्र संचार करू लागले.

 

एकीकडे काँग्रेसी धोरणामुळे होणारा अवसानघात जनतेला समजावून देऊन तिला राष्ट्रवादी चळवळीचे महत्त्व समजावून आणि दुसरीकडे ब्रिटिश-मुस्लीम युतीमुळे भारतावर येणार्‍या लांडगेतोडीच्या संकटाशी उपलब्ध शक्तीनिशी मुकाबला करणे अशा दोन्ही आघाड्यांवर सव्यसाची कुशलतेने श्यामाप्रसाद लढत होते. आपल्या धनगंभीर आवाजातील विद्वत्तापूर्ण व तर्कशुद्ध भाषणांनी आणि देशातील राष्ट्रीय जनतेच्या भवितव्याविषयीच्या तळमळीने ते सारा देश खडबडून जागा करीत होते. आपले जीवन ध्येयधुंद अशा अवस्थेत ते देशसेवेत समर्पण करीत होते. प्रत्येक आघाडीवर मुत्सद्देगिरीचे डावपेच वटवून ते अंतिम ध्येयाकडे जनतेला आपल्याबरोबर नेत होते. रक्तपाती अत्याचार करून पाकिस्तान मिळविल्यानंतर देखील पाकिस्तानी बकासुरांची भूक शमलेली नव्हती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अवघ्या दोनच महिन्यात पाकिस्तानने काश्मीवरवर स्वारी केली आणि भारतीय राजकर्त्यांच्या तोंडचे पाणी पळवण्याचा प्रयत्न केला. काश्मीरविषयक असलेली वडीलोपार्जित भावना आणि शेख अब्दुलांच्या तथाकथित पुरोगामी नेतृत्वाविषयीचा फाजील आत्मविश्‍वास यामुळे काश्मीरवर सैन्य पाठविण्यास पं. नेहरु तयार होईनात. पण, ज्यावेळी काश्मीर पाकिस्तानला जाऊन मिळण्याचा घाट घातला गेला आणि डॉ. मुखर्जींनी या प्रश्‍नावर भारताची प्रतिष्ठा जाते याची जाणीव करून दिली, तेव्हा काश्मीरच्या बाबतीत हालचाल करणेच पंडीतजी तयार झाले. त्यातही सार्वमताची अनावश्यक घोषणा करून भारतीय हितसंबंधांच्या दृष्टीने पं. नेहरुंनी केवळ अनर्थ करून ठेवला याची प्रचिती स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या गेल्या 70 वर्षांत अगदी या क्षणापर्यंत येत आहे. पाकिस्तानशी जशास तसे धोरण ठेवले पाहिजे आणि काश्मीरचा प्रश्‍न ‘युनो’तून काढून घेतला पाहिजे, ही डॉ. मुखर्जी यांची भूमिकाच राष्ट्रहिताची होती. याची सत्यता आज अनुभवास येत आहे. स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात त्यांना सन्मानाचे स्थान देण्यात आले. पण, पं. नेहरुंशी काश्मीर प्रश्‍नावरून झालेल्या संघर्षाचे रुपांतर त्यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यात झाले. ज्या आशेने आणि जे समर्थ संपन्न भारताचे स्वप्न उराशी बाळगून ते स्वातंत्र्य भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात सामील झाले होते, त्या आशाआकांक्षा पूर्ण करावयाच्या असतील, तर सत्तेचा त्याग करणेच त्यांना भाग पडावे, हे किती विचित्र! पण, हे कटू सत्य त्यांना कळून चुकल्यावर त्यांनी सत्तेचा मोह न धरता जनजागृतीसाठी मंत्रिपदावर पाणी सोडले.

 

डॉ. मुखर्जी यांनी कार्याचा वृक्ष लावायचा, द्वेष करणार्‍यांनी वा त्यांचे महत्त्व न समजणार्‍यांनी त्यावर आघात करावयाचे आणि फळाची अपेक्षा न करता या कर्मयोग्याने विरक्त व्हावयाचे. वृक्ष बहरतच राहावयाचा. कलकत्ता विद्यापीठ, बंगालमधील हक्क मंत्रिमंडळ आणि आता केंद्रीय मंत्रिमंडळ या सर्व प्रसंगी हेच दिसून आले की, कर्तव्य की मोह सत्ता की तत्वनिष्ठा असे द्वंद निर्माण झाले की हा थोर सत्पुरूष व हाडाचा समाजसेवक सत्ता, मोह, लोभ यांना ठोकारून देतो आणि तपश्चर्येच्या नैतिक सामर्थ्यावर आपल्या कार्याला अधिकच मोठ्या प्रमाणात साथ मिळवितो. कार्याला नवीनच धार आणतो. दि. १ एप्रिल १९५० रोजी डॉ. मुखर्जींनी मंत्रिपदाची वस्त्रे उतरविली आणि सार्‍या भारतीय जनतेच्या मनांत त्यांनी आपल्या त्यागी व कर्तव्यनिष्ठ जीवनाचा चिरंतन ठसा उमटविला. हिंदू महासभेचे मुखर्जी आता सार्‍या राष्ट्रवादी लोकशाही निष्ठ जनतेचे नेते बनले. देशातील पर्यायी शक्ती म्हणून सारे पक्षोपक्ष त्यांच्या नेतृत्वाकडे मोठ्या आशेने पाहू लागले. कर्तृत्वाचे विशाल क्षितीज त्यांच्या स्वागतासाठी आसुसले होते. पं. नेहरु व सरदार पटेलांच्या राजीनामा परत घेण्याच्या विनवण्या आता त्यांच्या सुटलेल्या बाणाला परतवू शकल्या नव्हत्या. समाजसेवेच्या तपश्चर्येनेच जनतेच्या हृदयमंदिरात स्थान मिळविणार्‍या डॉ. मुखर्जींना सत्ता संपली. अधिकारपद गेले. पुढे काय? असा प्रश्‍न कधीच पडला नाही. किंबहुना, त्यांच्या उत्तुंग कर्तृत्वाच्या समुद्राला सत्तास्थानाच्या मर्यादा अडवू लागल्यावर त्या तटबंदीला कोसळवून टाकूनच डॉ. मुखर्जींचा ध्येयवादी जीवनप्रवाह खळाळून वाहू लागे व त्यामुळे सारे वातावरण चैतन्याने उचंबळून निघे.

 

एकीकडे सत्तास्थानावरून दूर जाण्याच्या धमक्या देऊन, दुसरीकडे आपले आसन स्थिर करण्याच्या कारवाया करीत राहाण्याचा ढोंगीपणा श्यामाप्रसादांना मानवलाच नाही. सत्तेची गुलामी हीच कर्तृत्वाची आधारशीला ठरवण्याइतके खुजेपण त्यांच्यात कधीच नव्हते. आपल्या नैतिक सामर्थ्याने व तपश्‍चर्येच्या तेजाने इतरांना दिपवून आपले नेतृत्व करणार्‍या पुरूष सिंहाचा डॉ. मुखर्जी हा पराक्रमी छावा होता. ‘स्वयंमेव मृगेंद्रता’ हा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शिकविलेल्या महामंत्र जपणे हाच या नरपुंगवाचा बाणा होता. त्यामुळे सत्तेचे वलय संपले की क्षुद्र कारस्थानांत गुरफटून घेत गुजराण करणेची लाचारी या राजकारण धुरंधराला कधीच पत्करावी लागली नाही. स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणार्‍या काँग्रेसचे सारे तपश्चर्या सामर्थ्य संपले आहे आणि स्वतंत्र भारताची अस्मिता, स्वतंत्र भारताचे सर्वांगीण सामर्थ्य प्रकट करील अशा पर्यायी शक्तीचा उदय होणे आवश्यक आहे, हे डॉ. श्यामाप्रसादांच्या लक्षात आले. राष्ट्रीय पुनरुत्थानाची जिद्द व सामर्थ्य जोपासून लोकशाही राष्ट्रवादाला सामर्थ्यशाली व्यावहारिक आशय प्राप्त करून देणार्‍या आणि आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात भारतीयत्वाची उपासना करणार्‍या अशा देशव्यापी संघटनेशिवाय ही भोंगळ ध्येयशून्य राजनीती संपणार नाही, याची मनोमन खात्री त्यांना पटली. स्वतंत्र भारताची प्रतिमा जगात तेजस्वीपणे उजळलेली पाहाण्याची स्वाभाविक राजकीय आकांक्षा त्यांना अस्वस्थ करीत होती. या विचारमंथनातूनच एका राष्ट्रवादी विचारसरणीचा राजकीय पक्ष, भारतीय जनसंघाच्या माध्यमातून उदयास आला. दि. २१ ऑक्टोबर १९५१ रोजी भारतीय जनसंघाची स्थापना करणेत आली. केवळ सार्वत्रिक निवडणुकीकरिता जनसंघाचा जन्म झालेला नाही, तर राष्ट्रघडणीच्या विशेष व चिरकालीन कार्यासाठीच जनसंघाची स्थापना झाली आहे, हा डॉ. मुखर्जींचा संदेश किती प्रामाणिकपणाचा होता व जनसंघाने तो किती श्रद्धेने जतन केला, याची प्रचिती जनसंघाच्या अविरत कार्याने सार्‍या भारतीयांना आली. निवडणुकीपुरते स्वार्थासाठी जन्माला आलेले पक्ष आले नि गेले, पण राष्ट्रीय सामर्थ्य जोपासण्याची जबाबदारी घेणेसाठी कार्यप्रवण झालेला जनसंघ यशापयशाच्या ऊन-सावलीत ध्येयवादाची जोपासनाच करीत राहिला. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे 21 ऑक्टोबर 1951 या ऐतिहासिक दिवसाचे पुढील बोल दीपस्तंभासारखे सदैव मार्गदर्शन करीत राहाणार आहेत.

 

हमे पुर्ण विश्वास, आशा और उत्साह के साथ इन मंगलपथ की ओर अग्रेसर हो रहे है । हमारे कार्यकर्ता बराबर यह ध्यान में रखे कि केवल सेवा और त्याग के बलपर ही वे जनता का विश्वास जीतनेमें सामर्थ हो सकेंगे । हमारे सन्मुख स्वतंत्र भारत के पुनर्जीवन और इसके पुननिर्माण का महान कार्य है । जननी जन्मभूमी वर्ग, शांति और धर्म के भेदभाव को छोड अपने सभी बच्चोंको आव्हान कर रही है । वर्तमान का चित्र अभी चाहे कितना ही कलिमापुर्ण क्यों न हो, आनेवाले वर्षोमें भारत का अपनी भाग्यरेखा खीचती है । सर्व शक्तीमान प्रभू हमें गन्तव्य पथ पर अविश्रांत चलने की प्रेरणा शक्ती और धैर्य दे । हम भय और प्रलोभनोंकी झंझट से अविचलित रहर भारत को आध्यात्मिक एवं भौतिक दृष्टीसे महान और शक्तीशाली बनाएँ । ताकी वह विश्वशांती और समृद्धीकी रक्षा में आदर्श रूप में सहाय्यक हो सके ।

 

लोकजागृतीसाठी देशभर दौरे काढून त्यांनी पाकिस्तानकडून काश्मीर बळकावण्यासाठी होणार्‍या कटकारस्थानांकडे जागरुकतेने लक्ष ठेवण्याची जाणीव दिली होती. इतकेच नाही, तर अखेरीस पाकिस्तानला सोयीस्कर अशी देशघातकी भूमिका घेणारे काश्मीरचे तत्कालीन पंतप्रधान स्वयंभू तारणहार शेख अब्दुल्ला यांच्या कैदेत असताना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, हे सिद्ध करताना गुढ गुप्ततेच्या वातावरणात दि २३ जून १९५३ रोजी मरण पत्करावे लागले. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात उत्तुंग कर्तृत्वाने चमकणार्‍या भारताच्या या थोर सुपुत्राला आणि प्रखर राष्ट्रभक्ताला पं. नेहरुशाही दुटप्पी चालीने, कपटी वर्तन करणार्‍या शेख अब्दुल्लांच्या कैदेत एकाकी अवस्थेत मरण पत्करावे लागले. काश्मीर भारताचे नंदनवन. ते भारतापासून वेगळे होऊ नये, म्हणून जीवाचे रान करणार्‍या श्यामबाबूंवर सत्तांध कारस्थाने करणार्‍या शेख अब्दुल्लांनी अखेर मृत्यूच्या स्वाधीन होण्याची वेळ आणली. अंत:करणाला असह्य वेदना व्हाव्यात, सच्चा भारतीयांची, देशभक्तांची हृदये पिळवटून जावीत, अशा वातावरणात दि. २३ जून १९५३ या दिवशी डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी यांचे काश्मीरसाठी, काश्मीरमध्ये निशांत या जेलमध्ये बलिदान झाले.

 

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्‍लिंटन मार्च २००० च्या अखेरीस भारतात आले होते. काश्मीरची प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ही दक्षिण आशियातील सर्वाधिक स्फोटक व गंभीर समस्या असल्याचे भाष्य त्यांनी केले होते. पण, ही सर्वाधिक स्फोटक व गंभीर परिस्थिती निर्माण होऊच नये यासाठी भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळातील उद्योगमंत्री व त्यावेळच्या भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जीवापाड प्रयत्न करून पं. नेहरू यांना काश्मीरप्रश्‍नाबाबत राष्ट्रहिताच्या तळमळीने सावध होण्याचा इशारा ५० वर्षांपूर्वीच दिला होता. आज २१ व्या शतकाच्या उंबरठ्यावर इंटरनेट युगाकडे भरारी सुरू असताना दैवयोग असा की, डॉ. मुखर्जींनी पं. नेहरुंकडून अपेक्षिलेली व्यापक राष्ट्रहिताची भूमिका आणि काश्मीर प्रश्नांवर जागतिक समर्थन मिळविण्याची पं. नेहरुंची आकांक्षा, डॉ. मुखर्जींच्या सहवासात उदात्त राजनीतीचे पाठ घेतलेले, त्यांचे स्वीय सहाय्यक असलेले अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना अनुभवायला आले. पण, डॉ. मुखर्जींनी बलिदान केले ती भावनात्मक, तात्विक, व्यावहारिक, निखळ एकात्मता काश्मीरमध्ये अनुभवास येत नाही. उलट अब्जावधी रुपये केंद्र शासनाने काश्मीरसाठी खर्च केले. हजारो जवानांचे रक्त सांडून लाखो अंत:करणे पेटून कार्याला आली. अखंड भारतासाठी आपल्या प्राणांची आहुती देण्यासाठी तयारी झाली. त्यांनी लावलेल्या राष्ट्रप्रेमाच्या नंदादीपाची ज्योत कोट्यवधी भारतीयांची अंत:करणे उजळवून टाकीत आहेत. त्यांचे जीवनविचार, त्यांच्या प्रेरणाचा साकार करण्यासाठी कोटी कोटी भूजा कार्यप्रवण होत आहेत. डॉ. मुखर्जी यांनी आपल्या पवित्र समिधेने चेतवलेली प्रखर राष्ट्रीयत्वाची ज्योत त्यांच्या असंख्य अनुनयांच्या कार्यनिष्ठेच्या, श्रद्धेच्या तेजाने प्रज्वलित होऊन सारे वातावरण उजळीत आहेत.

 

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी पार्थिव शरीराने गेले इतकेच. पण त्यांचा आत्मा अखंड भारतासाठी जीवनसर्वस्व अर्पण करणेस कोणत्याही क्षणी तयार असणार्‍या तेजस्वी तरुणांच्या रुपाने भारतातच वावरतो आहे. भारतीयांना चिरंतन प्रेरणा देणारे त्यांचे काश्मीरच्या बलिवेदीवरचे बलिदान राष्ट्र उभारणीच्या यज्ञातील पवित्र समिधा आहे. समर्थ, संपन्न, सुसंघटित भारत निर्मितीच्या यज्ञदेवतेला अर्पण झालेली ती एक परम मंगल आहुती आहे. या यज्ञाने सारे विश्व उजळून निघण्याची अंतिम यशदायी ग्वाही डॉ. मुखर्जींच्या पवित्र व तेजस्वी बलिदानाने सार्‍या जगाला दिली गेली आहे! हा यज्ञ अखंड चालू ठेवण्याची प्रेरणा डॉ. मुखर्जी यांची स्मृती प्रत्येक भारतीयाला देत आहे!! डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी अमर आहेत!!!

 

जहाँ हुए बलिदान मुखर्जी - वह कश्मिर हमारा है ॥

नही नही जागीर किसीकी - वह कश्मिर हमारा है ॥

॥ भारत माता की जय ॥

॥ वंदे मातरम् ॥

-अरुण शेंदुर्णीकर

@@AUTHORINFO_V1@@