पुणे विद्यापीठाची विद्यार्थिनी ठरली ‘कोल इंडिया’ कंपनीतील पहिली दृष्टीदिव्यांग अधिकारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jul-2018
Total Views |

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दोन माजी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या यशोगाथा

 
 
 
 
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील हिंदी विभागाच्या वतीने काही वर्षांपासून सातत्याने रोजगारप्रधान शिक्षण देण्याला प्राधान्य दिले जात आहे. या माध्यमातून दृष्टी-दिव्यांगांना (पूर्ण किंवा अंशतः दृष्टिदोष) शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात इतर विद्यार्थ्यांच्या बरोबर शिक्षण घेण्याची संधी विद्यापीठात मिळत असल्याची उदाहरणे आशादायी आहेत. हिंदी विभागाचे माजी विद्यार्थी असणारे निशांत शहा आणि माजी विद्यार्थिनी सोनम साखरे सध्या शासकीय सेवांमध्ये भाषा अधिकारी पदावर कार्यरत आहेत.
 
त्यांची ही यशोगाथा -
 
 
‘कोल इंडिया’ कंपनीतील पहिली दृष्टीदिव्यांग अधिकारी : सोनम साखरे या अतिशय साध्या शेतकरी कुटुंबातील आहेत. त्या मूळच्या चंद्रपूर तालुक्यातील. त्या या वर्षी ‘कोल इंडिया’ या कंपनीत भाषा अधिकारी पदावर नियुक्त झाल्या आहेत. त्यांच्याशी फोनवर झालेल्या संवादात सोनम साखरे यांनी सांगितले की, कोल इंडिया या शासकीय कंपनीत दाखल होणाऱ्या आपण पहिल्या दृष्टिदिव्यांग कर्मचारी आहोत. तिथे काम करताना वरिष्ठ व सहकारी वर्ग विविध स्वरूपात सतत मदत करीत असतात. नोकरीसाठी मुलाखत सुरू झाली तिथून नियुक्ती झाल्याचा पहिला दिवस ते आजपर्यंत रोज सगळेजण आपलेपणाने समजून घेतात. तंत्रज्ञानाच्या मदतीने व विद्यापीठात मिळालेल्या दर्जेदार शिक्षणाने मला इथे काम करताना कधीही अडचणी येत नाहीत. सर्व प्राध्यापक विशेषतः विभागप्रमुख प्रा. सदानंद भोसले सर नवीन संधी आणि ती संधी रोजगार म्हणून कशी मिळवता येईल यावर सतत मार्गदर्शन करत होते. त्यासाठी इतर आवश्यक प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यापर्यंत त्यांनी मदत केली म्हणून आज बिलासपूरला आपण राजभाषा अधिकारी या पदावर कार्यरत झालो आहोत.
 
“या प्रवासात आजीने आणि आईने मला खूप मोठी मदत केली. माझी आजी तिच्या वेळची सातवी शिकलेली होती. ती काम करून दमलेली असली तरी मला शालेय जीवनापासून सगळे धडे मला वाचून दाखवायची. म्हणून मी इथपर्यंत पोहोचू शकले. घरात बाई शिकली तर पूर्ण कुटुंब शिकते यावर माझा यामुळेच विश्वास बसतो. तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. अडचणींचा बाऊ करू नये. उपलब्ध पर्यायांमध्ये उत्तम गोष्टी निवडल्यास यश नक्की मिळते. इथेच न थांबता केंद्रीय स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत आहे. विकासाचे सगळे मार्ग आपण तपासत राहिले पाहिजेत,” अशा भावना सोनम हिने व्यक्त केल्या.
 
दृष्टीदिव्यांग निशांत शहा यांच्या पावलावर पाऊल : विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे माजी विद्यार्थी निशांत शहा हेसुद्धा सध्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये राजभाषा अधिकारी पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या साडेतीन वर्षांपासून तिथे आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून सोनम हिने अधिकारपदापर्यंत वाटचाल केली आहे. निशांत शहा यांची कहाणीही अशीच आहे. त्यांनाही जन्मतः दृष्टीदोष होता. त्यांना केवळ २ ते ३ टक्के दृष्टी आहे. त्यांनीसुद्धा हिंदी विभागात मिळालेले तसेच, जिद्द व मेहमतीच्या जोरावर प्रवेश परीक्षेची तयारी केली.
 
निशांत शहा सांगतात, प्रत्येक विद्यार्थ्याला शिकत असताना अशा प्रकारे विविध संधींची माहिती मिळू शकते. यासाठी संपर्क उत्तम ठेवला पाहिजे. आपल्या अनुभवाचा फायदा इतरांना व्हावा यासाठी आजी माजी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या संपर्कात राहिले पाहिजे. सोनम साखरे यांना आज फार कमी वयात प्रथम श्रेणी अधिकारी म्हणून नियुक्त होणे हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण होता. मला वैयक्तिकरित्या प्रा. सदकानंद भोसले सरांनी सतत मार्गदर्शन केले. म्हणून सरकारी नोकरीत जावे असा विचार माझ्या मनात कायम राहिला. दृष्टीदोष किंवा कोणतेही शारीरिक व्यंग जरी असले तरी त्यावर मात करणे शक्य आहे.
 
विद्यार्थी अत्यंत मेहनतीने कौशल्यपूर्ण शिक्षण शारीरिक अडचणींवर मात करून जिद्दीने पूर्ण करत आहेत ही हिंदी विभागासाठी अभिमानाची बाब असल्याचे विभागप्रमुख प्रा. डॉ. सदानंद भोसले यांनी सांगितले.
 
ते म्हणाले, दृष्टिदोष असताना आधुनिक तंत्रज्ञानाच्या व कुटुंबिय यांच्या सहकार्यामुळे हे विद्यार्थी विद्यापीठ स्तरीय शिक्षणापर्यंत पोहोचतात. त्यांना रोजगार मिळणे व तो रोजगार स्वाभिमानाने जगण्यासाठी सक्षम करणारा असावा याकडे विद्यापीठाचे नेहमी लक्ष असते. थोडे प्रयत्न व योग्य मार्गदर्शन मिळाल्यास उत्तम ठिकाणी व योग्य पदावर विद्यार्थी नियुक्त होऊ शकतात, असा विश्वास निर्माण करण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो. संधी कुठे उपलब्ध आहेत आणि त्यासाठी इतर कौशल्यांची असणारी आवश्यकता याची माहिती घेऊन गेल्या वर्षी अभ्यासक्रमात आम्ही बदलही केला. माजी विद्यार्थ्यांना तिथेपर्यंत पोहोचताना द्याव्या लागणाऱ्या चाचणी परीक्षांची माहिती घेऊन तसे बदल हिंदी विभागाने स्वीकारले आहेत. असे बदल हे फक्त उत्तम संवाद व विद्यापीठातून बाहेर पडल्यावर देखील संवाद कायम ठेवल्याने शक्य झाले आहे. दोन्ही विद्यार्थी चांगल्या पदावर कार्यरत आहेत याचा विद्यापीठाला विशेष आनंद आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@