राहुल गांधींना ‘वाकडी’ प्रकरणी ट्विट करणे पडले महागात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jul-2018
Total Views |

चुकीबद्दल दहा दिवसांत देणार स्पष्टीकरण

 
 
नवी दिल्ली, ४ जुलै :
जामनेर तालुक्यातील वाकडी येथे विहिरीत पोहायला गेलेल्या मुलांना झालेल्या मारहाणीबद्दल ट्विटरवर भाष्य करून आणि त्याचा व्हिडीओ अपलोड केल्याबद्दल कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना महाराष्ट्र बालहक्क आयोगाने बजावलेल्या नोटीसचे उत्तर देण्यासाठी राहुल गांधी यांनी दहा दिवसांची मुदत मागितली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी ‘जळगाव तरूण भारत’शी बोलतांना दिली.
 
 
वाकडीप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून चार आरोपींना अटक करून त्यांच्याविरूध्द पॉक्सोअंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर राहुल गांधी यांनी ट्विट करून पीडित मुलांचा व्हिडिओ अपलोड केल्याने बालहक्क कायद्याचे उल्लंघन झाले म्हणून बालहक्क आयोगाकडे तक्रार प्राप्त झाली होती.
 
 
बाल हक्क अधिनियम कायद्यातील कलम ७४ नुसार कुठल्याही पीडित बालकाचे फोटो, व्हिडिओ किंवा त्याचे नाव वा ओळख जाहीर करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र राहुल गांधींनी या मुलांचा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल केल्याने या कायद्याचा भंग झाल्याचा आरोप करण्यात आला.
 
 
याप्रकरणी स्पष्टीकरण देण्यासाठी राहुल गांधी यांना महाराष्ट्र बाल हक्क संरक्षण आयोगाद्वारे नोटीस बजावण्यात आली होती. ही नोटीस आपणास २२ जून रोजी मिळाल्याचे सांगून तक्रारअर्ज मराठीत असल्याने तो इंग्रजीमधून उपलब्ध करुन देण्याची तसेच उत्तर देण्यासाठी आणखी दहा दिवसांची मुदत देण्याची मागणी राहुल गांधी यांनी आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांना दिलेल्या पत्रात केली आहे, असे सांगण्यात आले.
 
@@AUTHORINFO_V1@@