मनपाच्या रूग्णालयात ज्येष्ठांवर मोफत उपचार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jul-2018
Total Views |



 

मुंबई: मुंबई महापालिकेच्या रुग्णालयामध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत उपचार करण्यात येणार आहेत. बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. लवकरच यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मनपाच्या रुग्णालयात उपचारासाठी येणार्‍या ज्येष्ठ नागरिकांची पाच हजारांपर्यंतच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे. तसेच सिटीस्कॅन एम.आर.आय.ची तपासणीही मोफत करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, रुग्णालयातून घरी सोडल्यावर औषधे मोफत देण्यात येणार आहे.
 

राज्य सरकारच्या २००४ च्या परिपत्रकानुसार पालिका रुग्णालयामध्ये येणार्‍या ज्येष्ठ नागरिकांकडून उपचारासाठी पैसे आकारले जात असत. मात्र, पालिका प्रशासनाने या प्रस्तावात बदल करण्याचा निर्णय घेतला आणि मोफत उपचार देण्याचा प्रस्ताव तयार केला होता. या नवीन प्रस्तावानुसार पालिका रुग्णालयात येणार्‍या जेष्ठ नागरिकांना मोफत उपचार दिले जाणार आहेत, अशी माहिती केईएम रुग्णालयाचे उप अधिष्ठाता अजय राणे यांनी बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत दिली.

 

पालिका रुग्णालयात ज्येष्ठ नागरिक उपचारासाठी दाखल झाल्यावर त्यांच्याकडून ५०० रुपयांची आकारणी केली जाते. परंतु, त्यातील अनेक रूग्णांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने तसेच त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी कोणी घेत नसल्याची बाब निदर्शनास आली होती. त्यामुळेच ज्येष्ठ नागरिकांचा विचार करत केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सदर प्रस्ताव तयार केला होता.”पालिकेच्या केईएम, शीव व नायर रुग्णालयात रुग्णालयात वृद्धांसाठी विशेष खाटांचा विभाग तयार करण्यात येणार आहे. वृद्धांच्या तपासणीसाठी रुग्णालयात वेगळा कर्मचारी वर्गही नेमण्यात येणार आहे. तसेच त्यांच्यासाठी वेगळ्या ओपीडी, लॅब व फिजिओथेरपी युनिटचीही व्यवस्था केली जाणार आहे.“ असेही राणे यांनी सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@