विधान परिषदेत ‘तारे’ जमीन पर.

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jul-2018
Total Views |


 

काँग्रेसचा माणिकरावांना तर राष्ट्रवादीचा सुनील तटकरेंना ठेंगा

मुंबई: विधान परिषदेच्या विधानसभेमार्फत निवडल्या जाणार्‍या तब्बल ११ जागांच्या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे सध्या लक्ष लागले असले तरी ही निवडणूक बिनविरोध होण्याचीच शक्यता अधिक आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाने आपल्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केली असून काँग्रेसनेही आपले दोन व राष्ट्रवादी काँग्रेसने एका उमेदवाराचे नाव जाहीर केले. यामध्ये काँग्रेसने विद्यमान उपसभापती व माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे तिकीट कापत मोठा धक्का दिला आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना उमेदवारी नाकारली आहे.

 

या निवडणुकीत एक उमेदवार जिंकून देण्यासाठी २५ विधानसभा आमदारांचा कोटा आवश्यक आहे. या हिशोबाने भाजपचे सर्वाधिक 5, शिवसेनेचे व काँग्रेसचे प्रत्येकी २ व राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येणार आहे. तसेच, अकरावा उमेदवार म्हणून शेकापचे जयंत पाटील यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. या 11 जागांमध्ये विद्यमान राष्ट्रवादीकडे सर्वाधिक ४ जागा असून काँग्रेसचे ३ आणि भाजप, शिवसेना, शेकापचे प्रत्येकी एक आमदार निवडून आले आहेत. तसेच, रासपचे अध्यक्ष व राज्य सरकारमधील मंत्री महादेव जानकर हेदेखील भाजपच्या कोट्यातून निवडून आले आहेत. आता या निवडणुकीत भाजपकडे विधानसभेत सर्वाधिक संख्याबळ असल्याने भाजपचे सर्वाधिक ५ आमदार निवडून येतील आणि विधान परिषदेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरेल. भाजपने आज आपले उमेदवार जाहीर करताना विद्यमान सदस्यांपैकी महादेव जानकर व भाई ऊर्फ विजय गिरकर यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे तसेच, भाजपचे नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष राम पाटील-रातोळीकर, कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश नारायण पाटील, यवतमाळ जि.प.चे माजी अध्यक्ष तसेच माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नातू निलय नाईक यांना उमेदवारी दिली आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील तटकरे यांना उमेदवारी नाकारत माजी आमदार बाबा जानी दुर्राणी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तटकरे यांची नुकतीच राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून उचलबांगडी करून त्याजागी जयंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता विधान परिषद उमेदवारीही नाकारून तटकरेंना पक्षनेतृत्वाने योग्य तो संदेश दिला आहे.  शिवसेनेच्या उमेदवारांबाबत अद्याप संभ्रम आहे. विद्यमान सदस्य अनिल परब यांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली आहे. दुसर्‍या जागेसाठी उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर अथवा प्रवक्ता मनीषा कायंदे यांची नावे चर्चेत आहेत. दरम्यान शिवसेनेकडे १३ अतिरिक्त मते असून त्या जोरावर शिवसेना तिसरा उमेदवार रिंगणात उतरून निवडणूक घ्यायला लावणार का, याबाबत उत्सुकता आहे. सोमवार दि. १६ जुलै रोजी या ११ जागांसाठी मतदान होणार असून सायंकाळनंतर मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील.

 
@@AUTHORINFO_V1@@