‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण’ पुरस्कार सोहळा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jul-2018
Total Views |



 

बदलापूर: येथील सामाजिक कार्यकर्ते आणि गेली पंचवीस वर्षे गरीब आणि गरजूंवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून आ. किसन कथोरे यांचा मोतीबिंदूमुक्त तालुका करण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी झटणारे साकिब गोरे यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार’ राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
 

आ. कथोरे यांच्या या राजकीय वाटचालीस पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी सुरू केलेल्या नेत्रचिकित्सा शिबिरालाही पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत. कथोरे पंचायत समितीचे सभापती असताना त्यांनी ग्रामीण भागातील नागरिकांसाठी नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन केले होते. प्रारंभी हे शिबीर एका आठवड्याचे असे. मात्र, आता हे शिबीर अनेक महिने सुरू असते. कथोरे यांचे कट्टर समर्थक साकिब गोरे हे या शिबिराला वाहून घेतल्यासारखे काम करीत आहेत. त्यांना त्यांचे बंधू मावेज यांचे सहकार्य मिळते. मोतीबिंदू शत्रक्रिया यशस्वी झालेल्या आहेत तर चष्मे वाटप हे लाखांच्या वर झाले आहे.

 

पूर्वी अंबरनाथ तालुक्यासाठी मर्यादित असलेले हे नेत्रचिकित्सा शिबीर आता अंबरनाथ, कल्याण आणि मुरबाड या तीन तालुक्यांत आयोजित करण्यात येत असते. आ. कथोरे यांनी सुरू केलेली चळवळ गेली पंचवीस वर्षे साकिब गोरे पाहत असतात. ग्रामीण भागात जाऊन तेथील नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करणे, ज्यांना चष्मा आवश्यक आहे त्यांना चांगल्या प्रतीचे चष्मे देणे, ज्यांना मोतीबिंदू आहे अशा रुग्णांना रुग्णालयात आणून त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जात आहे.

 

त्यांच्या या कार्याची दखल राज्य शासनाने घेतली आणि नागपूर येथे एका सोहळ्यात राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते साकिब गोरे यांना ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले आहे. पंधरा हजार रुपये, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गेल्या २५ वर्षांपासून साकिब गोरे नेत्रशिबीर घेऊन ग्रामीण भागातील नागरिकांची शुश्रूषा करत आहेत. हे काम वाखाणण्यासारखे आणि प्रेरणादायी आहे, खर्‍या अर्थाने पुरस्काराचाच हा सन्मान झाला आहे, अशी प्रतिक्रिया किसन कथोरे यांनी व्यक्त केली.

@@AUTHORINFO_V1@@