तूच खरा आधार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jul-2018
Total Views |


 

 

जन्म देणार्‍या मातेपेक्षाही जगाची माऊली अधिक महत्त्वपूर्ण भूमिका साकारते. कारण, जन्म देणार्‍या मातेला देहाची मर्यादा आहे. जगताच्या माऊलीला देहाचं बंधन नाही. ती विश्वामध्ये व्यापक होऊन केव्हाही, कुठेही, कधीही प्रकट होऊ शकते. ती फक्त एकाच जन्मात काळजी घेत नाही. जन्मोजन्मी सांभाळ करते. स्थळ-काळाचं बंधन नसल्यामुळे ती अमर्यादपणानं प्रेमाचा वर्षाव करते. सूक्ष्मपणानं वावरुन अफाट शक्तीने आधार देऊन निर्भय करते. स्थूलाला मर्यादा पडतात. सूक्ष्माला मर्यादा कधीच नसतात. अलौकिक, अमर्याद, अफाट क्षमता असलेली जगन्माऊली आहे.
 

घडणार्‍या घटनांनी माणसाचं मन हेलकावे खात असतं. समुद्राच्या पाण्यावर नाव जशी खाली वर होते, तशी मनाची अवस्था असते. जीवनामध्ये कमी अधिक प्रसंग आले की, त्याला अस्वस्थता येते. छोट्या-मोठ्या संकटांमध्ये तर मन आधार शोधतं. त्याला देवाचं स्मरण तीव्रतेनं होतं. देव आपल्याला आधार देईल, म्हणून तो त्याच्या आश्रयाला जातो. माणसं भक्‍कमपणानं आधार देतील, याची त्याला खात्री वाटत नाही. कलियुगामध्ये तर माणसाचा स्वार्थ टोकाला पोहोचलेला आहे. इतर लोकांना मदतीचा हात पुढे करण्यात काचकूच करतात. अनेक कारणं सांगून टाळाटाळ करतात. परंतु, भगवंत माणसांसारखा लहरी व स्वार्थी अजिबात नाही आर्तपणानं साद घातली की तो प्रतिसाद देतोच. संकटामध्ये सहजपणानं साथ देतो. आधार देऊन आश्‍वस्त करतो. संकटांमधून सोडवल्याचा गवगवा करत नाही.

 

पुराणांमध्ये भगवंत भक्तांच्या कठीण प्रसंगी धावून गेल्याची अनेक उदाहरणं व कथा आहेत. संतदेखील आपला स्वानुभव ग्रंथांमधून सांगतात. कोणत्याही युगामध्ये असं कधीही घडलं नाही की भगवंतानं भक्तांना आधार देण्याचं नाकारलं. भगवंत आश्रयाला आलेल्याला कधी निराश करत नाही. कपटी, धोकेबाज, लबाड, ढोंगी लोकांपासून ‘सावध’ राहण्याचा उपदेश समर्थ रामदास यांनी दासबोस ग्रंथामध्ये केलेला आहे. अडलेल्या- नडलेल्या माणसांना फसवणारे, लुबाडणारे कलियुगात जागोजागी आहेत. त्यामुळे सावधपणा संकटांमध्ये आवश्यक आहे. प्रेमाचा बुरखा पांघरुन, अंतस्थ वाईट हेतू ठेवून वावरणारे बरेच आहेत. कोण आपला? कोण परका? हे पारखून घेणं गरजेचं आहे.

 

संपूर्ण जगतामध्ये एकमेव भगवंत शुद्ध प्रेमानं भक्ताला जवळ करुन संकटातून तारतो. अलौकिक शक्तीने संपन्न असलेल्या भगवंतानं आपल्याला मातेच्या ममतेनं पोटाशी घेण्याइतकं भाग्य ते कोणतं? माता कधी केलेल्या कष्टाची मोजदाद करते का? माता कधी परतफेडीची अपेक्षा करते का? तिच्या अंतःकरणात आपल्याविषयी प्रेम, माया असते. ती निरपेक्ष-नि:स्वार्थी भावानं अपत्यांचा कोणत्याही प्रसंगात सांभाळ करते. भगवंत देखील मातेसमान भक्तांना सांभाळतो. भक्ताच्या मनाला धीर देतो. हेलकावे खाणारं मन स्थिर होतं. काळजी, भय, चिंता निघून जातात. अशांतता जाऊन शांतीचा लाभ होतो. अस्वस्थ मनाला स्वस्थता प्राप्त होते.

 

भगवंत आणि माता यांची उंची आभाळाएवढी आहे. त्यांच्या ममत्वाची खोली सागराइतकी आहे. दोघेही आपल्या बालकांची सदैव काळजी घेतात. बाळ अवगुणी आहे का गुणी आहे, याचा विचारही ते करत नाहीत. त्याला आपली गरज आहे, ती पूर्ण करायची, त्याला सर्वांगानं सुरक्षित ठेवायचं. एवढचं त्यांना माहीत असतं. एकदा का या दोन माऊलींचा लाभ झाला की, इतर गोष्टींची गरज उरत नाही. एक जन्मदात्री माऊली आणि दुसरी विश्‍वाची माऊली. एक माता, तर दुसरी जगन्माता... दोघंही श्रेष्ठ आहेत. त्यांच्या अंत:करणात आपल्याबद्दल प्रेमाशिवाय अन्य कोणताही भाव नसतो. अपत्याचं कल्याण करण्याची तळमळ असते. त्यासाठी दोन्ही माता सदैव झटत असतात. सदैव साहय्य करत असतात. मातेचं हृदय जाणलं की, तिचा उन्नत प्रतीचा, श्रेष्ठतम भाव जाणवतो. प्रतिकूल परिस्थितीमध्ये उभं राहण्याचं बळ प्रदान करणारी माताच असते.

 

विश्‍वाची माऊली आणि जन्म देणारी माऊली या माऊलींच्या छत्रछायेखाली असणार्‍यांकडे कोणीही वाईट व वाकड्या नजरेनं पाहण्याची हिंमत करत नाही. कृपेच्या चांदण्याच्या वर्षावात न्हाऊन निघण्याचं भाग्य लाभतं. जीवनात कशाचीही कमतरता उरत नाही. अशा तेजस्वी, स्नेहाळू, मायाळू मातांच्याप्रती कृतज्ञता भाव ठेवणं आवश्यक आहे. ज्यांनी आपल्याला सांभाळलं आणि सदैव सांभळत आहेत, त्याचं पूजन करणं स्वाभाविक आहे. कृतज्ञतेसारखा मौलिक अलंकार कोणताही नाही.  हा अलंकार माऊलीला घातला की, त्यांचं रुप अधिकच खुलतं. त्यांना आपल्या बाळाबद्दल अधिकच कौतुक दाटून येतं. मातेचं मन भरुन येतं.

 

जन्म देणार्‍या मातेपेक्षाही जगाची माऊली अधिक महत्त्वपूर्ण भूमिका साकारते. कारण, जन्म देणार्‍या मातेला देहाची मर्यादा आहे. जगताच्या माऊलीला देहाचं बंधन नाही. ती विश्वामध्ये व्यापक होऊन केव्हाही, कुठेही, कधीही प्रकट होऊ शकते. ती फक्त एकाच जन्मात काळजी घेत नाही. जन्मोजन्मी सांभाळ करते. स्थळ-काळाचं बंधन नसल्यामुळे ती अमर्यादपणानं प्रेमाचा वर्षाव करते. सूक्ष्मपणानं वावरुन अफाट शक्तीने आधार देऊन निर्भय करते. स्थूलाला मर्यादा पडतात. सूक्ष्माला मर्यादा कधीच नसतात. अलौकिक, अमर्याद, अफाट क्षमता असलेली जगन्माऊली आहे. आपण तिची बालकं आहोत. त्यामुळे ती आपल्याला देखील विशाल, व्यापक होण्याची गुटी पाजते. ‘मी आणि माझं’ अशी संकुचित, स्वार्थी वृत्ती दूर सारण्याची ताकद देते. सर्वांगाचा विकास घडवून आणणारी जगन्माऊली षडरिपू धुवून बालकाला स्वच्छ करते. स्वत:सारखं शुद्ध, पवित्र करते. अशा संस्कारांना सालकृंत झालेलं बालकं मोठं गोजीरवाणं दिसतं. बालकाला खर्‍या अर्थानं गुणवंत, यशवंत, कीर्तीवंत करते. त्याला खर्‍या अर्थानं मोठं झालेलं बघून खूश होते. कृतार्थभाव... कौतुकभाव व्यक्त करण्यासाठी अवतीर्ण होते. सगुण साकार होते. कधी ती पांडुरंग, कधी राम, तर कधी कृष्ण होऊन अवतरते. मग आनंदाला पारावार राहत नाही. परमानंदाची प्राप्ती करुन देणारी जगन्माता! आपल्या बालकांना अभय देणारी माता! अपूर्णाकडून पूर्णत्वाकडे घेऊन जाणारी जगन्माता! तिच्या चरणी नतमस्तक झालं, तिच्या स्वाधीन झालं, की ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ अशी सुंदर भावसमाधी लागते. संशय सोडून तिच्या शक्तीवर श्रद्धा ठेवून वाटचाल केली, की जीवन सार्थकी लागते.

-कौमुदी गोडबोले


pasting
@@AUTHORINFO_V1@@