हिंदू समाज आणि क्षेत्रदेव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jul-2018
Total Views |


 

या क्षेत्रदेवतांचा उगम हिंदू धर्माच्या मूळ रचनेचा परिणाम आहे. आर्यांनी हिंदुस्थानात येताना आपली दैवते बरोबर आणली. येथील स्थानिकांना त्यांच्या देव-दैवतांसकट हिंदू धर्मात समाविष्ट करण्यात आले.
 

रामदासकालीन महाराष्ट्रातील समाजरचना आणि एकंदर हिंदुस्थानातील तत्कालीन समाजरचना यांचा अभ्यास केल्यावर रामदासस्वामींची काही वैशिष्ट्ये त्यातून आपल्या लक्षात येतात. श्री. म. माटे यांनी लिहिलेल्या ‘रामदास स्वामींचे प्रपंच विज्ञान’ या ग्रंथात त्यांनी ‘आर्यप्रणित समाजरचना आणि आर्येतरांचे त्यात सामिलीकरण’ या विषयावर बरेच चिंतन केले आहे. महाराष्ट्रापुरते बोलायचे, तर तेराव्या शतकापासून ज्ञानेश्‍वरादी संतांनी पंढरपूरच्या विठोबाच्या भक्तिमार्गात सर्व समाजघटकांना एकत्र आणण्याचा स्तुत्य प्रयत्न केला. समाजातील भेदाभेद निदान आध्यात्मिक पातळीवर तरी नाहीसे करण्यात यश मिळवले. वारकरी संप्रदायातील वारकरी पंढरपूरला आल्यावर भीमेच्या वाळवंटात एकमेकांच्या पाया पडतात. त्यावेळी ते फक्त विठ्ठलभक्त असतात. एकमेकांच्या जातीपातीचा विचार कोणाच्याही मनात येत नाही. मराठी संतांनी तेराव्या शतकापासून पंढरपूरच्या पांडुरंगाच्या महिम्याने सारा महाराष्ट्र व्यापून टाकला होता. महाराष्ट्रातही ग्रामदेवतांचा व क्षूद्र देवतांचा सुळसुळाट होता. त्यांना मानणार्‍या या सर्व भक्तांना एका छताखाली आणून, पंढरपूरच्या विठोबाच्या सात्त्विक भक्तिमार्गाला लावण्याचे फार मोठे कार्य ज्ञानेश्‍वरादी संतांनी केले. त्यामुळे उत्तरेकडील धार्मिक, तंत्र-मंत्रादी प्रकाराला रोखण्यात महाराष्ट्र यशस्वी झाला. रामदासस्वामींनी त्यांच्या वाङ्मयात या ग्राम व क्षूद्र देवतांचा उल्लेख केला आहे. त्यांना ते ‘क्षेत्रदेव’ म्हणून संबोधतात. या क्षेत्रदेवतांचा वावर हिंदुस्थानात सर्वत्र होता. त्यांची काही नावे श्री. म. माटे यांनी त्यांच्या ग्रंथात दिली आहेत. तथापि ते म्हणतात, “देशभरातील त्या क्षेत्रदेवांची मूळ संख्या कितीतरी पटीने मोठी आहे.”

 

माटेंनी त्यांच्या ग्रंथात म्हटले आहे की, “या आर्येतर दैवतांचा निःपात करणे, ही गोष्ट आर्यसंस्कृतीत शक्य झाली नाही. त्याचा फार मोठा परिणाम हिंदू समाजावर आणि हिंदूमनाच्या इतिहासावर झालेला आहे. आर्यांनी हिंदू धर्मात आर्येतर दैवतांना सामावून घेतले. कारण, आर्यसंस्कृती पुरातन असून सर्वसमावेशक होती. इतर धर्मांच्या बाबतीत मात्र असे घडले नाही. त्यांच्या धर्माचा प्रेषित किंवा संस्थापक एक असल्याने त्यांच्या तत्वज्ञानाविरुद्ध असलेल्या सर्व कल्पनांचा त्यांनी निःपात केला. तसेच विरोधकांच्या देव-दैवतांचा उच्छेद केला. तथापि, हिंदू धर्माच्या बाबतीत असे घडले नाही. समोर आलेले सर्व विचार त्यांनी समाविष्ट करून घेतले आणि अवतार कल्पना मान्य केली. त्यामुळे हिंदूंनी देव मानला किंवा मानला नाही, तरी फारसा फरक पडत नाही. अमूक देव मानलाच पाहिजे, अशी सक्ती धर्माच्या नावावर कधीच नव्हती आणि आजही ती नाही. इतकेच नव्हे, तर निर्गुण ईश्‍वर कल्पनेबरोबर देवकल्पना न मानणार्‍या चार्वाकांनाही येथे मान्यता होती. राम-कृष्णादी हे अफाट कर्तृत्व असणारे मानव होते. त्यांना हिंदूंनी ईश्‍वराच्या अवतारांचे स्थान दिले. त्यांनी दाखवलेल्या अलौकिक पराक्रमाने त्यांना परब्रह्माचे अंश मानून अवतार म्हणून मान्यता मिळाली. क्षेत्रदेव, ग्रामदैवते, अवतारी देव या सर्वांमुळे हिंदूधर्मियांचे देवघर गजबजून गेले. या गलबल्यात तत्वज्ञानातून आलेले देव कोणते, अवतार देव कोणते आणि भीतीपोटी असलेले क्षेत्रदेव कोणते याचा विवेक राहिला नाही. जो तो आपापल्या पूर्वापार चालत आलेल्या दैवतांना प्रथेप्रमाणे भजत राहिला. ज्ञानेश्‍वरादी संतांनी या क्षेत्रदेवांपासून व क्षूद्र दैवतांपासून समाजाला सोडवण्याचा प्रयत्न केला. समाजघटक मग तो कोणत्याही क्षेत्रदेवाला भजत असेना का, त्याला सात्त्विक विठ्ठलभक्तीला लावले. वारीची पद्धत घालून दिली. विठ्ठल हे परब्रह्म असून पंढरपूरात विटेवर उभे आहे. कमरेवर हात ठेवून आपल्या भक्तांची वाट पाहात आहे. अशा नैतिक मूल्यांवर समाजबांधणी करून त्यांना अध्यात्मापुरते का होईना, भक्तीच्या एका पातळीवर आणले. सर्व हिंदुस्थानभर या क्षेत्रदेवतांची उपासना या ना त्या प्रकारे चालू होती. भीतीपोटी आलेल्या या क्षेत्रदेवता व क्षुद्रदेवता यांचे महत्त्व कमी करून समाजाचा ओघ विठ्ठलाकडे आणि चारित्र्यसंपन्न अवतारी देवांकडे नेण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील संतांनी नेटाने केला, असे श्री.म. माटे यांनी म्हटले आहे, ते बरोबर आहे.

 

तीर्थाटनाच्या काळात रामदासस्वामींनी या क्षेत्रदेवतांचा व क्षुद्रदेवतांचा प्रकार सर्वत्र पाहिला. परंतु त्यांनी पाहिले की, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या तत्कालीन समाज अधःपतीत झाला होता. त्यांच्या ठिकाणी स्वत्वरक्षणाची प्रेरणा उरली नव्हती. धर्माविषयी भ्रामक समजुती होत्या. हिंदुस्थानात सर्वत्र कर्मठपणा भरला होता. हठयोगाचा अभ्यास करून आपले शरीर अमर कसे करता येईल, हा विचार सर्वत्र होता. तसेच तंत्र-मंत्र यांचा वापर करून सिद्धी मिळवणे व त्याद्वारा शत्रूनाश कसा करता येईल, इत्यादी गोष्टींचे विलक्षण आकर्षण लोकांना होते. लोकं तांत्रिकाच्या आहारी जाऊन गूढसाधना करीत होते. वामाचार, तांत्रिक साधना, लैंगिक विकृतींनी पछाडलेले शाक्तपंथीय यांचा समाजावर प्रभाव होता. तुकारामांनी ‘शाक्त तो गधडा’ अशा शब्दांत त्यांची निर्भत्सना केली आहे. ज्ञानेश्‍वरादी सर्व संतांनी या अधःपतनापासून महाराष्ट्राला वाचवले आहे. यात रामदासांचा मोलाचा वाटा आहे.

 

रामदास प्रथम चाफळला आले. त्यावेळी त्यांना कोणी फारसे ओळखत नव्हते. त्यांनी गावातील तरुणांना व्यायामाचे धडे तसेच लोकांसाठी कीर्तने, प्रवचने करून लोकोद्धाराच्या कामाला सुरुवात केली होती. लोकांना राम व हनुमंताच्या उपासनेला लावावे, यासाठी त्यांना तेथे जागा हवी होती. गावातील लोकांनी एक जागा दाखवली. जवळच तेथे पूर्वी स्मशान होते व त्या जागेत शेंदूर फासलेले दगड म्हणजे क्षेत्रदेव उभे होते. त्यांची लोकांना भीती वाटत होती. रामदासांनी शिष्यांच्या मदतीने ते उचलून नदीत टाकून दिले. शेवटी ग्रामस्थांच्या विनंतीवरून एक म्हसोबा देव त्यांनी तेथे राहू दिला. क्षेत्रदेवांचे व क्षुद्रदेवांचे निराकरण त्यांनी उपदेशाबरोबर प्रत्यक्षातही केले होते.

 

-सुरेश जाखडी

@@AUTHORINFO_V1@@