वीर घटोत्कच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jul-2018
Total Views |


 

प्रथम भीम आणि भीष्म यांच्या द्वंद्वयुद्धाने सुरुवात झाली. भीमाने खूप पराक्रम गाजवला. भीष्मआजोबांचे घोडे व सारथी ठार केले. भीष्मांना बाणांनी वेढून टाकले. एकामागून एक अशा आठ कौरव भावांना पण मारले. हे पाहून दुर्योधन बिथरला.
 

कौरवांनी आठव्या दिवशी लाटेप्रमाणे व्यूहरचना केली. त्याला ’उर्मीव्यूह’ असे नाव आहे. युधिष्ठिराने त्यांना प्रत्युत्तर म्हणून ‘श्रुगान्तक व्यूह’ म्हणजे शिंगाचा आकार असलेला व्यूह रचला.  तो भीष्मांना अद्वातद्वा बोलला. भीष्मांनी त्याला पुन्हा सांगितले की, “मी व द्रोण तुझ्याच बाजूने लढतो आहोत, पण पांडवांचा पराभव करणे आता अशक्य आहे. भीम त्याची शपथ विसरलेला नाही. तो ती पूर्ण करणारच! तू स्वत:पण तुझ्या भावाना वाचवू शकत नाही. ज्या गोष्टी आपल्या अतीत आहेत त्यांची चिंता करू नकोस! तुला शूर वीराचे मरण कसे येईल? ते आता पाहा.”

 

एवढ्यात भर दुपारची वेळ झाली होती. दोन्ही बाजू निकराने लढत होत्या. दोन्हीकडे खूप सैनिक मारले जात होते. अर्जुनाकडे इरावान नावाचा वीर आला. तो अर्जुन आणि नागकन्या उलूपी यांचा मुलगा! अर्जुनाने त्याचे स्वागत केले. इरावान शकुनीस भिडला. कारण शकुनी पांडवांच्या सैनिकात बरेच घोटाळे निर्माण करत होता! इरावान अर्जुनासाखाच शूर होता. त्याने शकुनीला जखमी केले. हे पाहून दुर्योधनाने अलांबुश याला इरावानवर मायावी शक्ती वापर म्हणून सांगितले. शेवटी इरावानाचा शीरच्छेद झाला.

 

इकडे भीष्म, द्रोण आणि अश्वत्थामा पांडव सैन्याचा नाश करत होते. इरावान पडला हे पाहून घटोत्कच पुढे आला. त्याने मायातंत्र वापरून कौरव सैन्य अक्षरश: कापून काढले. म्हणून कौरव त्याच्यावर तुटून पडले, मग युधिष्ठिराने भीमाला घटोत्कचाची मदत कर म्हणून सांगितले. भीम आणि घटोत्कच या दोघांनी दुर्योधनाच्या सैन्याचा धुव्वा उडवला ! दुर्योधन संतापाने वेडाच झाला. तो इथे धावून आला आणि भीमाशी लढू लागला. भीष्मांनी घटोत्कचाचा मुकाबला करण्यास भगदत्त याला पाठवले. दोघांचे तुंबळ युद्ध झाले, दोन्हीबाजूचे कित्येक सैनिक मारले गेले. अर्जुनाला कळले, की आपला पुत्र इरावान मरण पावला आहे. हे पाहून तो दु:खी झाला. तो कृष्णाला म्हणाला, “सत्तेसाठी आम्ही कित्येक निरपराधी जीव मृत्यूच्या खाईत लोटत आहोत. आता मला कळते की, दादा फक्त पाच गावे द्या, असे का म्हणत होता. हा नरसंहार टाळण्यासाठीच तो तसे म्हणाला.” पण, दुष्ट शकुनीने त्यावेळी दुर्योधनाला वाईट सल्ला देऊन परावृत्त केले.चिडून अर्जुन भीष्मांशी त्वेषाने युद्ध करू लागला. भीम आणि घटोत्कच पण खूप जोशात लढत होते. भगदत्त आपल्या हत्तीवरून लढत होता. भीमाने दुर्योधनाचे आणखीन आठ भाऊ मारले, आता एकूण चोवीस भाऊ मारले गेले. त्यामुळे दुर्योधन खूप चिडला. एकूणच भीम आणि घटोत्कच या दोघांनी आजचा दिवस गाजवला!

 -सुरेश कुलकर्णी
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@