मुंबईचा जागतिक वारसा आणि नूतन प्रकल्प

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jul-2018   
Total Views |



नुकताच मुंबईतील अनेक इमारतींचा ‘युनेस्को’च्या ‘जागतिक वारसा स्थळां‘च्या यादीत समावेश करण्यात आला. त्यामुळे मुंबई महानगरीला जागतिक वारसा स्थळांच्या नकाशावर मानाचे स्थान मिळाले आहे.

 

बहारीनच्या राजधानी शहर असलेल्या मनामा येथे ‘युनेस्को’ची जागतिक वारसा समितीची ४२ वी परिषद सुरू असताना, तेथे मुंबईच्या मानासंबंधीची घोषणा करण्यात आली. त्यानंतर ट्विटरवरून भारताचे अभिनंदनही करण्यात आले. भारताला हा मान आधी १९८७ मध्ये व २००४ मध्ये असा मिळाला होता. त्यावेळी मुंबईतील काही वास्तूरचना, घारापुरी लेणी व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक आणि औरंगाबादमधील अजंठा व वेरूळची लेणी अशा स्थळांचा वारसा यादीत समावेश करण्यात आला होता.

 

‘युनेस्को’च्या सांस्कृतिक वारसात कुंभमेळा

 

भारतातील जगप्रसिद्ध कुंभमेळ्याला ‘युनेस्को’ने बहुमूल्य सांस्कृतिक वारशांच्या यादीत स्थान दिले आहे.

 

वारसा स्थळांची नवीन यादी

 

‘युनेस्को’कडून मान्यता मिळालेले भारत हे ३७ वे वारसा स्थळ झाले आहे व सर्वात जास्त वारसा स्थळ असणाऱ्यांमधील जागतिक क्रमवारीत भारत सातव्या क्रमांकावर येणार आहे. गेली १४ वर्षे ही खटपट सुरू करून, २०१२ मध्ये महाराष्ट्र सरकारने ‘युनेस्को’कडून दर्जा मिळविण्यासाठी अधिकृतरित्या अर्ज केला होता. जागतिक वारसा वस्तूंच्या यादीमध्ये समावेश होण्यासाठी, वैशिष्ट्यपूर्ण रचना व त्या माध्यमातून मानवी इतिहासाचे पैलू उलगडणे, अशा दोन गोष्टी जागतिक मूल्यांकरिता गरजेचे असल्याने तसा प्रयत्न करण्यात आला.

 

खाली दर्शविलेल्या मुंबईतील वास्तूंचा समावेश वारसा यादीत करण्यात आला. या मानांकनामुळे मुंबईतील पर्यटन व सांस्कृतिक क्षेत्राला फायदा होऊन मुंबई शहराचे स्थान अग्रेसर होणार आहे. व्हिक्टोरिअन गॉथिक वास्तूंपैकी सर्वोत्कृष्ट इमारती, १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात फोर्ट व मरिन ड्राईव्ह परिसरात बांधलेल्या संचातील इमारती आणि मुंबईतील किल्ल्यांच्या भिंती पाडल्यावर बांधलेल्या इमारती, उच्च न्यायालय, विद्यापीठ, पोलीस मुख्यालय यांचा यामध्ये समावेश आहे.

 

आर्ट डेको वा इंडो डेको शैलीच्या इमारती

 

या इमारतींचा संच २० व्या शतकात बांधण्यात आला. एकसमान दिसणाऱ्या या इमारती जास्त संख्येत असलेल्या देशांच्या जागतिक यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या ६६.३४ हेक्टर परिसरात असून ओव्हल मैदानाने जोडल्या आहेत.

 

आधुनिक काळातील इमारती

 

सरकारी वा खाजगी इमारती, घरे आणि त्यामधील मैदाने व सांस्कृतिक ठिकाणे यांचा यामध्ये समावेश आहेत.

 

मुंबईत बांधण्यात येणारे इतर काही प्रकल्प व बांधकामे आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र (IFSC)

 

हा प्रकल्प एमएमआरडीए हाताळत आहे व त्याकरिता वांद्रे-कुर्ला संकुलात किमान ५० हेक्टर क्षेत्राचा भूखंड राखीव ठेवला आहे. त्यातील २० हेक्टर हरितक्षेत्राकरिता राहील. प्रकल्पाचे अंदाजी मूल्य २५० कोटी रुपये आहे. हा प्रकल्प २०१८ मध्ये सुरू करावयाचे ठरले होते, परंतु जवळच्या गुजरात राज्यामधील आंतरराष्ट्रीय टेक सिटीच्या (GIFT) आर्थिक केंद्राच्या प्रकल्पामुळे आणि या प्रस्तावित आर्थिक केंद्राच्या भूखंडावरून बुलेट ट्रेन टर्मिनसला जागा देण्याच्या निर्णयाने या प्रकल्पाला कदाचित विलंब होत असेल, असे काही जणाना वाटत आहे.

 

या प्रकल्पाकरिता मुख्य नियोजक मिळण्याकरिता आंतरराष्ट्रीय निविदा मागवला आहे. या केंद्राशी थेट लवकर संपर्कात येण्याकरिता मुंबई/नवी मुंबई विमान तळावरून उन्नत रस्ते व मेट्रो बांधण्याचे प्रस्ताव विचाराधीन आहेत. या इमारतीला जास्त जागा लागणार असल्याने, येथे बांधीव क्षेत्र निर्देशांक-४ घेऊन उंच इमारत बांधली जाईल व विमानतळाच्या नियमाप्रमाणे, इमारतीची उंची ५१ ते ६१ मी ठेवता येईल. या प्रकल्पाकरिता विशेष समिती नेमली होती व त्यात केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिन्हा, खासदार पूनम महाजन, बँक सल्लागार चंदा कोचर, कलाकार अमिताभ बच्चन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सल्लागार मॅगनस बॉकर इत्यादी होते.परंतु विलंबामुळे आता सदस्यांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. या वित्तीय केंद्राच्या जागेवर बुलेट ट्रेनचे भूमिगत टर्मिनस बांधण्याकरिता सुविधा निर्माण कराव्यात व त्याकरिता काही सवलती देण्यात याव्यात, याकरिता राज्य व केंद्र सरकारमध्ये चर्चा सुरू आहे.

 

वडाळा येथील नवे व्यावसायिक संकुल

 

नरीमन पॉईंट व वांद्रे-कुर्ला संकुलानंतर, वडाळा येथे एमएमआरडीएकडून तिसरे व्यावसायिक संकुल उभे राहणार आहे. या वांद्रे-कुर्ला संकुलाच्या दुप्पट क्षेत्रात निवासी घरे, व्यावसायिक इमारती, किरकोळ विक्रीची दुकाने, रेस्टॉरंट, हॉटेल, सार्वजनिक सुविधेकरिता मोकळ्या जागा बांधण्यात येणार आहेत. एमएमआरडीएच्या अंदाजाप्रमाणे, येथे पुढील तीन दशकात ९२ हजार नोकऱ्या उपलब्ध होतील. येथे राज्य-राज्यांतर्गत बस टर्मिनस होणार आहे. ९०० सार्वजनिक गाड्यांना ये-जा करण्यासाठी विशेष व्यवस्था होणार आहे. येथे विकास व भरभराट लवकर अपेक्षित आहे. ट्रान्स्पोर्ट हब होणार आहे. येथे फ्री वे, पूर्व महामार्ग जवळ आहे आणि मोनोरेल व मेट्रो-४ चे मार्ग बनणार आहे. त्यामुळे हे क्षेत्र मुंबई शहराशी उत्तम प्रकारे जोडले जाईल. वडाळा संकुलात ४१ मजल्यांचे ३ टॉवर (२ व्यावसायिक व १ निवासी) उभारण्यात येणार आहेत.

 

मुंबईत आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र

 

सिंगापूर, लंडन, हाँगकाँग येथील आंतरराष्ट्रीय लवाद केंद्रांकडे जाणारा भारतीय कंपन्यांचा तीन अब्ज डॉलरचा व्यवसाय मुंबईत यावा, या उद्दिष्टाने हे केंद्र स्थापले जाणार आहे. या केंद्राला मुंबईत होणाऱ्या आर्थिक केंद्रात जागा करून देण्यात येणार आहे. परंतु, तात्पुरते कार्यालय नरीमन पॉईंटच्या एक्सप्रेस टॉवर मध्ये होणार आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकेश्वर देसाई यांनी सांगितले.

 

खेळण्याच्या सोईकरिता सुविधा

 

मुंबईत आठ नवीन तरणतलाव व अंधेरीला जागतिक दर्जाचे क्रीडा संकुल व सुविधा कामे होणार आहेत. अशीच संकुले दहिसर, बोरिवली व धारावी येथेही प्रस्तावित आहेत. ओशिवरा-पहाडी-गोरेगाव परिसरात गोल्फ कोर्स व क्लब हाऊसकरिता सुविधा कामे प्रस्तावित आहेत.

 

मुंबई विद्यापीठ

 

कलिना येथील मुंबई विद्यापीठाच्या ६१ इमारतींपैकी ३६ इमारती जुन्या आहेत. त्यांची दुरुस्ती व सुविधा कामे करणे जरुरीचे ठरत आहे. मुंबई विद्यापीठातर्फे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या विषयाकरिता एक संशोधन विभागसंस्था स्थापली जाणार आहे. याकरिता कॅलिफोर्निया येथील वाधवानी एआय संस्थेचे मार्गदर्शन घेण्याचे ठरले आहे.

 

न्यायालयाकरिता इमारत

 

माझगाव येथील पाचमजली धोकादायक जुनी इमारत पाडून, त्याच जागी १७ मजली इमारत बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. याकरिता तांत्रिक गोष्टींसाठी चार सल्लागार नेमले आहेत. यात ४८ खोल्या बांधण्यात येणार असून प्रकल्पाला तब्बल ३८७ कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कूर्म गतीने काम करण्याच्या वृत्तीवर न्यायालयाकडून ताशेरे मिळत आहेत.

 

म्युझियमचे बांधकाम

 

भाऊ दाजी लाड म्युझियम सुमारे दहा वर्षांनी दुरुस्त होऊन चालू होणार आहे. हे म्युझियम ब्रिटिश पद्धतीने १८५७ मध्ये बांधले गेले होते. आता येथे अनेक सेवा उपलब्ध होणार आहे. पालिकेकडून मुंबईतील पहिले कापडांचे म्युझियम चिंचपोकळी येथील काळाचौकीच्या युनायटेड मिलच्या हद्दीत बांधले जाणार आहे. जेजे कलाम हाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून येथे संगीतमय फाऊंटनचा रचना आराखडा तयार केला जाणार आहे.

 

मुंबईत करमणूक केंद्र

 

महिंद्र संकुलाचे अध्यक्ष आनंद महिंद्र यांनी माहिती दिली की, मुंबईत महिंद्रच्या कांदिवलीच्या जागेवर चित्रपट विषयक व करमणुकीसंबंधी व्यवसाय वाढविण्याकरिता तीन प्रकल्प हाताळण्यात येणार आहे व त्याकरिता १७०० कोटी रुपये गुंतविले जाणार आहेत.

 

सुशोभिकरण्याचे प्रकल्प चर्चगेट येथील वारसा स्थळ उद्यानाचे सुशोभिकरण व दुरुस्ती कामे

 

मरिन ड्राईव्ह व बॅण्डस्टँड परिसरातील रस्त्याच्या पृष्ठभागाच्या तसेच इतर काही दुरुस्त्या करण्यात येणार आहेत. दुबई व शांघायसारख्या सुविधा पुरविण्याची कामे देखील करण्यात येणार आहेत.

 

शतकांपूर्वीचे पेयजल झऱ्यांच्या दुरुस्त्या व फ्लोरा फाऊंटन येथील सुविधा कामे

 

फोर्ट भागात दुबईसारखे जलफवारे पुरविण्यासाठी सुविधा कामे करण्यात येत आहेत. पुढील वारसा स्थळांची दुरुस्ती करणे प्रस्तावित आहेत - हॉर्निमन सर्कल, वेलिंगटन फाऊंटन, वाडिया टॉवर, काळा घोडा

 

- राजाबाई टॉवरच्या दुरुस्त्या व सुविधा कामे 

- वांद्रे किल्ला व खार येथील दुरुस्त्या व सुविधा कामे.

- हाजी अली येथील दुरुस्त्या व सुविधा कामे.

- जे. जे. हॉस्पिटलजवळील उड्डाणपुलाखालील दुरुस्त्या व सुविधा कामे.

- भायखळा येथील राणीबागेकरिता दुरुस्त्या व सुविधा कामे.

- घाटकोपर व इतर ठिकाणी विद्यार्थ्यांकरिता व पर्यटन स्थळांकरिता सुविधा कामे.

- मलबार हिल येथे मुंबई दर्शनाकरिता बहुउद्देशीय गॅलरी काम व सुविधा कामे.

 

तेव्हा, एकूणच या वारसा स्थळांच्या आकर्षणाचा विचार करता, मुंबईतील पर्यटन अधिकाधिक वाढण्यासाठी राज्य शासनानेही प्रयत्न करणे तितकेच गरजेचे आहे.

@@AUTHORINFO_V1@@