अल-हसकाह व तेलाचे राजकारण - भाग 3

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jul-2018   
Total Views |


 


‘इसिस’ने बरोबर ठरवून सर्वाधिक तेलविहिरी आपल्या ताब्यात घेऊन आपली आर्थिक बाजू भक्कम करायचा प्रयत्न केला होता. अल-हसकाहमधील मर्लान हे ठिकाण तेलाच्या दृष्टीने सीरियामधील खूप महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक आहे.

 

अल-हसकाहच्या युद्धाच्या निमित्ताने सीरियाचे तेल उत्पादन, त्याचा महसूल वाटा, नागरी युद्धाची व ‘इसिस’ची झळ इत्यादी एकमेकांशी जोडलेल्या पण तेलाभोवती फिरणाऱ्या गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे. अमेरिकेच्या ‘EIA' म्हणजे ‘Energy Information Administration'च्या सीरियाच्या विश्लेषणानुसार नागरी युद्धाआधी सीरिया सरकारला एकूण दरडोई वार्षिक उत्पन्नापैकी अनुमाने एक चतुर्थांश म्हणजे २५ टक्के महसूल हा सीरियाच्या वायू व तेलाच्या उत्पन्नातून मिळतो. तेव्हा सीरियाचे तेल उत्पादन अंदाजे ३ लाख ८५ हजार पिंप प्रतिदिन व नैसर्गिक वायूचे उत्पादन ३१.६ कोटी घनफूट प्रतिदिन इतके होते. यातील १.५ लाख तेल निर्यात केले जात असे. यातील ९५ टक्के तेल निर्यात युरोपीय राष्ट्रांना होत असे, तर उर्वरित तेल अंतर्गत सीरियामध्ये उपयोगात आणले जात असे. त्यामुळे या प्रमुख महसूल स्रोतावरच हल्ला करून तो ताब्यात घेतल्यास देशाच्या दरडोई वार्षिक उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम होऊन सरकार आपल्यासमोर गुडघे टेकून संधी करण्यास तयार होईल. तसेच आपल्याला आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी आर्थिक स्रोतही मिळेल. म्हणजे, आर्थिक उत्पन्नाचा स्रोत व तेलामुळे सरकारला हवे तसे वाकवता येईल, हा ‘इसिस’चा तेलसाठे ताब्यात घेण्यामागील उद्देश होता.

 

२०१४ साली हसकाहमधील तेलविहिरी आपल्या ताब्यात घेण्याच्या उद्देशाने ‘इसिस’ने मोहीम आखून हल्ले सुरू केले. सुरुवातीला त्यांना यश मिळाले तेव्हा सप्टेंबर २०१४ पर्यंत हसकाह प्रांतातील अल-शद्दादी, अल- जिब्सी व अल-हौल तेलविहिरी त्यांच्या नियंत्रणाखाली आल्या. अल-हसकाहच्या दक्षिण भागातील रक्का प्रांतातील काही लहान तेलसाठे ‘इसिस’च्या ताब्यात होते. त्यासोबत सीरियामधील देर इझ्झोर प्रांतामधील अल- ओमर व अल-तनाकसह त्या प्रांतातील ९ तेलसाठेही ‘इसिस’च्या ताब्यात होते, तर कुर्दांकडे म्हणजे ‘वायपीजी’कडे अल- हसकाहमधील केवळ मर्लानमधील तेलक्षेत्र होते. या तेलक्षेत्रात अनुमाने १३२२ तेलविहिरी होत्या. १ देर इझ्झोर तेलविहिरीतून अंदाजे ३४ ते ४० हजार पिंप प्रतिदिन तेल काढले जायचे. पण, अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आघाडी तसेच रशियाने ‘इसिस’विरुद्ध तेलसाठ्यांना लक्ष्य करून केलेल्या बॉम्बवर्षावामुळे नंतर हे प्रमाण घटले. ‘इसिस’ने इराकमधील मोसूलजवळील कय्यारा तेलक्षेत्र ताब्यात घेतले होते, ज्याची क्षमता प्रतिदिन आठ हजार पिंप तेल इतकी होती. म्हणजे यापेक्षा देर इझ्झोर तेलसाठ्याची क्षमता पाचपट अधिक होती. सीरियातील सर्व तेलसाठ्यांची गुणवत्ता सारखीच नव्हती. अल-ओमार तेलक्षेत्रातील तेल उच्च दर्जाचे असल्याने त्याला ४५ अमेरिकन डॉलर प्रतिपिंप भाव मिळत असे, तर बाकी तेलक्षेत्रांना कमीत कमी २५ अमेरिकन डॉलर प्रतिपिंप भाव मिळत असे.

 

सीरियामधील तेलक्षेत्र, तेल- उत्पादन व भाव

तेलक्षेत्र - अल- तनाक - अंदाजे तेल उत्पादन - ११ ते १२ हजार - किंमत - ४०

तेलक्षेत्र - अल- ओमार - अंदाजे तेल उत्पादन - ६ ते ९ हजार - किंमत - ४५

तेलक्षेत्र - अल- तब्का - अंदाजे तेल उत्पादन - १५०० ते १८०० - किंमत - २०

तेलक्षेत्र - अल- खराता - अंदाजे तेल उत्पादन - १००० - किंमत - ३०

तेलक्षेत्र - अल- शौला - अंदाजे तेल उत्पादन - ६५० ते ८०० - किंमत - ३०

तेलक्षेत्र - दैरो - अंदाजे तेल उत्पादन - ६०० ते १००० - किंमत - ३०

तेलक्षेत्र - अल- तैम - अंदाजे तेल उत्पादन - ४०० ते ६०० - किंमत - ४०

तेलक्षेत्र - अल- रशिद - अंदाजे तेल उत्पादन - २०० ते ३०० - किंमत - २५

(किंमत डॉलरमध्ये प्रतिपिंप)*

 

 
 

म्हणजे ‘इसिस’ने बरोबर ठरवून सर्वाधिक तेलविहिरी आपल्या ताब्यात घेऊन आपली आर्थिक बाजू भक्कम करायचा प्रयत्न केला होता. अल-हसकाहमधील मर्लान हे ठिकाण तेलाच्या दृष्टीने सीरियामधील खूप महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक आहे. मर्लानमध्ये कुर्द, अरब व असेरिअन वंशीय लोक राहतात. २०१४ व २०१६ मध्ये रोजावाच्या घटनात्मक परिषदा येथेच भरल्या होत्या, इतके हे ठिकाण कुर्दांच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. तेलामुळे हे ठिकाण तसे समृद्ध आहे. या युद्धात ‘इसिस’चा पराभव करून व एनडीएफ व सीरिया सरकारला पराभूत करून कुर्दांनी या तेलसाठ्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. येथे तेलाचा शोध प्रथम १९३४ साली लागला. पण, कारातचोक येथील तेलविहिरीचा शोध लागून त्याचा उपयोग करून संपन्नता येऊन मर्लानचा विकास व्हायला १९५६ हे वर्ष उजाडले. नंतर १९५९ ला अल-सुवायदा तेलविहिरीचाही शोध लागला. कारातचोक व अल-सुवायदा या तेलसमृद्ध शहरात ३५० लहान तेलविहिरी आहेत. त्यातून अंदाजे प्रतिदिन ३० ते ३५ हजार पिंप तेल उत्पादित केले जाते. पण नुसते तेलसाठे ताब्यात घेऊन काय उपयोग? त्यातून काढलेले तेल शुद्धीकरण करून मगच वापरता येते. त्यासाठी लागणारी वाहतूकव्यवस्था, तेल शुद्धीकरण कारखाने व त्याचे तंत्र हे सर्व आवश्यक असते. त्यामुळे येथील व सीरियाच्या इतर ठिकाणांतील तेलसाठे ‘इसिस’ने ताब्यात घेतल्यावर या प्रक्रियेसाठी त्यांना फार झगडावे लागले. अमेरिकेच्या ‘EIA’च्या अनुसार, २००८ ते २०१० मध्ये म्हणजे नागरी युद्धाच्या आधी सीरियाचे तेल-उत्पादन सरासरी अंदाजे ३ लाख ८५ हजार पिंप (barrels) प्रतिदिन /यापेक्षाही जास्त होते. पण, नंतर नागरी युद्ध, अस्थिरतेचे सावट व ‘इसिस’चे नियंत्रण अशा विविध कारणांमुळे ते २०१२ ला १.६४ लाख, २०१३ ला २८ हजार तर २०१४ ला १४ हजार पिंप (barrels) प्रतिदिन इतके खाली गेले.

 

कुर्द युद्धनीतीप्रमाणे व्यवहारनीतीमध्येही हुशार होते. त्यांना याची जाणीव होती की, नुसते तेलसाठे ताब्यात घेऊन आर्थिक सुबत्ता येणार नाही. कारण त्यावर प्रक्रिया करूनच नंतर ते विक्रीयोग्य होते व सध्या आपल्याकडे हे तेल शुद्धीकरण कारखाने व तंत्रज्ञान नाही. म्हणून मग कुर्दांच्या पीवायडी पक्षाने सरळ अशर असादच्या शासनासोबत महसूल वाटपाचा करार केला व तेलविहिरींच्या नियंत्रणाचे अधिकार असाद शासनाकडे सोपवले. ज्यानुसार असाद शासन तेल महसूलातील ६५ टक्के वाट घेईल व पीवायडी २० टक्के वाटा घेईल. पीवायडी उर्वरित महसूल तेलक्षेत्राचे संरक्षण करणाऱ्या स्थानिक अरब सेनेला देईल, तर असाद सरकार संरक्षक व इतर कामगारांचे पगार देण्यास उत्तरदायी असेल. पीवायडीचे अधिकारी तेल- उत्पादनाचे अहवाल आपल्या संघटनेला देतील व त्यासाठी ते मर्लानमध्ये स्वत:ची कचेरी स्थापू शकतील. अशाप्रकारे कुर्दांच्या सामंजस्याच्या भूमिकेमुळे व त्याला सरकारने सामंजस्याने दिलेल्या प्रतिसादामुळे हळूहळू या भागातील तेल- उत्पादन पूर्वपदावर येत आहे.

 

@@AUTHORINFO_V1@@