रोहिंग्यांना देशाबाहेर काढण्याचे राज्य सरकारांनाही पूर्ण अधिकार : गृहमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2018
Total Views |

रोहिंग्या मुस्लिमांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्याचे राज्य सरकारांना आदेश 



नवी दिल्ली : देशामध्ये बेकायदेशीरपणे घुसखोरी करत असलेल्या रोहिंग्या मुस्लिमांना देशातून बाहेर हाकलण्याचे राज्य सरकारांना देखील पूर्ण अधिकार असून आपल्या राज्यातील रोहिंग्या मुस्लिमांवर सर्व राज्य सरकारांनी बारीक लक्ष ठेवावे, असे आदेश केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी दिले आहे. लोकसभेच्या आजच्या सत्रामध्ये बोलताना त्यांनी याविषयी माहिती दिली असून सर्व राज्यांना रोहिंग्या मुस्लिमांविषयी सावध राहण्याचे निर्देश दिले आहेत.

प्रत्येक राज्य सरकारने आपल्या सीमेमध्ये आलेल्या सर्व रोहिंग्या मुस्लिमांची सर्व प्रकारची माहिती गोळा करावी. त्यांचे नाव, त्याचा पत्ता तसेच त्यांची बायोमॅट्रिक माहिती सरकारने आपल्या जवळ ठेवावी, तसेच त्यांच्या हालचालींवर देखील बारीक लक्ष ठेवावे, असे सिंग यांनी सभागृहात सांगितले. याचबरोबर राज्य सरकारांना रोहिंग्या मुस्लिमांना देशातून बाहेर काढण्याचे देखील पूर्ण अधिकार असून रोहिंग्या मुस्लिमांच्या हालचालीमध्ये कसल्याही प्रकारचा गैरप्रकार आढळून आल्यास राज्य सरकार आवश्यक ती कारवाई करू शकते, असे देखील त्यांनी म्हटले आहे.

गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यामध्ये म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लीम आणि म्यानमार सैन्य यांच्यात झालेल्या हिंसाचारानंतर मोठ्या प्रमाणात रोहिंग्या मुस्लीम हे भारतामध्ये आले आहेत. यामुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने रोहिंग्यांच्या घुसखोरीवर कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. सीमेवर देखील मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केले असून राज्य सरकारनं देखील रोहिंग्यांवर कारवाई करण्याचे अधिकार दिले आहेत. तसेच सध्या सर्वोच्च न्यायालयात देखील या प्रकरणावर सुनावणी सुरु आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@