इराणच्या भेटीसाठी अमेरिका कधीही सज्ज : ट्रम्प

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2018
Total Views |



वॉशिंग्टन डी.सी. : अमेरिका आणि इराण यांच्यातील संबंध चांगले राहावेत, यासाठी इराणची भेट घेऊन चर्चा करण्यास अमेरिका कधीही सज्ज आहे, अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. व्हाईट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

जागतिक शांततेसाठी अमेरिका कोणाशीही चर्चा करण्यासाठी नेहमी सज्ज आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिक सुधारावेत, यासाठी देखील अमेरिका प्रयत्न करत आहे. त्यामुळे इराणने जर अमेरिकेशी चर्चेसाठी पुढाकार घेतला तर आपण चर्चेसाठी नेहमी तयार आहोत, असे ट्रम्प यांनी म्हटले. तसेच इराणने स्वतः चर्चेसाठी पुढाकार घेतल्यास आपण बिनशर्त इराणशी चर्चा करण्यासाठी जाऊ, असे देखील ट्रम्प यांनी म्हटले आहे.

माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळामध्ये अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये झालेल्या अणु करारावरून सध्या दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. ट्रम्प यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वीच इराणबरोबर असलेला अणु करार रद्द करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये कटुता येऊन तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे ट्रम्प यांच्या या भुमिकेमुळे दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु होऊन संबंध सुधारण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
@@AUTHORINFO_V1@@