जळगावचा विकास भाजपाच करणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2018
Total Views |

ती क्षमता फक्त भाजपाकडेच विकासासाठी पक्षाला नको कुणाच्या कुबड्या
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची ‘तरुण भारत’शी बातचीत
  

 
 
केंद्र आणि राज्य सरकारही आहे भक्कमपणे पाठीशी
जळगाव, ३० जुलै :
सध्या केंद्रात आणि राज्यातही भाजपाची सत्ता आहे. दुर्दैवाने जळगाव महापालिकेत मात्र, भाजपाची सत्ता नाही. त्यामुळे सरकारची कितीही इच्छा असली, तरी शहरातील विकासकामांसाठी सत्ताधार्‍यांचाच शब्द अधिक मोलाचा असतो. त्याचा गैरफायदा घेत विकासकामांसाठी सरकारने निधी देऊनही महापालिकेतील सत्तारूढ खान्देश विकास आघाडीने दरवेळी तो निधी खर्च करण्यात आडकाठी आणली. आता महापालिकेत भाजपाची सत्ता आली तर हे शहर अधिक प्रगतीकडे जाईल, असा विश्वास जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी ‘जळगाव तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केला.
होय, मी हमी घेतो, एकावर्षात विकास घडणार
अन्यथा, विधानसभेत मते मागायला येणार नाही!
 
महापालिकेत संपूर्ण बहुमत मिळून भाजपा सत्तेवर आल्यास शहराच्या विकासाच्यादृष्टिने भाजपाचे काय नियोजन आहे?
महापालिकेतील गेल्या १५ वर्षातील खाविआची हालाखीची राजवट जळगावकरांनी पाहिली आहे. बहुमतातील खाविआने महापालिकेत काय गोंधळ घातला तेही सर्वांनी पाहिले आहे. याच संख्याबळावर खाविआने सरकारला श्रेय जाईल या भीतीने सतत विकासकामांना खोडा घातला. त्याचा दंड निरपराध आणि दरवर्षी प्रामाणिकपणे कर भरणार्‍या जळगावकरांना भोगावा लागला. सत्ताधार्‍यांच्या अशा वागण्यामुळेच करापोटी मिळणारे कोट्यवधींचे उत्पन्न थकित झाले. तुम्ही कामच करीत नसाल तर आम्ही कर का द्यायचे? असा करदात्यांचा प्रश्‍न आहे. तरीही खाविआ सुधारली नाही. स्वतःच्या मस्तीत राहिली. परिणामी, विकासाचे व्हीजन असणारी अनेक चांगली माणसे खाविआला सोडून गेली तर अनेकजण वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये, घोटाळ्यांमध्ये अडकले आहेत. राज्यातील १३ महापालिकांमध्ये भाजपाची सत्ता आहे. अन्य शहरांप्रमाणे जळगावात जास्तीतजास्त निधी आणून एक चांगली स्मार्टसिटी निर्माण करु.
 
 
भाजपाकडे आहे विकासाची ‘ब्ल्यू प्रिंट’
भाजपाकडे शहराच्या विकासाची ‘ब्लू प्रिंट’, काम करण्याची जिद्द असलेले कार्यकर्ते, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा यांच्यासारखे मार्गदर्शक पाठीशी आहेत. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयाने अधिकाधिक कामे आणि निधी जळगावमध्ये खेचून आणता येईल. म्हणूनच तर म्हणणे आहे की, एक वर्षात चित्र पालटून दाखवू.
 
 
कर्जमुक्ती करुन विकासकामांची दृष्टी केवळ भाजपाकडेच !
विकासकामांसाठी सरकारने यापूर्वीही निधी दिला आहे. मात्र, त्याचा कसा खेळखंडोबा झाला हे सर्वांसमोर आहे. मा.मुख्यमंत्र्यांनी दिलेले २५ कोटी खर्च होण्यात अडथळे आणले. मग सत्ताधार्‍यांना विकासाची दृष्टी आहे असे कसे म्हणायचे? करदात्यांचा पैसा खर्च झाला पण पाणी, आरोग्य-स्वच्छता, रस्ते, पथदिवे यासारख्या किमान मूलभूत सोयीसुविधाही जनतेला मिळाल्या नाहीत. मुख्यमंत्र्यांनी जळगावच्या विकासासाठी २०० कोटी रुपये देण्याचे आश्‍वासन दिले आहे. हा निधी कमी पडला तर अजूनही देऊ, असा त्यांचा शब्द आहे. महापालिका कर्जमुक्त करण्याचे भाजपाचे ध्येय आहेच. असे झाल्यास दरमहा व्याजापोटी भराव्या लागणार्‍या ३ कोटी (वार्षिक ३६ कोटी रुपये) रुपयांतून किती विकासकामे उभी राहू शकतात? याचा विचार करा. यासाठी फार दूर जायला नको. नाशिकची महापालिका याचे ताजे उदाहरण आहे. म्हणूनच आम्ही म्हणतो-
 
 
‘सत्ता द्या, मनपा कर्जमुक्त करू’
 
जळगाव महापालिकेत भाजपाची सत्ता नसली तरी शहराच्या विकासासाठी सरकारने काय केले?
भाजपाची सत्ता असो की, नसो - सर्वसामान्य नागरिक हा केंद्रबिंदू मानून सरकार विकासकामांसाठी निधी देत असते. जळगावलाही सरकारने निधी देण्यात कधीही कुचराई केली नाही. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी २५ कोटी रुपये दिले. पण भाजपला विकासाचे श्रेय मिळेल म्हणून खर्चच न होऊ दिल्याने तर त्याला सरकार काय करणार? देणारा कुबेर असला तरी घेणार्‍याचीही पात्रता असावी लागते.
 
 
खाविआने केली अडवणूक
सरकारने अमृत योजनेसाठी ६५० कोटीतील २४९ कोटींचा पहिला हप्ता दिला. गटारींसाठी ४५० कोटींची मलनिस्सारण व भूमिगत गटार योजना सरकारने देऊ केली. पण महापालिकेतील सत्तारूढ खाविआने त्यासाठी लागणार्‍या जागेपैकी केवळ १/३ कामासाठीच जागा दिली. त्यामुळे उरलेली २/३ कामे मार्गी लागू शकली नाहीत.
 
 
भाजपाला मिळाला प्रचंड प्रतिसाद!
भाजपाला सर्वदूर आणि सर्व स्तरातून पाठिंबा मिळतो आहे. हे अभ्यासपूर्ण निरीक्षण आणि त्यातून काढण्यात आलेले विश्‍वासार्ह निष्कर्ष आहेत. जळगावकर आता खाविआला उबगले असून भाजपाच्या झेंड्याखाली एकत्र आले आहेत. जनमानसाचा हा रेटा भाजपाच्या केवळ यशाचीच नव्हे, तर संपूर्ण यशाची ग्वाही देत आहे. यासंदर्भात करण्यात आलेले सर्वेक्षणही या निवडणुकीत भाजपाला ५२ हून अधिक जागा मिळतील, असे सांगते. इंटेलिजन्सचाही हाच आकडा आहे. जळगावकरांनी त्यांचे कर्तव्य पार पाडावे, आम्ही आपली जबाबदारी पार पाडू.
 
 
भाजपावर जातीयवादाचा आरोप करणे हे मूर्खपणाचे लक्षण
भाजपा सर्वसमावेशक असून, विकासावर भर देणारा आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ हेच पक्षाचे धोरण आहे. जळगाव महापालिका निवडणुकीत ८ मुस्लीम बांधवांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. यातून काय दिसते? भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद जमाल सिद्दीकी यांच्याकडे पक्षाने दिले आहे, ते त्यांच्यातील राष्ट्रीय विचार, गुणवत्ता आणि पक्षनिष्ठा पाहूनच.
 
 
भाजपाच घडवेल अमूलाग्र बदल
विकासकामांसाठी निधी हाताशी आहे. कमतरता होती ती इच्छाशक्तीची. आता हे काम भाजपाचे नगरसेवक महापालिकेत सत्तारूढ होऊन करून दाखवतील. ते नक्कीच बदल घडवतील. जळगावकरांची अव्यवस्थेतून सुटका करून त्यांना सुखाचे दिवस आणण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. त्यासाठी एक वर्षाचा पहिला टप्पा भाजपाने ठरविला आहे.
 
 
गाळेधारक आणि हॉकर्सचाही पाठिंबा
भाजपाच्या शहरविकासाच्या भूमिकेला गाळेधारक अणि हॉकर्स बांधवांनीही पाठिंबा देवून विश्‍वास व्यक्त केला आहे. तो कायम ठेवण्यासाठी आणि गाळेधारक व हॉकर्स बांधवांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आम्ही सर्व ते आवश्यक प्रयत्न करून हा विषय मार्गी लावू.
 
 
भाजपाचा स्वबळावर विश्वास इतरांच्या कुबड्या कशाला
 
शिवसेनासुद्धा सरकारकडून ४०० कोटींचा निधी आणेल. कारण मुख्यमंत्री हे ११ कोटी जनतेचे प्रतिनिधी असल्याने ते युतीधर्मही पाळतील, असे शिवसेनेच्या जाहिरातीत म्हटले आहे. याविषयी काय सांगाल?
निवडणुकीच्या जाहिरातींमध्ये प्रत्येक पक्षाला आपले धोरण, मानस आणि अपेक्षा व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार असतो. त्याने मतदारांना काय आश्‍वासने द्यावीत, कुठली वचने द्यावीत, काय मानस व्यक्त करावा, हा ज्याचा त्याचा प्रश्‍न असतो. मुख्यमंत्री हे राज्यातील ११ कोटी जनतेचे आहेत हे खरे असले तरी ते ज्या राष्ट्रीय पक्षाचे प्रतिनिधीत्व करतात त्या पक्षाच्या विरोधात शिवसेना निवडणूक रिंगणात उतरली आहे. हा समोरासमोरचा सामना आहे. यात जो अधिक तुल्यबळ ठरेल त्याला विजय मिळेल. आता कुठे निवडणूक ऐन रंगात आली आहे. भाजपाला पूर्ण बहुमत मिळेल. भाजप स्वबळावर महापालिकेत सत्ता स्थापन करणार, अशी परिस्थिती आहे. तर युतीच्या कुबड्या हव्या कशाला ? निवडणूक होवू द्या, सर्व चित्र स्पष्ट होईल. महत्त्वाचे म्हणजे जळगावमधील विकासकामांसाठी निधी भाजपा सरकारच देणार असेल तर महापालिकेत अन्य मध्यस्थ हवाच कशाला? अशी पक्षाची भूमिका आहे. महापालिकेत भाजपाला १०० टक्के सत्ता हमखास मिळेल, असा आमचा पूर्ण विश्वास आहे.
@@AUTHORINFO_V1@@