रामदास आठवले दक्षिण-मध्य मुंबईतून लढणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2018
Total Views |


 

मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील दक्षिण-मध्य मुंबई या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सध्या या मतदारसंघातून शिवसेनेचे राहुल शेवाळे निवडून गेले आहेत, तर रामदास आठवले यांना भारतीय जनता पक्षाने आपल्या कोट्यातून राज्यसभा सदस्यत्व दिले आहे.
 

वांद्रे येथे झालेल्या रिपाइंच्या बैठकीत रामदास आठवले यांनी हा निर्णय जाहीर केला. तसेच, आपल्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागा, असे आदेशही आठवले यांनी दिले आहेत. रामदास आठवले यापूर्वी पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा निवडून गेले परंतु त्यानंतर २००९ मध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघातून ते पराभूत झाले. त्यानंतर आठवले कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीची साथ सोडून भाजपप्रणीत रालोआमध्ये सामील झाले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना वेगळे लढले असता त्यांनी भाजपसोबत राहण्याचा निर्णय घेतला. भाजपच्या कोट्यातून त्यांना राज्यसभा खासदारकी तसेच त्यानंतर केंद्रात मंत्रिपदही देण्यात आले. आता रामदास आठवले यांनी मुंबईतून निवडणूक लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मदारसंघ हा रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्लाअसून मतदारसंघातील चेंबूर, अणुशक्तीनगर, धारावी, नायगाव, वडाळा हे आंबेडकरी चळवळीचे बालेकिल्ले असणारे विधानसभा मतदारसंघ आहेत.त्यामुळे या भागात रामदास आठवलेंच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाची ताकद व जनसंपर्क मोठा असल्याचा दावा आठवलेंच्या गोटातून करण्यात आला आहे.

 

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना व भाजप यांची युती होती व युतीद्वारेच सेनेचे राहुल शेवाळे दक्षिण-मध्य मुंबईतून खासदार झाले. त्यामुळे आता २०१९ च्या लोकसभेसाठी युती होणार का, आणि झाल्यास शिवसेना हा मतदारसंघ आठवलेंना सोडणार का, युती न झाल्यास भाजप हा मतदारसंघ आठवलेंना सोडणार का, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

 

निर्णय रालोआच्या वरिष्ठ पातळीवरच

सध्या भाजप, शिवसेना आणि घटक पक्षांची युती आहे. रामदास आठवले यांनी मध्य मुंबईतून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असावी. मात्र, कोणी कोणत्या ठिकाणाहून निवडणूक लढवायची याचे निर्णय रालोआच्या वरिष्ठ पातळीवरच घेतले जातील.

- आ. अतुल भातखळकर

सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश भाजप

 

 

शिवसेनेला कोणीही गृहीत धरू नये

२०१४ विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती तुटली आणि भाजपची महाआघाडी झाली. त्यानंतर गेल्या चार वर्षांमध्ये यासंदर्भात शिवसेनेसोबत त्यांची एकही बैठक पार पडली नाही. त्यामुळे आता भाजप आघाडी म्हणून त्यांनी यासंदर्भात काय करावे हा त्यांचा निर्णय आहे. जागेचा निर्णय हा शिवसेना-भाजपचे वरिष्ठच घेतील. आठवले हे मोठे नेते आहेत आणि कोणत्याही ठिकाणाहून निवडणूक लढवायचे त्यांना स्वातंत्र्य आहे. शिवसेनेला कोणीही गृहीत धरू नये.

@@AUTHORINFO_V1@@