बजरंग बोगद्याचा खर्च साचलेल्या पाण्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2018
Total Views |

 
 
०२ नवीन बोगदे
०१ जुना बोगदा

 


 
 
शहरात एका भाग दुसर्‍या भागाला जोडण्यासाठी उत्तम पर्याय आहेत तो म्हणजे बजरंग बोगदा. शहरातून प्रेमनगर, जुना हायवे, एसएमआयटी, शिवाजीनगर, पिंप्राळा आदी ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांना या बोगद्याचा सहारा घ्यावा लागतो. अतिशय सोईस्कर असणार्‍या या मार्गाला मात्र महापालिकेचा शनी लागल्याचे कित्येक वर्षांपासून पाहायला मिळत आहे. दरवर्षी याठिकाणी वाहनांची कोेंडी होऊन प्रवाशांना त्रास होतो. याकडे मात्र महापालिका दुर्लक्ष करत असून आम्हाला काही देणेघेणे नाही, अशी भूमिका बजावत बसते. या बजरंग बोगद्याकडे महापालिकेने लक्ष दिले पाहिजे, अशी भूमिका आता दुसर्‍या भागाचे रहिवासी करताना दिसून येत आहे.
 
बजरंग बोगदा आज एक भागातून दुसर्‍या भागात जाण्यासाठी पर्यायी साधन आहे. पिंप्राळा रेल्वे गेट रेल्वेमुळे बंद असल्याने दुचाकी वाहनधारक आणि शाळकरी विद्यार्थी बजरंग बोगद्यातून पलीकडे जाण्यास प्राधान्य देतात. परंतु, आधीच अरुंद असलेल्या या बोगद्यातून जाण्यासाठी वाहनधारक आणि विद्यार्थी घाई करत असल्याने या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रकार नित्याचे झाले आहे. दुपारी शाळा सुटल्यावर विद्यार्थी आणि सायंकाळी चाकरमान्यांची या ठिकाणी तोबा कोंडी पाहायला मिळते. मात्र, तरीही या प्रकाराकडे महानगरपालिका जाणूनबुजून कानाडोळा करत आहे की काय, असा सवाल आता नागरिक करताना दिसून येत आहे. दरम्यान, पावसाळ्यात या बजरंग बोगद्याचे तीनतेरा वाजत असतात. या बोगद्यातून जाण्यासाठी साचलेल्या पाण्यातून आपली वाहने काढणे जिकरीचे होत असून या वेळी काही किरकोळ अपघातांचे प्रमाणही वाढतात. दरम्यान, बोगद्यात साचलेले पाणी हे येणार्‍यास जाणार्‍या वाहनचालक आणि पादचार्‍यांच्या अंगावर उडून किरकोळ हाणामारीच्या घटनाही घडल्या आहेत. मात्र, निद्रित असलेल्या महापालिकेला यावर उपाययोजना करण्याची हिंमत का होत नाही, का महापालिका वाहनचालकांचा अंत पाहत आहे, असा सवाल आहे.
 
 
बोगद्यातून जाताना काही वाहनचालक तर मधोमध असलेल्या खांबाला धडकून जखमी झाल्याचेही समजले आहे. बजरंग बोगदा हा उतार प्रवाहाचा असून या बोगद्यात पावसाच्या दिवसात पाणी साचून याचा त्रास नागरिकांना होतो. एक एक वाहनाला यातून जाण्यासाठी वेळ लागत असल्याने याठिकाणी वाहतुकीची कोंडी वाढून नागरिक डोक्याला हात मारून घेत असल्याची स्थिती आहे. दरम्यान, रात्री या बोगद्यात उजेडासाठी बल्बची आवश्यकता असतानासुद्धा ते नसल्याने वाहने एकमेकांना धडकण्याचेही प्रमाण वाढले आहे. बोगद्याच्या बाजूला अर्थात प्रेमनगरच्या रस्त्याने भले मोठे पाण्याचे डबके होऊन वाहन थांबवून नागरिकांना साचलेल्या पाण्यात पाय ठेवून उभे राहावे लागते, याचा त्रास मात्र नागरिकांना होतो. उन्हापावसात नागरिकांना बोगद्यातून जाण्यासाठी उभे राहावे लागत असल्याने त्यांच्यात तीव्र संतापची लाट उसळत आहे. गेल्या वर्षी बजरंग बोगद्यात पाणी साचते, त्याचप्रमाणे नागरिकांना आपली वाहने काढताना त्रास होतो म्हणून सिमेंटने डागडुजी करण्यात आली होती. काही दिवस या कामाने त्याचे काम दाखवले नसले तरी कालांतराने सिमेंट उखडून त्याची सत्य परिस्थिती लोकांच्या समोर आली. महापालिकेला जर व्यवस्थितरीत्या कामच करायचे नसेल तर कामाचे नाटक कशासाठी करायचे असा प्रश्‍न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. महापालिकेने जर काम जमत नसेल तर तसेच ठेवून आपले कागदी घोडे नाचवण्यातच धन्यता मानावी, असा सूर आता सूज्ञ नागरिकांकडून निघत आहे.
 
वाहनचालकांना होतोय मनस्ताप
 
वाहनचालकांना आपली वाहने बजरंग बोगद्यातून काढण्यासाठी अथक परिश्रम करावे लागत असल्याची स्थिती आहे. या अरुंद असलेल्या बोगद्यातून सकाळी, दुपारी आणि सायंकाळी वाहनचालकांना विनाकारण वाहतूक कोंडीला रोज सामोरे जावे लागते. यामुळे कामाच्या ठिकाणी उशीर होऊन विनाकारण बोलणी खावी लागतात. तसेच शाळकरी विद्यार्थ्यांचीही हीच स्थिती असून यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. वाहनचालकांना आपल्या वाहनांबरोबर मधोमध असलेल्या खांबाला सांभाळून तसेच बोगद्यातील उखडलेल्या रस्त्यावरून वाहने चालवताना मरणयातना सहन कराव्या लागत असल्याचीही स्थिती आहे. शहरातील दोन भागांना जोडणार्‍या अतिशय महत्त्वाच्या या बजरंग बोगद्याकडे महापालिकेने लक्ष देण्याची गरज आहे.
 
नवीन इन, आऊट बजरंग बोगदा शो-पीस
महानगरपालिकेने काही कोटी रूपये खर्च करून बजरंग बोगद्याच्या शेजारी दोन नवीन इन आणि आऊट बोगदे तयार केले आहेत परंतु, पहिल्याच पावसात तेथे पाणी साचून त्या बोगद्याचे काम योग्य झाले नसल्याचे मनपा आणि रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आले. दरम्यान, दोघे बोगद्यांच्या नवसाचा गणपती मंदिराकडील साईडला चढ असल्याने पावसाचे पाणी बोगद्यात जाऊन नागरिकांना पुन्हा त्रास होण्याची शक्यता आहे. जळगाव शहराचा विकास करणार्‍या महापालिकेला एवढे समजू नये की, उतारावरून पाणी हे पुन्हा बोगद्यात जाऊन नागरिकांना त्रास होईल म्हणजे धन्य आहे.
दरम्यान हे प्रकार टाळण्यासाठी बोगद्याच्या उत्तरेला प्रेमनगरकडे १५ एचपीचे दोन डिझेल पंप बसवून ते पाणी एसएमआयटी महाविद्यालयाकडे जाणार्‍या नाल्यात सोडावे लागणार असल्याने यात पुन्हा ७०० कोटी खर्च करून पुन्हा खर्च करावा लागणार असल्याचे समजते.
 
महापालिकेने आता दोन पंपांचे नियोजन करून पंप हाऊसच्या माध्यमाने बंधार्‍यात साचणार्‍या पाण्यावर मात करणे गरजेचे असल्याचे मत जळगावरांचे आहे. एक पंप नादुरूस्त झाल्यास दुसरा पंप सोबतीला असेलच. अन्यथा दोन्ही नवीन बोगद्याची लेव्हल करून त्याठिकाणी कॉंक्रिटीकरण करून साचणार्‍या पाण्यावर मात करावी, अशी मागणी उत्तरेकडील रहिवाशांची आहे.
 
 
 
 
पतिक्रिया - १
उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग
 
महानगरपालिकेने कोणतेही नियोजन न करता त्याचप्रमाणे कोणत्याही शक्यता पडताळून न पाहता उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग असा प्रकार बजरंग बोगद्यासाठी केल्याचे पाहायला मिळायले आहे. महापालिकेने काही चांगले इंजिनिअर बोलवून आधी या बोगद्यांचे चांगल्या प्रकारे सर्वेक्षण करण्याची गरज होती. मात्र, बोगदा बांधायची ही लगीनघाई आता महापालिकेच्याच गळयात पडल्याची स्थिती आहे. नागरिकांचा जो पैसा या बोगदा बनवण्यासाठी वापरण्यात आला असेल, तो तर आता या प्रकारामुळे पूर्ण साचलेल्या पाण्यात गेला असल्याची स्थिती आहे. महापालिकेने यावर चांगल्या लोकांची मदत घेऊन यावर उपाययोजना करावी, अशी मागणी आहे.
- पार्थ ठक्कर, भोईटेनगर
 
पतिक्रिया - २
पहिल्याच पावसात मनपाच्या प्रयत्नांना खिंडार
 
शहरात दुसर्‍या भागाला जोडणार्‍या भागासाठी हा बजरंग बोगदा अतिशय उपयुक्त आहे. पिंप्राळा गेट नेहमी रेल्वेंसाठी बंद असल्याने बरेच नागरिक या बोगद्याचा वापर करताना दिसून येतात. दरम्यान, या बोगद्यातून जाताना होणार्‍या त्रासाला पाहून महापालिकेने नवीन बोगद्याची निर्मिती करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र नियोजनशून्य कारभारामुळे पहिल्याच पावसात त्यांच्या प्रयत्नांना खिंडार पडल्याचे दिसून येत आहे. महापालिकेने लवकरात लवकर या नवीन बोगद्याचे काम सुस्थितीत करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आहे.
- उल्हास पाटील, निमखेडी.
 
@@AUTHORINFO_V1@@