धुलीकण बनताहेत जळगावकरांचा कर्दनकाळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2018
Total Views |
 


 
 
पावसाळ्याचा पहिला टप्पा संपल्याने नागरिक आपआपल्या कामाला लागले असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी रस्त्याच्या पलीकडे पाणी साचल्याने माती असलेल्या भागाला चिखलाचे स्वरूप आले होते. मात्र पाऊस संपला असला तरी मात्र जळगावकरांच्या त्रासाला मुक्ती मिळाली नसल्याचे समजते. पावसाळ्यात रस्त्याच्या बाजूला असलेली माती आता रस्त्यावर आली असून त्याची धुळ व त्याचप्रमाणे काही ठिकाणी पावसाच्या पाण्याने रस्ता उखडला गेल्याने डांबराचे बारीक कणांच्या साम्राज्याने कहर केला आहे.
 
महामार्ग असो की साधा रस्ता यावरून अवजड अथवा चारचाकी वाहन गेल्याने रस्त्यावरी धुळ ही थेट मागे असणार्या वाहनचालकाच्या डोळ्यात जाऊन वाहनचालकांना धुलीकणांचा सामना करावा लागत आहे. यावर मात्र महापालिका केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. आपले शहर हे समस्यांनी इतके ग्रस्त झाले आहे की, आता त्यात भरीस भर म्हणून धुलीकणांनी आपले अस्तित्व सोडलेले नाही. वाहन चालवत असताना समोर असलेल्या वाहनांच्या गतीने पावसाळ्यात रस्त्यावर आलेली धुळ थेट वाहनधारकांच्या डोळ्यात जात आहे. यामुळे समोरचे वाहन दिसेनासे होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
बारीक मातीचे कण आणि डांबराचे कण हे डोळ्यात जाऊन काही वाहनचालक हे अचानक थांबतात, परिणामी मागून येणार्या गाडीला ब्रेक मारावा लागतो, यामुळे महामार्गावर अपघाताची मालिका होण्याची दाट शक्यता आहे. महामार्गच नव्हे तर रिंगरोड, शिवाजी पुतळा, बेंडाळे महाविद्यालय आदी परिसरातही याची भीषण तीव्रता पाहावयास मिळत आहे. दरम्यान उडणारी धुळ ही वाहनचालकांच्या नाकातोंडात जाऊन यामुळे नागरिकांमध्ये गंभीर आजार बळावण्याचा धोका संभवतो. त्यामुळे महापालिकेने या उडणार्या धुलीकणांवर नियंत्रण मिळवून नागरिकांना योग्य सुविधा द्यावी, अशी मागणीही आता होत आहे.
 
या उडणाऱ्या धुलीकणांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून काही नागरिक स्वतःच्या बचावासाठी हेल्मेट तर काही नागरिक गॉगलचा वापर करताना दिसून येतात, परंतु, आम्ही जर सर्व काही उपाययोजना करणार तर महापालिका का केवळ करवसुलीसाठी आहे का, असा प्रश्‍नही काही वाहनचालक करताना दिसून येत आहे. आधीच रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे काही वाहनचालकांना पाठीच्या मणक्यांना त्रास होऊ लागत असल्याचेही तरूण भारतच्या सर्वेक्षणात समोर आले आहे.
 
धुलीकणांच्या तीव्रतेेमुळे जळगाव शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून यामुळे नागरिकांना कायमची सर्दी होऊन त्याची ऍलर्जी होण्याची शक्यता आहे. श्‍वसनांचे विकार होऊन यामुळे फुफ्पुसांना त्रास होणे, दमा होणे त्याचप्रमाणे नाकातोंडातून धुलीकण आत गेल्याने आधीच दमा असलेल्या रुग्णांना याचा त्रास होतो. डोळे सुजून खाज निर्माण होणे, डोळे लाल होणे, त्वचेचे आजार होणे यासारख्या अनेक समस्यांना नागरिकांना समोरे जावे लागते. आधीच महापालिकेेचा कर भरायचा आणि पुन्हा आरोग्याच्या समस्यांना सामोरे जायचे, त्याच प्रमाणे मूलभूत सोयी सुविधांसाठी जर असा न्याय महापालिकेकडून मिळत असेल तर महापालिका काय कामाची, इतकी वर्ष सत्तेत असणारे काय कामाचे अशी विचारणा करण्यात येत आहे.
 
खोटेनगर, गुजराल पेट्रोल पंप, शिव कॉलनी, गणेश कॉलनी, आकाशवाणी चौक, टॉवर चौक, कालिंका माता परिसर या भागात ही परिस्थिती तीव्र असल्याचे तरूण भारतने केलेल्या सर्वेक्षणात समोर आली आहे. यामुळे अचानक एखादे वाहन समोर आल्याने आणि वाहनचालकांच्या डोळ्यात ही धुळ गेल्याने मोठ्या परिणामांना समोरे जाण्याची शक्यता आहे. महापालिकेने चौकाचौकात डांबरी रस्त्यावरील डोळ्यात जाणार्या धुलीकणांपासून वाहनचालकांना दिलासा द्यावा.
 
काम करण्याची इच्छाशक्ती हवी
 
महापालिकेने धुलीकणांच्या प्रश्‍नावर आता तरी जागी होऊन ही समस्या प्राधान्याने सोडवावी, अशी मागणी आहे. रोज रस्त्याची साफसफाई केल्यास धुलीकणाच्या प्रश्‍नावर सहज मात करता येईल, त्याचप्रमाणे धुळीमुळे बळावणार्या आजरांवर नियंत्रण मिळवता येईल. मात्र, यासाठी दांडगी इच्छाशक्तीची गरज आहे. ही इच्छाशक्ती महापालिका अथवा सत्ताधारी केव्हा दाखवतील, हा प्रश्‍न अधांतरीच आहे.
 
धुलीकणांनी वाहनचालक बेजार
 
दुचाकी वाहनचालकांना महापालिकेच्या सर्व मार्गांवर हा प्रकार सोसावा लागत असल्याने आता वाहनचालकांनी यासाठी तीव्र रोष व्यक्त केला आहे. डोळ्यात धुलीकण जाणे म्हणजे आजाराला निमंत्रण देणे असे आहे. असे असताना आणि हे सर्व महापालिकेला समजत असतानाही मनपा का शांत आहे, असा सवाल करण्यात येत आहे. रस्त्याच्या बाजूला असणार्या मातीच्या, डांबराच्या कणांनी मानवी जीवनाचे आरोग्य खराब होत असून याचा परिणाम सत्ताधार्यांना भोगावा लागेल. आज वाहतुकीचा जळगाव शहरात बोजवारा उडालेला असताना त्याचप्रमाणे अरुंद असलेल्या रस्त्याच्या समस्येत आता पुन्हा उडणार्या धुलीकणांची भर पडल्याने महापालिकेेने या जीवघेण्या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
 
सत्ताधारी करताहेत तरी काय?
 
सत्ताधाऱ्यांना दरवर्षी होणार्या समस्या दिसत नसतील, हे शक्यच नाही. महापालिकेकडून जर ही समस्या सुटत नसेल तर सत्तेत असणार्यांनी यावर उपाययोजना का नाही केली, असा सवाल आता सूज्ञ नागरिकांकडून होत आहे. रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ते अशी अवस्था असताना आता धुलीकणांनी नागरिकांनी बेजार झाले आहेत. त्यांना आपली वाहने व्यवस्थित चालवता येत नसल्याने त्यांना विविध आजारांनाही सामोरे जावे लागत असल्याची स्थिती आहे. वाहनचालकांच्या या समस्येवर सत्ताधारी, नाहीतर महापालिकेने उपाय शोधावा, आणि उडणार्या धुलीकणांपासून मुक्तता द्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
 
 
 
 
प्रतिक्रिया - १
धुलीकणांमुळे श्‍वसनक्रियेला त्रास
 
धुलीकण हे वाहनचालकांच्या नाकातोंडात गेल्याने त्यांना विविध आजारांची लागण होण्याची शक्यता असते. यात प्रामुख्याने, डोळ्यावर सूज येणे, खाज येणे, ऍलर्जी होऊन डोळे सतत लाल असणे त्याचबरोबर सगळ्यात मोठा गंभीर आजार म्हणजे श्‍वसनक्रियेला त्रास होेणे. धुलीकण मानवी शरीरात गेल्याने अर्धवट श्‍वसनक्रिया होऊन रक्तदाब कमी होत असल्याचे कळते. त्याचबरोबर या धुलीकणांमुळे फुफ्पुसाचा आजार होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या धुलीकणांमुळे कायमस्वरुपी होणारी सर्दी आणि खोकल्याचे रुग्ण वाढत असून नागरिकांनी अशा वातावरणात न जाता तोेंडाला मास्क बांधून घराबाहेर पडावे, जेणेकरून आपल्या या धुलीकणांचा काहीही त्रास होणार नाही. दरम्यान, महापालिकेने यावर लवकरात लवकर उपाययोजना करावी, अशी आहे.
- संदीप तायडे, माध्यमिक शिक्षक.
 
 
प्रतिक्रिया - २
धुलीकणांमुळे अपघात होता होता वाचलो...
 
जळगावातील धुलीकण हे वाहनधाकांचा कर्दनकाळ असल्याचे सध्या दिसून येत आहे. यामुळे डोळ्याची जळजळ वाढत असून हे धुलीकण डोळ्यात गेल्याने माझा अपघात होता होता वाचलो. पावसाळा संपल्याने रस्त्याच्या बाजूला असलेली माती रस्त्यावर येते, ती महापालिकेने आधी बाजूला सारली पाहिजे. त्याचबरोबर नाही रस्त्याचे डांबरीकरण तर किमान डागडुजी तरी करावी, रस्त्याची साफसफाई करावी. हे नाही केल्यास अपघातांचे प्रमाण वाढत आहेत. धुलीकण हे आज सबंध जळगावातील वाहनधारक, पादचार्यांची समस्या असून ती लवकरात लवकर सोडवून महापालिकेने नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आहे.
- गणेश ठाकुर, वाहनचालक
 
@@AUTHORINFO_V1@@