१५ वर्षात सत्ताधार्‍यांनी केला केवळ ‘टाईमपास’ बाहेरून येणार्‍या ५० हजार नागरिकांच्या व्यथाही कायम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2018
Total Views |
 
१५ वर्षात सत्ताधार्‍यांनी केला केवळ ‘टाईमपास’
 
बाहेरून येणार्‍या ५० हजार नागरिकांच्या व्यथाही कायम
 
जळगाव, ३० जुलै
महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत विकास कामे केल्याचा दावा महानगरपालिकेतील सत्ताधार्‍यांकडून होत असला तरी प्रत्यक्षात मात्र शहरात विकास झाला कुठला? आणि समस्या सुटल्या कुठल्या? हा प्रश्‍न अनुत्तरीत आहे. पंधरा वर्षात स्थानिकांचे प्रश्‍न जैसे थे असून जळगाव शहरात बाहेरून येणार्‍यांची व्यथा कायमच आहे. शहरात दररोज सुमारे ५० हजारांहून अधिक नागरिक विविध व्यवसाय आणि कामानिमित्त येतात. शहरातील नागरिकांना सुविधा मिळण्याची मारामार असताना त्यात बाहेरून येणार्‍यांच्या गर्दीमुळे उपलब्ध सुविधांवर ताण पडतो. मात्र महापालिकेतील सत्ताधार्‍यांनी याबाबत पंधरा वर्षांत कुठलेही व्हिजन न ठेवल्याने महापालिका नियोजनात नापास झाल्याचे जाणवते.
 
 
दररोज शहरात व्यवसाय व नोकरीनिमित्त ५० हजारांहून अधिक नागरिक येत-जात असतात. महापालिकेेने नियोजन न केल्याने पिण्याचे पाणी आणि शौचालयासाठी त्यांना भटकंती करण्याची वेळ येते. शहरात येणार्‍या या संभाव्य गर्दीचे महापालिकेने नियोजन करून त्यादृष्टीने सुविधा उभारण्याची गरज होती. मात्र सत्ताधार्‍यांना शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, गटारी हे प्रश्‍न सोडविण्यात अपयश आल्याचे दिसते.
जळगाव शहरात आधीच पाणीपुरवठ्याचंी समस्या असून त्यात बाहेरगावाहून व आजूबाजूच्या खेड्यावरून शहरात येणार्‍यांचा आकडाही मोठा आहे. शहरात रेल्वे, बस, खासगी वाहने, स्वत:ची वाहने यातून लाखो लोक येथे येतात. जळगाव शहराची लोकसंख्या सुमारे ४ लाख ७५ हजार असून त्यात शहरालगतचे खेडे व जिल्हा आणि इतर जिल्ह्यातून येणाार्‍यांची सुमारे ५० हजारांची संख्या मिळून ५ लाख २५ हजारावर हा आकडा जातो. सुविधा मात्र अत्यंत तोकड्या आणि तात्पुरत्या आहेत. स्वच्छतागृहाचा अभाव ही जळगावातील सर्वात मोठी समस्या आहे.
महापालिकेत खान्देश विकास आघाडीच्या सत्तेत असलेल्या नेत्यांनी दूरदृष्टी ठेवली असती तर जळगावकरांचे अनेक प्रश्‍न आजपर्यंत मार्गी लागले असते. मात्र तसे न झाल्याने शहरात समस्यांचा डोंगर कायम आहे. नागरिकांच्या अडचणी सुटत नसल्याने प्रश्‍न मांडावे तरी कुणाकडे अशी अवस्था नागरिकांची झाली आहे.
रस्त्याची
अवस्थाही दयनीय
शहरातील रस्त्यांची अवस्थाही दयनीय आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने शहरातील रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असते. उमेदवारांना चिखलातून मार्ग काढावा लागत आहे. शहरातील रस्त्यांना लागलेले ग्रहणही अनेक वर्षांपासून सुटलेले नाही. महापालिकेत गेल्या पंधरा वर्षाच्या काळात नेतृत्व करणारेच मंत्री पदावर होते. मात्र, तरीही त्यांना शहराचा विकास साधता आला नाही.
 
वाढत्या लोकसंख्येनुसार सुविधांचा अभाव
शहरातील वाढत्या लोकसंख्येनुसार लागणार्‍या मूलभूत सुविधा सत्ताधार्‍यांनी लक्षात न घेता केलेल्या नियोजनामुळे जळगावकरांना आज अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील पाणीपुरवठ्याची समस्या असो की गटारीचा प्रश्‍न वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. आश्‍वासने देण्यात आली मात्र समस्यांचे निराकरण झाले नाही. त्याचप्रमाणे शहरात शौचालये, प्रसाधनगृहे, विशेषत : महिलांसाठी शौचालयाचा अभाव आहेत. शहरात बाहेरून व स्थानिक महिला कामानिमित्त बाजारपेठेत आल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र शौचालयाअभावी महिला वर्गांकडून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.
 
नववसाहतीत सुविधांची वानवा
शहरातील नववसाहतींना शहराचे स्वरुप आलेले नाही. अद्यापही शहरातील नववसाहतीत पाणीपुरवठा, गटारी , रस्त्यांची सुविधा नाही. त्यामुळे नागरिकांकडून या समस्या सोडविण्याची आग्रही मागणी आहे. नागरिकांना या मूलभूत सुविधा मिळण्याची गरज आहे. मात्र याबाबत महापालिकेने १५ वर्षांतील वाढत्या वस्त्यांबाबत लागणार्‍या मूलभूत सुविधांबाबत कुठलेही नियोजन न केल्याने आज नववसाहतींची ग्रामीण भागातील खेड्यासारखी स्थिती आहे. या परिसरातील नागरिकही महापालिकेकडे कर भरतात, परंतु महापालिकेने त्यांना आवश्यक सेवा- सुविधांकडे दुर्लक्ष केल्याने आम्ही न्याय कुणाकडे मागावा, असा त्यांचा प्रश्‍न आहे.
गटारीचे पाणी रस्त्यावर
शहरात ठिकठिकाणी चौकाचौकात गटारीतील पाणी रस्त्यावर येते. पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांना वाहन चालविण्यासाठी कसरत करावी लागते. तसेच शहरातील रस्त्यावर चेंबरमधील पाणी येऊन दुर्गंधीचा सामना करावा लागतो. त्यासाठी गटारीचा प्रश्‍न त्वरित मार्गी लागावा, अशी मागणी होत आहे. महापालिकेतील सत्ताधार्‍यांनी नागरिकांच्या समस्यांना प्राधान्य न दिल्यानेच शहराची अवस्था बकाल झाली आहे.
 
बाहेरून शहरात येणार्‍यांची संख्या
बसद्वारे २०,०००
रेल्वेद्वारे  १०,०००
 खासगी वाहनाद्वारे  १५,०००
स्वतःच्या वाहनाद्वारे    ५,०००
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@