जगण्याने छळले होते...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2018   
Total Views |



 
 
एकीकडे भारतासारख्या देशात तरुणांची लोकसंख्या अधिक. त्यामुळे कमावते मनुष्यबळही जादा. पण, याउलट परिस्थिती आहे ती जपान, सिंगापूरसारख्या देशांमध्ये. आज या देशांमध्ये जन्मदरही कमी झाला असून वैद्यकीय सोयीसुविधांमुळे नागरिकांचे आयुर्मानही पूर्वीपेक्षा वाढले आहे.
 
 
 
 इतकेच मला जातांना

सरणावर कळले होते

मरणाने केली सुटका

जगण्याने छळले होते...

 

सुरेभ भटांच्या गीताचे गाजलेले हे बोल... खरंच कधी कधी जगणे इतके असह्य, वेदनादायी होते की माणसाची जगण्याची जिद्दच हरपून जाते. त्यापेक्षा मरण त्याला आनंदाचे द्वार, मुक्तीची किनार वाटू लागते अन् मग आत्महत्या हा एकमेव शेवटचा पर्याय समोर दिसू लागतो. जीवनातील काळोखात, उपेक्षेच्या अंधारात आपली हक्काची माणसेही दुरावतात. एकाएकी मानवी भावना बोथट झाल्यासारख्या वाटतात. जीवनातील सगळा रस, रंग आणि रागही ओसरुन जातो अन् शेवटाची इच्छा क्षणोक्षणी खुणावू लागते. सिंगापूरमध्येही सध्या तेथील ज्येष्ठ नागरिकांना अशाच निराशेने ग्रासलेले दिसते. कारण, नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, २०१७ साली सिंगापूरमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या आत्महत्येचे प्रमाण हे सर्वाधिक असल्याची नोंद झाली. २०१७ साली तब्बल १२९ ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आयुष्याला पूर्णविराम देणे पसंत केले. सिंगापूरमधील एकूण आत्महत्यांपैकी केवळ ज्येष्ठ नागरिकांच्या आत्महत्येचे प्रमाण हे तब्बल ३६ टक्के असल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांच्या आत्महत्यांमागील कारणांचा विचार करता, एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे, माणसाचे माणसाशी तुटत चाललेले नातेसंबंध. तंत्रज्ञानाने एकूणच जग जवळ आले, संपर्काने माणसे संवादकक्षेतही आली, पण एकीकडे ही जवळीक वाढली असली तरी नातेसंबंधांतला, मनातला दुरावा मात्र कालानुरुप वाढतच गेला. माणूस माणसापासून तुटला आणि त्याचा सर्वाधिक आघात हा ज्येष्ठांच्या जीवावर बेतला.

 

एकीकडे भारतासारख्या देशात तरुणांची लोकसंख्या अधिक. त्यामुळे कमावते मनुष्यबळही जादा. पण, याउलट परिस्थिती आहे ती जपान, सिंगापूरसारख्या देशांमध्ये. आज या देशांमध्ये जन्मदरही कमी झाला असून वैद्यकीय सोयीसुविधांमुळे नागरिकांचे आयुर्मानही पूर्वीपेक्षा वाढले आहे. या परिस्थितीमुळे लोकसंख्येचा ताळमेळ बिघडत चालला असून त्यासाठी ‘डेमोक्रेटिक टाईमबॉम्ब’ ही संज्ञा इंग्रजीमध्ये वापरली जाते. कारण, ६० वर्षांवरील वयाच्या नागरिकांचे देशातील अर्थव्यवस्थेतील आर्थिक योगदान साहजिकच कमी होते, उलट त्यांच्या निवृत्तीवेतनाच्या रुपात सरकारी तिजोरीवरील भार मात्र वाढतो. पण, याचा अर्थ ज्येष्ठ नागरिक कुठल्याही देशावर ओझे आहेत, असा नसून त्यांच्या क्रयशक्तीचा वापर मात्र करता येत नाही, हेही तितकेच खरे. त्यामुळे हाताला नसलेले काम, वाढत्या वयोमानामुळे भेडसावणारे दुर्धर आजार, मुलांनी पालकांना वाऱ्यावर सोडून देण्याचे वाढते प्रकार, औदासिन्य, एकाकीपणा यामुळे असंतुलित मानसिक आरोग्य यांसारख्या कारणांमुळे ज्येष्ठ नागरिकांची पावले आत्महत्येकडे वळू लागतात. याच अहवालाच्या आकडेवारीनुसार, २०१६ साली तीन लाखांच्या घरात असलेल्या ज्येष्ठांची लोकसंख्या २०३० उजाडेपर्यंत तब्बल नऊ लाखांचा आकडा पार करु शकते. त्यामुळे आगामी काळात ही समस्या अधिक भीषण स्वरुप धारण करु शकते.

 

यावरील उपाययोजनांचा विचार करता, सर्वप्रथम ज्येष्ठ नागरिक एकटे पडणार नाहीत, याची खबरदारी त्यांच्या पाल्यांना घ्यावी लागेल. त्यांना वृद्धाश्रमात किंवा एकटे वाऱ्यावर सोडून देण्यापेक्षा चार प्रेमाचे शब्द, आपुलकीची वागणूक दिल्यास कौटुंबिक स्तरावर किमान ही समस्या कमी होऊ शकते. जितके या ज्येष्ठांना त्यांच्या मुलांनी जपणे गरजेचे आहे, तितकेच त्यांनीही मुलांच्या कलाने घेऊन त्यांच्या संसारातील लक्ष कमी करायला हवे. आपले मन वाचन, संगीत, सिनेमा यामध्ये रुळवून शारीरिक तसेच मानसिक ताणतणावापासून दूर कसे राहाता येईल, यासाठी प्रयत्नशील राहायला पाहिजे. नकारात्मक विचारांपासून स्वतला परावृत्त करण्यासाठी सकारात्मक विचारांची कास धरावीच लागेल. कारण, हे जीवन अनमोल, अमूल्य आहे. त्याला असे एकाएकी संपवून हाती काही लागणार नाही. त्यामुळे सिंगापूर असेल किंवा जगाच्या पाठीवरील इतर कुठलाही देश, जगण्याची उमेद सोडून मरणाला कवटाळणे योग्य नाही. यासाठी कुटुंब-समाज-देश पातळीवर व्यापक जनजागृती आणि सकारात्मक अभियान राबविल्यास निश्चितच हा प्रश्न काहीअंशी मार्गी लागू शकतो. कारण, याला जीवन ऐसे नाव...

@@AUTHORINFO_V1@@