परंपरेच्या गाभार्‍यात...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2018   
Total Views |


 


परंपरांसाठी माणूस की माणसासाठी परंपरा, हा प्रश्न हजारो वर्षांपासून नेहमीच विचारला जातो. त्या अनुषंगाने होणारी चर्चा आणि परंपरा पाळाव्यात की नाही, परंपरांचे फायदे-तोटे, परंपरांचे मानवी अधिकारांवर, मान-सन्मानावर होणारे अतिक्रमण, हे मुद्दे काल, आज आणि उद्याही उपस्थित केले जाणारच आहेत. नुकतीच उत्तर प्रदेशच्या हामिरपूरमध्ये परंपरापालनाच्या नावाखाली घडलेली एक धक्कादायक घटना उघडकीस आली. राठ विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार मनिषा अनुरागी यांनी एका मंदिरात प्रवेश केल्यामुळे त्याचे शुद्धीकरण करण्यात आले. इतकेच नव्हे तर मंदिरात असलेल्या धौम्य ऋषींच्या मूर्तीचे पावित्र्य जपण्यासाठी प्रयाग क्षेत्री नेऊन मूर्तीला स्नानही करवले. परमेश्वराने स्त्री आणि पुरुषाला जन्माला घालताना कोणताही भेदभाव केला नाही, पण नंतर त्या परमेश्वराच्या नावावर आपली दुकानदारी व्यवस्थित चालावी म्हणून स्वार्थी लोकांनी स्त्री आणि पुरुषांमध्ये भेदभाव सुरू केला. या भेदभावाच्या नावाखाली निरनिराळ्या प्रथा, परंपरा आणि रुढींचा जन्म झाला. मध्ययुगीन काळात तर या प्रथा, परंपरा आणि रुढींनी कळस गाठला. पुरुषाने काहीही केले तरी त्याला सर्व माफ आणि स्त्रीने एखादी गोष्ट केली की, धर्म बुडाल्याचे पातक वगैरे निराधार गोष्टींचा सुळसुळाट झाला. त्यालाच विरोध म्हणून संतांनी, समाजसुधारकांनी आवाज उठवला. महात्मा बसवेश्वर, महर्षी दयानंद सरस्वती, राजा राममोहन रॉय, गोपाळ गणेश आगरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या थोतांडाविरोधात आपल्या लेखणीच्या, वाणीच्या, कार्याच्या जोरावर आव्हान दिले. या सर्वच महापुरुषांच्या कार्यामुळे स्त्री-पुरुषांची तुलना, भेदभाव बऱ्याच अंशी कमी झाला. दोघांनाही समान अधिकार असल्याची जाणीव समाजात निर्माण झाली, पण आजही स्त्री-पुरुष समान नाही, असे मानणारा एक मोठा गट अस्तित्वात आहेच. या लोकांचे प्राबल्य सध्यातरी देवधर्म, पूजा-अर्चा, मंदिरप्रवेश आदी ठिकाणी अधिक असल्याचे दिसते. केरळमधील शबरीमला मंदिर असो की, आपल्याकडचे शनीशिंगणापूरचे मंदिर वा आता हामिरपूरच्या मंदिरातील प्रकरण. प्रत्येकवेळी स्त्रियांनाच लक्ष्य केले गेले. राज्याच्या, देशाच्या, जगाच्या निम्म्या लोकसंख्येला आपल्या फाटक्या-तुटक्या परंपरांच्या जपणुकीसाठी किती काळ वेठीस धरले जाईल, हाच प्रश्न शेवटी निर्माण होतो.

 

दिवाळखोरीच्या दरीत...

 

व्हेनेझुएलाची ओळख आपल्यापैकी कित्येकांना मिस युनिव्हर्स, मिस वर्ल्ड या सौंदर्यस्पर्धांत अव्वल येणाऱ्या सौंदर्यवतींमुळे झालेली असेलच, पण आज हाच देश कंगालपणाच्या चरमसीमेवर पोहोचला असून लवकरच इथल्या महागाईत तब्बल १० लाख पट वाढ होणार असल्याचे इंटरनॅशनल मॉनेटरी फंडने म्हटले आहे. कधीकाळी दक्षिण अमेरिकेतील सर्वात श्रीमंत देश अशी ओळख असलेल्या व्हेनेझुएलामध्ये महागाईमुळे किमती इतक्या वाढल्या आहेत की, लोक तिथे महिन्याच्या पगारात फक्त एका वेळेसाठी दूध आणि ब्रेड विकत घेऊ शकतात. छोट्यातली छोटी वस्तू खरेदी करायची असेल तरी लोकांना गोण्याच्या गोण्या भरून पैसे वाहून न्यावे लागत आहेत. देशावर कोसळलेल्या या भयावह आर्थिक संकटानंतर इथल्या लोकांनी अन्य देशांत पलायन करणेही सुरू केले आहे. दररोज जवळपास पाच हजार लोक इथून पलायन करत असून इथले नोकरदार, रुग्णालयांतील डॉक्टर आणि प्राध्यापक मंडळी विद्यापीठे सोडून जात आहेत. आर्थिक संकटाचा महिलांवर नेहमीच वाईट परिणाम होतो. त्यामुळे व्हेनेझुएलात आता कितीतरी महिलांनी रोजचे जीवन कंठण्यासाठी शरीरविक्रयाचाही मार्ग पत्करला आहे. इथली परिस्थिती एवढी भीषण आहे की, लोकांकडे पैसे असूनही खाद्यपदार्थांचीही टंचाई जाणवू लागली आहे. दुसरीकडे व्यापाऱ्यांनी कोणत्याही सेवेच्या बदल्यात लोकांकडून खाद्यपदार्थ घेणे सुरू केले आहे. विशेष म्हणजे भुकेने कासावीस झालेले लोक दुकानांत लूटमार करून किंवा जनावरांना मारून, त्यांचे मांस खाऊन आपली भूक भागवत आहेत. व्हेनेझुएलावर अशी आर्थिकदृष्ट्या दरिद्री होण्याची ही वेळ येण्याआधी १९५० ते १९८० च्या दशकात हा आर्थिकदृष्ट्या सशक्त होता. इथे कितीतरी तेलविहिरी होत्या आणि इटली, स्पेनसारख्या देशांतील पर्यटकांसाठी हे सर्वोत्तम स्थान समजले जाई, पण तेलाच्या किमतीतील चढउतार आणि सरकारने स्वीकारलेल्या चुकीच्या धोरणांमुळे हा देश संकाटात सापडला. त्यानंतर या देशाची अवस्था आणखीनच बिकट होत गेली. इंटरनॅशनल मॉनेटरी फंड संस्थेच्या मते सध्या व्हेनेझुएलाची अवस्था पहिल्या महायुद्धानंतरचा जर्मनी आणि गेल्या काही दशकांतील झिम्बाब्वेसारखी झाली आहे. असे म्हटले जाते की, २०१३ साली युनियन लीडर निकोलस माडुरो व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती झाल्यानंतर देशाची अर्थव्यवस्था ढासळली, ढेपाळली. दरम्यान, यावर उपाय म्हणून राष्ट्रपती माडुरो यांनी एक लाख बोलिव्हर या चलनातून पाच शून्य हटवून त्याचे मूल्य एक बोलिव्हरइतके करणार असल्याची घोषणादेखील केली आहे.

@@AUTHORINFO_V1@@