प्रामाणिक कष्टांसारखे दुसरे कर्म नाही!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2018   
Total Views |


 

 

प्रतिकूल परिस्थितीमध्येही कष्ट आणि जिद्द या गुणांवर ‘रिलायन्स एनर्जी’ या उद्योगामध्ये महाव्यवस्थापकपद मिळवणारे सतीश कसबे.
 

जग बदल घालूनी घाव सांगून गेले भीमराव. अण्णाभाऊ साठेंचं हे वाक्य जेव्हा जेव्हा वाचतो, ऐकतो तेव्हा मनात भावना दाटून येतात. त्यांच्या साहित्यातून शोषित, वंचित आणि दुर्लक्षित समाजबांधवाचा आवाज उठवला गेला आहे. तो आवाज माझ्यात नेहमीच सामाजिक प्रेरणा जागृत करतो. माझ्या परीने माझ्या परिघातील सामाजिक प्रश् वैचारिक पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करतो.” सतीश कसबे, रिलायन्स एनर्जीचे मीरा-भाईंदर विभागाचे महाव्यवस्थापक सांगत होते. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातील देवंग्रा हे सतीश कसबे यांचे मूळ गाव. वडील श्रीरंग हे शेतमजुरी करायचे, तर आई गृहिणी. दोघेही अशिक्षित. सगळे ठिकठिकाच होते. पण, १९७२ सालच्या दुष्काळाने उस्मानाबाद विस्कळीत झाला. कसबे कुटुंब आणि भावकी उस्मानाबादहून पोटापाण्याच्या शोधात चिंचवडला स्थलांतरीत झाली. इथे श्रीरंग कसबे मिळेल ते काम करू लागले. मुख्यत: माथाडी काम करू लागले. आर्थिक तंगी आणि त्यातून बोकाळलेल्या संपणाऱ्या समस्या यांची तर इथे सर्वांना इतकी सवय झाली की, जीवन असेच असते असे वाटत राही.

 

सतीश माळावरच्या झाडासारखे वाढतच होते, त्यामध्ये चांगली बाब इतकीच की त्यांचे वडील नेहमी सांगत की, कष्टाला पर्याय नाही. इतक्यात ती घटना घडली. सतिश यांची वस्ती मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेरूळाजवळची. त्यांची आई इंदुबाई चुलीसाठी माती आणण्यासाठी निघाली, रेल्वेरूळ पार करताना अचानक थांबलेली रेल्वे सुरू झाली. आईने त्या अपघातात एक हात गमावला. दुखाचा डोंगर कोसळला. पण एक हात गमावल्यानंतरही इंदुबाईंनी कुटुंबाला कधीही कुठलीही कमी जाणवून दिली नाही. पूर्वीसारखीच ती घर सांभाळायची. कुठून आले हे धैर्य, ही आशा, ही उमेद?

 

सतीश म्हणतात, “संघर्षाच्या अग्नीतून तावून सुलाखून निघालेल्यांना छोटेमोठे वणवे भस्म करूच शकत नाहीत.” हो! हे मात्र खरेच आहे. तीच जिद्द-उमेद-आशा सतीश यांच्यामध्येही आहे. कुठलीही खाजगी शिकवणी लावता, अत्यंत प्रतिकुल परिस्थितीमध्ये सतीश त्यावेळी दहावीला शाळेमध्ये प्रथम क्रमांकांने उत्तीर्ण झाले. त्यावेळी किती शिकावे? असे विचारले, तर नॉनमॅट्रिक झाले तर खूप शिकले, असे वातावरण आनंदनगरमधले. तिथे सतीशने शाळेत प्रथम येऊन खरे निर्भेळ यश मिळवले होते. शालेय परिक्षेतील चांगल्या गुणांमुळे त्यांना अनेक संधी उपलब्ध झाल्या. त्यांनी विज्ञान क्षेत्र निवडले. पण, हे सगळे करत असताना सतीश कामही करत. काम करता करताच सतीश बारावीला विज्ञान शाखेत प्रथम श्रेणीत उतीर्ण झाले. पुढे त्यांनी शासकीय अभियांत्रिकी विद्यालयामध्ये प्रवेश घेतला. अभियांत्रिकी शिक्षण घेताना आपण शिकलो, तर आपली परिस्थिती बदलेल हे भान त्यांना कायम होते. त्यामुळेच कॉलेजमध्ये जेव्हा नोकरीसाठी कॅम्पस निवड होती, त्यातून त्यांची बीएसईएस कंपनीमध्ये निवड झाली. जी आताची रिलायन्स एनर्जी. पुढे सतीश यांनी आयएएस परीक्षेचीही तयारी केली.

 

त्यावर सतीश थांबले नाहीत. त्यांनी समाजात वेगळे क्षेत्र निवडू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे सुरू केले. मातंग समाजातील विविध क्षेत्रातील अतिउच्च सुशिक्षित आणि नोकरीमध्ये उच्चस्तरावरील काम करणाऱ्या लोकांशी संपर्क करायला सुरुवात केली. संपर्कातून समाजसेवा हे कार्य त्यांनी निवडले. समाजातील हजारो सन्माननीय सदस्य आणि इतर समाजातील अगणित व्यक्ती कायम त्यांच्या संपर्कात आहेत. इतक्या व्यक्तींशी जवळचा संपर्क असल्यामुळे कुणाचेही कुठलेही काम अडले की, ती अडचण सोडवण्यासाठी संपर्कातील संबंधित विषयांच्या व्यक्तींची मदत घेऊन ती अडचण दूर करणे हे सतीश यांचे सेवाभावी कार्यच झाले आहे. मातंग समाजातल्या उच्चशिक्षित आणि विविध क्षेत्रात उच्चस्तरावर काम करणाऱ्या व्यक्तींची व्यक्तीश: अद्यावत माहिती असणाऱ्यापैकी सतीश एक आहेत. सतीश म्हणतात, “कॉर्पोरेट जगतामध्ये समाजबांधव खूप कमी आहेत. या क्षेत्राचे आणि सामाजिक जाणिवेचा समन्वय साधून मी वाटचाल करत आहे. या क्षेत्रामध्ये आपल्यामध्ये खरोखर गुणवत्ता असेल. कष्ट करण्याची तयारी असेल, तर गरिबी, जात आणि आपण कसे दिसतो वगैरे या गोष्टी कुचकामी ठरतात.’‘ प्रगतिशील, सामाजिक न्याय असलेल्या समाजाचे स्वप्न पाहणाऱ्या अण्णाभाऊ साठेंची आज जयंती आहे. त्यांच्या साहित्यात समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या तरूणाचा लढा आहे. अण्णाभाऊ सांगून गेलेत की, प्रामाणिक कष्टासारखे दुसरे कर्म नाही, या पार्श्वभूमीवर आधुनिक समाजात संपर्क आणि समन्वय साधत सतीश कसबेंसारखे तरुण स्वत:सोबतच समाजाच्या उत्थानासाठीही झटत आहेत, हे चित्र प्रेरणादायी आहे.

@@AUTHORINFO_V1@@