मातंग समाजात परिवर्तन झालेच पाहिजे!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2018
Total Views |


 

 

आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ९८ जयंती. त्यांचे उत्तुंग व्यक्तिमत्व आणि तितकेच उत्तुंग विचार यांच्या प्रेरणाप्रकाशात समाज कालक्रमण करीत आहे. अण्णाभाऊ यांच्या जयंतीनिमित्त समाजातील तरुणांना आवाहन...
 

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन, मातंग समाजातील युवापिढीला मार्गदर्शनार्थ आव्हानात्मक लेख लिहिण्याचा मी छोटासा प्रयत्न करीत आहे. मातंग समाजातील जी मुलं डॉक्टर, वकील, इंजिनिअर झाली त्यांच्यांबद्दल मनाला सार्थ अभिमान वाटतो. परंतु, या उच्चशिक्षित पदवीधर मुलांनी मागे वळून आपल्या समाजाकडे पाहिले पाहिजे समाजाला योग्य दिशेने पुढे जाण्यासाठी मदत केली पाहिजे. शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक प्रगतीपासून वंचित असलेला मातंग समाज अज्ञानाच्या अंधारात चाचपडत आहे. या समाजाला खंबीर नेतृत्व नसल्यामुळे समाजातील तरुणांची अवस्था पंख तुटलेल्या पक्ष्याप्रमाणे झाली आहे. या पंखांना उभारी देण्यासाठी, त्यांच्यात ऊर्मी चेतवण्यासाठी सामाजिक तळमळ उरात घेऊन हा लेख लिहिण्याची धडपड करीत आहे.

 

मातंग समाजातील तरुण युवापिढीला विनम्र आवाहन- “हे तरुणा! उठ...उठ...उठ... जागा हो. अंगावरची मरगळ झटकून दे. तुझ्या मेंदूवर पडलेल्या अज्ञानाची बुरशी झाडून टाक. मागे वळून पाहा, तो भूतकाळ. तो इतिहास अजूनही दिसतो आहे. ते विदारक सत्य तुझ्या पिढ्यान्पिढ्या सडल्या. व्यासपीठात कोंडा आणि भाजी मळून त्याचे कडे करून बाळाला चारणार्या माता पोटाची खळगी भरण्याकरिता रात्रंदिवस काबाडकष्ट करणारा पिता अन्याय-अपमानाचे भयानक चटके सोसणारी माणसं तुझीच होती. अंधश्रद्धा, गुलामी आणि लाचारीच्या वणव्यात भाजून होरपळून निघत होती. अठरा पिढ्या दारिद्य्रानं त्यांच्या दारात ठाण मांडलं होतं. पण ती स्वाभिमानी होती, इमानी होती. त्यांची मनं खडकात झिरपणार्या पाझराप्रमाणं निर्मळ होती. ती माणसं शूरवीर, धाडसी होती. मग तूच सांग, तू त्यांच्याच हाडामासाचा सारख्याच रक्ताचा आहेस ना? मग आता कुठे गेला तुझ्यातला स्वाभिमान? कुठे गेली तुझ्यातली शूरवीर, धाडसी वृत्ती?”

 

जगेन तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी,’ अशी शपथ घेऊन भारतमातेला इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी सशस्त्र क्रांतीचे बंड करणारे टिळक, फुले, फडके यांना क्रांतीचे धडे देणारा आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद तुझाच पूर्वज होता ना? आपले शिर तळहातावर घेऊन इंग्रजांशी लढणारा फकीरा तुझाच होता.  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी साहित्याची निर्मिती केली. त्यांनी अनेक कथा, कादंबर्या, लोकनाट्य, लावणी, पोवाडे यांच्या माध्यमातून क्रांतिकारी विचार मांडले दलित पिढी, शोषितांना, श्रमिकांना न्याय मिळवून दिला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोलाची कामगिरी केली. रशियाला जाऊन रशियन क्रांतीचा अभ्यास केला. त्यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू सामान्य वंचित माणूस होता. सामान्य माणसाला मोठं करण्यासाठी ते लिहित होते. सामान्य माणसाभोवती त्यांच्या साहित्याचा आत्मा धारीप्रमाणे तळपत होता. त्यांनी सामान्य स्त्री-पुरुषांना नायक-नायिकाचं स्थान देऊन जगाच्या पडद्यावर आणलं. सनातनी कर्मठ जुलमाला वेशीवर टांगणारे आणि दलित, शोषित, पिडितांचे दुःख जगाच्या व्यासपीठावर मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तुझेच पूर्वज आहे. ‘जग बदल घालून घ्यावं सांगून गेले आम्हा भीमराव.’ या त्यांच्या आंतरवाणीतून त्यांनी सार्या जगाला संदेश दिला आहे की, बाबांनो, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे, आता हे जग बदलायला पाहिजे. कारण इथे अन्याय, अत्याचार, अस्पृश्यता, विषमता, लाचारी, गुलामगिरी अशा संस्कृतीचा बिमोड करण्यासाठी विषमतेच्या विळख्यातून बाहेर पडून अन्याय, अत्याचार, लाचारी, गुलामगिरीच्या पाशातून तोडून घाव घालून हे जग बदलायला पाहिजे आणि म्हणूनउठ उठ मातंगा, जागा हो. संघर्षाचा धागा हो आणि करून दाखव, तुझ्या समाजाला शासनकर्ती, तुझ्या रक्तातील शासनकर्ती जमात. हे मातंग तरुणा, तुझ्या समाजाला शासनकर्ती जमात बनवण्यासाठी तुलाच जबाबदारी स्वीकारायची आहे. त्यासाठी तुला तुझा समाज संघटीत करावा लागेल आणि मग या विषमतावादी व्यवस्थेला जाब विचारण्यासाठी संघर्ष करावा लागेल. या सर्वांचा मूळ पाया शिक्षण आहे. बाबासाहेबांनी सांगितले आहे, “शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा.” आजच्या स्पर्धेच्या जगात शिक्षणाशिवाय पर्याय नाही. कुठल्याही क्षेत्रात स्थान नाही, नोकरी नाही अशी आज तुझी अवस्था आहे. हे विज्ञानाचं युग आहे. सारं जग एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करीत आहे. टीव्ही, संगणक ही माणसाच्या प्रगतीचे साधन उपलब्ध झाली. पण मांगाचा मुलगा शिक्षणात कमी पडतो, हेच चित्र जिथे तिथे पाहण्यात येतं आहे आणि म्हणून तुला पोटतिडकीनं सांगतो, एका हातात शिक्षणाचं शस्त्र दुसर्या हातात समाज संघटनेचं शस्त्र अशी दोन्ही हातात दोन शस्त्रे घेऊन लढाई लढण्याशिवाय पर्याय नाही.

 

तुझ्या पूर्वजांनी हातात काठी, कुर्हाड, भाला, बर्ची घेऊन लढाया केल्या होत्या. पण, आता काळ बदललेला आहे. आता लेखणीचे हत्यार हे सर्वश्रेष्ठ हत्यार आहे. हे मातंग तरुणा, लक्षात ठेव, माणसं जोडली की, जग आपोआप जोडलं जातं. माणसाला घर बांधता येतं, पण घरात राहणार्यांमध्ये एकमेकांविषयी प्रेम नसेल, तर त्या घराला घरपण येत नाही आणि म्हणून समाजातील प्रत्येक व्यक्तीने मनातील अहंकार बाजूला ठेवून समाजाच्या हितासाठी झटलं पाहिजे. हे मातंग तरुणा, अजूनही काही जबाबदार्या तुझ्यावरच आहेत. अजूनही गावोगावी, शहरात मातंग समाजावर अन्याय-अत्याचार होत आहेत. खून, बलात्कार होत आहेत. आपला दुबळा समाज आया-बहिणी तुझ्याकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. त्याला आकार देण्याची जबाबदारी तुझीच आहे. अजूनही समाजात अंधश्रद्धा मूळ रोवून बसलेली आहे. ती सावरून सुधारून दिली पाहिजे. देव, धर्म, भूत, धागा, दोरा, गंडा अशा गोष्टी नाकारून त्यापासून सावध राहण्यासाठी समाजात जागृती केली पाहिजे. नाही तर समाजाची अधोगती होऊन समाज शेकडो वर्षे मागे गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे यांच्या पुस्तकाचं वाचन कर आणि दुसर्याला वाचण्यासाठी भाग पाड. कारण वाचलेस तरच वाचशील. बाबासाहेबांनी सांगितले आहे, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करील, तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून थोरा-मोठ्यांच्या विचारांची जाणीव ती तुला करून देत आहे. उरात स्वाभिमानाचा धगधगता अंगार घेऊन निर्धार करून कामाला लाग. आज मी तुला तुझ्या आईची शपथ घालणार नाही, तर तुझीच शपथ आहे आणि जर मोडशील तर अधोगतीस कारणीभूत होशील. आज तुझ्यावर आत्मचिंतन, आत्मपरिक्षण करण्याची वेळ आलेली आहे. कारण तरुणपण हे क्षणभंगुर असते. या तरुणपणाचा उपयोग विधायक कामांसाठी, चांगल्या कामासाठी केला पाहिजे. आपल्या माता-पित्याला दैवत मानले पाहिजे. काही तरुण व्यसनाच्या आहारी जाऊन आपल्या जन्मदात्या आई-वडिलांना मारहाण करतात. त्यांना घराच्या बाहेर काढतात, तर त्यांना वृद्धाश्रमात पाठवतात. अशा घटना पाहिल्या की, मनाला वेदना होतात. अशा तरुणांची जीवनात कधीच प्रगती होत नाही. ज्या घरात आई-वडिलांचा आदर होत नाही, ते आदर्श घर होऊच शकत नाही. भगवी पताका खांद्यावर घेऊन जाण्यापेक्षा आई-वडिलांची सेवा करणे यातच जीवनाचं सार्थक आहे. समाजबांधवा, तू स्वतःला कधीच कमी समजू नको. नेहमीच सकारात्मक आपला आपल्या मनात ठेव. आजचे काम उद्यावर ढकलू नको. आजचे काम आजच करायचे, या निश्चयाने बाहेर पड. बाहेरच्या जगात तुझे यश तुझी वाट पाहत आहे.

 

- शाहीर रमेश बल्लाळ

 
@@AUTHORINFO_V1@@