नर्मदा घाटीतल्या शिक्षादूत...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2018
Total Views |

 


भारती यांनी 2009 साली नर्मदा परिक्रमा केली. अवघ्या पाच महिन्यांत त्यांनी ही परिक्रमा पूर्ण केली आणि त्यांना त्यांच्या कामाची दिशा उमगली.

 

‘जनतेला शिक्षण द्या, त्यांना वाढवा, आणि अशा प्रकारेच एक राष्ट्र घडू शकतं,’ हे स्वामी विवेकानंद यांचे वचन आपण फक्त वाचतो. पण, खरचं किती लोक हा विचार प्रत्यक्षात आणतात? अशांची संख्या तशी फारचं कमी. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, हा विचार आणि त्यासाठी काहीतरी करणं, हे ध्येय-ध्यास पदोपदी बाळगून नि:स्वार्थपणे काम करणाऱ्या भारती ठाकूर यांनी विवेकानंदांचे विचार आचरणात आणले. १९८० साली त्यांची आई गेल्यानंतर त्यांनी समाजकल्याणासाठी स्वत:ला झोकून दिले. त्यांनी स्वामी विवेकानंद, आद्य शंकराचार्य यांच्यावरचे साहित्य वाचले आणि त्यांच्या विचारात तल्लीन झाल्या. “माणूस म्हणून माझ्यात खरा बदल घडला, तो भगवद्गीता, तुकारामांच्या गाथा वाचून. त्यामुळे काहीतरी केले पाहिजे अशी मनात धडपड होती,” असं भारती सहज बोलून गेल्या.

 

नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये सरकारी नोकरी करत असतानाच त्यांनी त्यांच्या समाजकार्याला सुरुवात केली. “विवेकानंद केंद्राच्या वतीने माझं पाहिलं पोस्टिंग आसाममध्ये होते. तिथे गेल्यानंतर त्यांची भाषा मला समजत नव्हती व माझी भाषा त्यांना समजत नव्हती. अशा परिस्थितीत काम करावे लागले. पोटार्थी जगायचे यापेक्षा ‘समाजासाठी काहीतरी करू या’ ध्येयाने मी पछाडले होते. आसाममध्ये आंदोलन पेटले होते. ‘उल्फा आंदोलना’चा मोठ्या प्रमाणात प्रभाव होता. या आंदोलकांकडून मला धमकावण्याचे प्रकार झाले. मात्र, मी माझ्या कार्यापासून ढळले नाही. माझे काम चांगले आहे, हे जेव्हा आंदोलकांना समजले त्यावेळी त्यांनीच माझ्या कार्यात मदत केली. या प्रकल्पामधूनच माझ्या जीवन शिक्षणाची सुरुवात झाली, असे म्हणता येईल,” असं भारती आपल्या विलक्षण अनुभवाबद्दल सांगतात.

 

भारती यांनी २००९ साली नर्मदा परिक्रमा केली. अवघ्या पाच महिन्यांत त्यांनी ही परिक्रमा पूर्ण केली आणि त्यांना त्यांच्या कामाची दिशा उमगली. पाच महिन्यांच्या या परिक्रमेत त्यांनी बऱ्याच गोष्टी अनुभवल्या. त्यातूनच त्यांना नर्मदा घाटीतल्या परिस्थितीची जाणीव झाली. नर्मदेच्या घाटात त्यांनी अनेक मुलांना शिक्षणाविना झगडताना पाहिलं. अवघी पाच-सात वर्षांची ही मुलं घाटात फिरून फुलं विकायची, पैसे गोळा करायची, नारळ जमा करायची. हे सगळं वास्तव पाहून भारती यांना राहवलं नाही आणि त्यांनी आपली सरकारी नोकरी सोडली. त्यांनी स्वत:ला या कामात वाहून घेतलं, इतर सगळा मोह विसरुन त्या ‘शिक्षादूत’ झाल्या. नर्मदेच्या घाटात त्यांनी या मुलांसाठी शाळा सुरू केल्या. हातावर मोजता येतील अशी मुलं या शाळेत होती, आता या शाळेत जवळजवळ १७०० मुलं आहेत. “आपण लावलेल्या रोपट्याचे वृक्षात रुपांतर झालेले पाहताना आनंद होतो,” असं भारती हसत हसत म्हणाल्या.

 
२०१० साली भारती यांनी इतर समाजसेवकांना बरोबर घेऊन ‘निमाड अभ्युदय रुरल मॅनेजमेंट असोसिएशन’ची स्थापना केली. या संस्थेमार्फत त्यांनी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले. तब्बल १५ गावांमध्ये त्यांनी या शाळा सुरू केल्या. या शाळांना अत्याधुनिक करून त्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी त्यांच्या ‘नर्मदालय’ या संस्थेचे प्रयत्न सुरू आहे. या सर्व शाळा लोकवर्गणीतून सुरू करण्यात आल्या आहेत. आपल्या मुलांनी केवळ अभ्यासातच नाही, तर इतर गुणही अवगत करावे यासाठी त्या मुलांना संगीताची व वाद्यांचीही शिकवण देतात. आपली बोलीभाषाही न येणाऱ्या मुलांकडून त्यांनी संस्कृत श्लोक तसेच गीतेचं पठण करून घेतले. शाळेतून केवळ बुद्धीच नाही, तर सद्बुद्धी मुलांना मिळावी यासाठी त्या नेहमीच प्रयत्नशील असतात.
 
 
“मध्यप्रदेशच्या निमाड परिसरातील १५ शाळांमधील विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीताच्या तालावर पाठ्यपुस्तकातील धडे शिकवले जातात, त्यामुळे या शाळेला ‘गाण्यांची शाळा’ असे म्हटले जाते,” असं कौतुकानं भारती सांगतात. मागास भागातील ‘विद्यार्थी’ म्हणून नाही, तर ‘शिक्षित’ म्हणून ओळख निर्माण करा, असं त्या आपल्या विद्यार्थ्यांना आवर्जून सांगतात. केवळ मुलांना शिक्षण देण्याचं कामच नाही, तर त्या मागास महिलांना स्वबळावर उभं करण्यासाठी प्रोत्साहनही देतात. महिलांनी स्वावलंबी व्हावं, यासाठी त्यांनी या परिसरातील महिलांना लघुउद्योग करण्यास तयार केले. चादरी, गोधड्या, कपडे एवढचं नाहीतर मसाले, चटणी हे घरगुती उद्योगही सुरू करून दिले. आज त्यांच्यामुळे या परिसरातील शेकडो महिलांना रोजगार मिळाला आहे. त्यांच्या मुलांना शिक्षण मिळालं. असा ‘शिक्षादूत’ प्रत्येकात असावा, असंच त्यांना वाटत. दानधर्म कराचं, पण एका मुलाला एक कविता शिकवा, बघा खरा आनंद कशात आहे...
 
- प्रियांका गावडे 
@@AUTHORINFO_V1@@