एनआरसीमध्ये ज्यांचे नाव नाही ते घुसखोर : अमित शहा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2018
Total Views |


 
 
नवी दिल्ली : संसदेत एनआरसी म्हणजेच आसाम येथील "नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन" यावरुन गदारोळ झाला आहे. अमित शहा यांच्या वक्तव्यामुळे वातावरण आणखीनच पेटले. गदारोळामुळे आपले वक्तव्य पूर्ण न करु शकल्याने अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेऊन आपले मत व्यक्त केले आहे. एनआरसीमध्ये ज्यांची नावे नाहीत ते घुसखोर आहेत, असे वक्तव्य आज अमित शहा यांनी केले आहे. असा एकही भारतीय नाही ज्यांचे नाव एनआरसी मध्ये नाही. त्यामुळे या प्रश्नाला चुकीचे वळण देण्यात येत आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
 
 
एनआरसीविषयी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना जे जमलं नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करुन दाखवलं असं विधान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केलं, त्यावरुन संसदेत गदारोळ झाला. एकच खळबळ माजली आणि विरोधकांनी यावर मोठ्या प्रमाणात टीका केली.
 
 
"या भारतावर पहिला अधिकार भारतवासियांचा आहे. एनआरसीचा मुद्दा घेऊन देशातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. भारत सरकार देशातील जनतेला सुरक्षा देण्यासाठी तसेच देशाची सीमा सुरक्षित करण्यासाठी हे पाऊल उचलत आहे, त्यामुळे याविषयीला वेगळं वळण देऊन जनतेची दिसाभूल करण्यात येऊ नये." असे देखील ते पत्रकार परिषदेत म्हणाले.
 
यावेळी त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करत "राहुल गांधी यांना नेमकं काय हवयं ते त्यांना स्वत:ला स्पष्ट नाहीये. काँग्रेस आपली भूमिका नेहमीच बदलत असते. एनआरसीच्या विषयावर राहुल गांधी यांनी आपली आणि काँग्रेसची भूमिका स्पष्ट करावी, तसेच केवळ मतपेटीच्या राजकारणावर देश चालत नाही, देशाची सुरक्षा सर्वतोपरी असते." असा टोला देखील त्यांनी यावेळी राहुल गांधी यांना लगावला.
@@AUTHORINFO_V1@@