रेल्वे परिसर अतिक्रमण मुक्तीचे काय ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jul-2018
Total Views |

जळगाव स्थानकावर थांबणार्‍या गाड्या
७० अप साईड जाणार्‍या गाड्या, ७४ डाऊन साईड जाणार्‍या गाड्या
२७ सुरतकडे जाणार्‍या गाड्या

 
 

 
 
 
शहरातील रेल्वेस्थानक हे सध्या अतिक्रमणाचे बळी पडले असून घाणीच्या साम्राज्याने ग्रासलेले आहे. रेल्वेस्थानक परिसर लोटगाड्या, अनधिकृत खाद्यपदार्थांच्या गाड्यांनी व्यापलेले असून याचा त्रास प्रवाशांना होत आहे. या भागातून पादचार्‍यांना वाट काढताना तर बर्‍याच वेळा वादाला सामोरे जाण्याचेही प्रसंग घडलेले आहेत. दरम्यान, या परिसरात पोलीस चौकी असूनही पोलिसांचा तसेच महानगरपालिका प्रशासनाचा धाक संपला आहे की काय, असा प्रश्‍न आता प्रवाशांकडून उपस्थित होत आहे.
 
प्रत्येक शहराच्या रेल्वेस्थानकाला अनन्य साधारण महत्त्व असते. एखाद्या शहराला ओळखायचे असेल तर त्या शहरातील रेल्वेस्थानक हे कसे आहे, यावरून अंदाज बांधता येतो. जळगावातील रेल्वेस्थानकापासून बर्‍याच ठिकाणी जाण्यासाठी इतर राज्यातील आणि विदेशी पाहुणे येत असतात. दरम्यान, याठिकाणी उतरल्यावर प्रवाशांना अनधिकृत असणार्‍या लोटगाड्या आणि खाद्यपदार्थ विक्रीसाठी असणार्‍या लोकांशी सामना करावा लागतो. त्यांच्यापासून वाट चुकवून मग कुठे प्रवासी आपल्या मार्गाला मार्गस्थ होतात. हा प्रकार पाहुन बरेच प्रवासी हे डोक्याला हात मारून घेत असल्याची वस्तुस्थिती आहे. याठिकाणी काही झन्ना मन्ना (सट्टा) खेळणारेही असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होत आहे. रेल्वेस्थानकाच्या परिसरात पावसाळ्यात रस्त्यावर तुंबलेल्या पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने वाहनधारक व पादचारी यांच्यात किरकोळ हाणामारीच्या घटनाही घडल्या आहेत. महानगरपालिकेने यावर लवकरात लवकर उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
 
रेल्वे परिसरात मनपाकडून सुविधा नसल्याने वाहतुकीचा प्रश्‍न नेहमीच डोके वर काढत असल्याचे दिसून येते. कुठलीही गाडी आल्यास प्रवाशांना घेण्यासाठी आलेले त्यांचे वाहनधारक नातेवाईक त्याचप्रमाणे रिक्षावाले यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन प्रवाशांना मार्ग काढणे जिकरीचे ठरते. यासाठी मनपाकडून उपाययोजना असल्याची मागणी आहे. बिग बाजारसाठी महानगरपालिकेने तातडीने मागची भिंत पाडून त्यांना सुविधा दिली त्याचप्रमाणे एका लोकप्रतिनिधीला रेल्वेस्थानक परिसरात गर्दीचा झालेला त्रास पाहून सोय उपलब्ध करून दिली. अगदी त्याचप्रमाणे सामान्य प्रवाशांना सोय का उपलब्ध होत नाही? असा सवालही आता प्रवासी करत आहे. कुठलीही रेल्वे आल्यानंतर प्रवाशांना वाट काढताना कोंडी होते, यावर आजपर्यंत पालिकेने कुठली उपाययोजना केलेली नाही. मग पालिकेने व सत्ताधार्‍यांनी नेमकं काय केल? पालिकेने आतापर्यंत रेल्वेस्थानक परिसरातील अतिक्रमण काढून रस्त्याचे रुंदीकरण का नाही केले, असे म्हणून प्रवासी आता तीव्र संताप व्यक्त करताना दिसून येत आहेत.
 
गर्दुल्यांचा त्रास संपता संपेना...
 
रेल्वेस्थानक परिसरात कोनाकोपर्‍यात बरेच गर्दुल्ले हे नशा करताना आढळून येतात. आपल्या गरजा भागवण्यासाठी ते भीक मागतात, नाहीतर चोरी करतात. यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला बळी पडावे लागते. महिला प्रवाशांना या गर्दुल्यांची भीती असल्याने त्याचप्रमाणे कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी महानगरपालिकेने यावर कायमस्वरुपी तोडगा काढायला पाहिजे. रेल्वे परिसरात किरकोळ चोर्‍या होण्याचेही प्रकार वाढले असून प्रवासी या जाचाला कंटाळेल असल्याची स्थिती आहे. रेल्वे परिसरात जाणे म्हणजे नर्कात जाणे असा काही प्रवाशांचा समज झाल्याचे दिसून येत आहे. गर्दुल्ले हे परिसरात बसून नशा करतात याचा त्रास वृद्ध, महिला आणि बालकांना होत असल्याने यावर मनपाने मार्ग काढावा आणि हा परिसर मोकळा करावा.
 
रात्री बेकायदेशीर गुटख्याची सर्रास विक्री
 
रात्रीच्या वेळी रेल्वेस्थानक परिसरात सर्रास बंदी असलेल्या गुटखा, बिडी, सिगारेट विक्रीची टेबलं मांडलेली दिसून येत असल्याने रात्री परिसर अतिक्रमित होतो. या वेळी जादा दराने सिगारेट, बेकायदेशीर गुटखा यांची विक्री होत असल्याने काही जणांचे वादही होतात, व शिवीगाळही देण्यात येते. या परिसरात टवाळक्या करणारी काही मंडळी सिगारेटचा धुवा हिरोपंती बनून हवेत सोडतात, याचा त्रास प्रवाशांना होतो. तर बरीच मंडळी ही गुटखा खाऊन त्याच ठिकाणी थुंकतात, यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. रात्रीची गस्त घालण्यासाठी पोलिसांची गाडी येते, तेव्हा काही काळ हा प्रकार बंद असतो. पण पोलिसांची गाडी गेल्यावर पुन्हा हे टेबल रस्त्यावर येऊन रेल्वे परिसर अतिक्रमित होतो.
 
जळगाव शहरात होणार्‍या निवडणुकीत जो ही पक्ष निवडून येणार त्याने याप्रसंगी लवकरात लवकर कारवाई करून रेल्वेस्थानकाचे अतिक्रमण काढावे, अशी मागणी तरूण भारतने केलेल्या सर्वेक्षणात समोर आली. रेल्वे परिसर स्वच्छ करून प्रवासी व आजूबाजूच्या परिसरात राहणार्‍या नागरिकांना दिलासा द्यावा, असा सूर निघत आहे.
 
 
 
 
 
प्रतिक्रिया १
 
महापालिकेचे नक्कीच लागेबांधे
 
 
महापालिका जर रेल्वेस्थानकातील अतिक्रमण काढत नसेल तर मनपाचे ठेले आणि दुकानदारांशी नक्कीच लागेबांधे असतील. कारण त्यांना प्रवाशांना होणारा त्रास अजूनही कळत नाहीये. येणार्‍या- जाणार्‍या प्रवाशांसाठी महापालिकेने दोन वेगवेगळे रस्ते तयार करायला हवे. रिक्षाचालक आणि नातेवाईकांच्या वाहनांना पोलीस चौकीच्या बाहेरच थांबायला सांगून समोरची जागा मोकळी करायला पाहिजे. गुंडगिरी करणार्‍या काही मुजोर व रिकामटेकड्या लोकांना रेल्वेस्थानक परिसरातून हद्दपार करून चांगले वातावरण निर्माण झाले पाहिजे. काही पोलिसांची कायमस्वरूपी याठिकाणी नियुक्ती करायला हवी, जेणेकरून प्रवाशांना काहीही अडचण आल्यास ते आपल्या शंकांचे निरसन करू शकतील. 
किरण कढरे, प्रवासी
 
प्रतिक्रिया २
 
रस्त्याचे रुंदीकरण करून दुर्गंधी दूर करावी
 
 
पावसाळ्यात रात्री अवैध खाद्यपदार्थ विक्री करणारी मंडळी काही शिळे अन्न खाली सांडून निघून जातात. त्याची दुर्गंधी सगळ्या परिसरात येऊन नाकाला रूमाल लावावा लागतो. पावसाळ्यात या भागातून तर चालताही येत नाही. पावसाळ्याचे पाणी रस्त्यावर साचून व शिळे अन्न त्यात मिसळून दुर्गंधी हाहाकार माजवत असल्याची स्थिती आहे. रोज अप-डाऊन करताना या प्रसंगाचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. वाहतुकील शिस्त न लावता पादचार्‍यांवर पावसाचे तसेच घाण उडते. कोणाला काही बोलल्यास अर्वाच्य भाषा वापरली जाते. यावर महापालिकेले उपाययोजना करावी, अन्यथा सर्व अप- डाऊन करणारे विद्यार्थी मोर्चा काढू.
उमेश गोरधे, प्रवासी विद्यार्थी
 
@@AUTHORINFO_V1@@