मनपाकडून रिक्षाचालकांना पत्री शेड मिळेना!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jul-2018
Total Views |

जळगाव शहरात ८,००० परवानाधारक रिक्षाचालक
२,००० विनापरवानाधारक रिक्षाचालक

 

 
 
शहरातील रिक्षाचालकांना थांब्यांची गरज असतानाही त्यांना नानाविध ठिकाणी प्रवाशांची वाट बघावी लागते. त्याचप्रमाणे त्या थांब्याच्या ठिकाणी शेडची गरज असताना ते मिळत नसल्याने भरपावसात व उन्हात रिक्षाचालकांना उभे राहावे लागत असल्याने मनपाविरुद्ध रिक्षाचालकांच्या मनात तीव्र रोष निर्माण होत आहे.
 
रिक्षाचालकांना हक्काचे आणि व्यवसायाचे ठिकाण म्हणजे रिक्षा थांबा होय. परंतु, बोटावर मोजण्याइतके थांबे असल्याने त्याचप्रमाणे त्या थांब्यात कुठलीही पत्री शेडची व्यवस्था नसल्याने त्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. जळगाव शहरात रामानंदनगर, गोविंदा रिक्षा स्टॉप, टॉवर चौक, खोटेनगर, रेल्वेस्थानक अशा काही बोटावर मोजण्याइतके थांबे असले तरी त्याठिकाणी कुठल्याही प्रकारचे पत्री शेड नसल्याने त्यांना उन्हात व पावसात आपला व्यवसाय करावा लागत आहे. यासाठी काही युनियन कार्यरत असून त्यांनी वेळोवेळी महापालिकेत आपल्या मागण्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु, आजही मनपाने त्यांची मागणी पूर्ण केली नसल्याची वस्तुस्थिती आहे.
 
रिक्षाचालक युनियनने शहरात एकूण ४०० थांब्यांची मागणी महापालिकेला केली होती. त्यापैकी केवळ २० ते २५ ठिकाणी फलक लावून त्यांनी वेळ मारून नेल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, आधीच अरुंद असलेल्या शहरातील रस्त्यांवर १० हजार रिक्षा असून इतर रहदारीही कमी नाही. त्याचप्रमाणे थांबे नसल्याने शहरात वाहतुकीची कोंडी होऊन प्रवाशांनाही त्रासाला सामोरे जावे लागते. दरम्यान, एखाद प्रवासी जर भररस्त्यात उभा असला आणि त्याला रिक्षात बसवले तर रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात येते. पण, थांबेच नसल्याने रिक्षाचालकही यात काय करतील, असा सवाल करण्यात येत आहे. त्यामुळे मागणी केलेले पत्री शेड असलेले ४०० थांबे विविध कॉलन्यांमध्ये मिळावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. रिक्षाचालक आज जळगाव शहरात महत्त्वाचा घटक असून अनेक प्रवाशांना हे वाहन सोयीचे आहे. शहरात कुठेही जायचे म्हटल्यास रिक्षा हा एकमेव पर्याय जळगावकरांना असून त्यांच्या सुविधेबद्दल मनपा अनभिज्ञ का, असा सवाल आता रिक्षाचालकांकडून होत आहे. मनपाने इतक्या महत्त्वाच्या असलेल्या घटकाला त्यांच्या हक्काच्या सुविधांपासून वंचित ठेवल्याने रिक्षाचालकांच्या मनात मनपाविरुद्ध नाराजी कायम असल्याचा सूर आता निघत आहे. मनपाकडून त्यांना कुठल्याच सुविधा मिळत नसून त्यांच्या परिवारासाठीही मनपा काहीही करत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.
 
शहरात पार्किंग झोन नाही
 
शहरात कुठलेही पार्किंग झोन नसल्याने वाहतुकीची कोंडी होणे साहजिक आहे. यासाठी महापालिकेने पुढाकार घेऊन शहरात पार्किंग झोनची व्यवस्था करणे गरजेचे आहे. केवळ रिक्षाचालकांना दोष देऊन त्यांना वाहतूक आणि परिवहन विभागाकडून दंड करून काहीही फायदा नाही. ही सगळी बेकायदेशीर कारवाई होत असल्याचा आरोप रिक्षाचालकांकडून होत आहे. दरम्यान, अनेक थांब्यांवर रिक्षाचालकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येते, पण त्यांनीही जळगाव शहरातील रस्त्यांची परिस्थिती बघून मवाळ धोरण बाळगावे. बरेच नागरिक आपले वाहन नको त्याठिकाणी लावून निघून जातात, त्याचाही रिक्षाचालकांना आणि प्रवाशांना त्रास होतो. त्यामुळे वाहतूक शाखेने याचाही विचार करून दिलासा द्यावा.
 
मनपाकडून ९५ पैकी केवळ २५ थांबे
 
महानगरपालिकेकडून वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी रिक्षाचालकांसाठी ९५ थांब्यांचे आश्‍वासन देण्यात आले होते. परंतु, महापालिकेने केवळे २० ते २५ थांबे देऊन आश्‍वासनावर पाणी फिरवल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, दिलेल्या थांब्यांमध्ये कुठल्याही थांब्याला शेड नसल्याने याचा त्रास प्रवासी आणि रिक्षाचालकांना होत आहे. रिक्षाचालकांना सोयी-सुविधा देण्यासाठी मनापाची काहीच जबाबदारी नाही का, मनपाने जर थांबेच दिले नाही तर मग आमच्यावर कारवाई का करण्यात येते, असा सवाल आता रिक्षाचालकांकडून होत आहे.
पाल्यांसाठी हवे चांगले शिक्षण
 
रिक्षाचालकांशी तरूण भारतने बातचित केली असता, आमचा रोजगार हातावर असल्याने कधी पैसे मिळतात तर कधी रिकाम्या हाती परतावे लागते. त्यामुळे आमच्या पाल्यांना आम्ही चांगले शिक्षण देऊ शकत नाही. चांगल्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी आमच्याकडे डोनेशन नसल्याने आमचे पाल्य हे चांगल्या शिक्षणापासून वंचित राहतात. माणुसकीच्या दृष्टिकोनातून मनपाने आमच्या पाल्यांसाठी उपाययोजना करून त्यांच्या चांगल्या शिक्षणासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.
 
 
 
 
प्रतिक्रीया १
 
लोकप्रतिनिधींनी अरुंद रस्त्यांचा प्रश्‍न सोडवावा
 
मनपाने रिक्षाचालकांच्या मागण्यांना प्राधान्याने सोडवायला हवे. रिक्षा थांब्याबरोबर त्यांनी रस्त्यांच्या रुंदीकरणाला प्राधान्य देऊन वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सोडवायला हवा. शहरात एकूण १० हजार रिक्षाधारक असून ८ हजार हे परवानाधारक असून २ हजार हे विनापरवानाधारक आहेत. निवडून येणार्‍या पक्षाने पुढाकार घेऊन रिक्षाचालकांचे प्रश्‍न आपले समजून त्यावर योग्य तो मार्ग काढल्यास शहरात अपघातांचे प्रमाण कमी होऊन वाहतुकीला शिस्त लागेल.
- दिलीप सपकाळे , वीर सावरकर रिक्षा युनियन, जळगाव
 
प्रतिक्रीया २ : मनपाने पिवळे पट्टे आखावे
 
महानगरपालिकेने रस्त्यावर पिवळे पट्टे आखल्यास रिक्षा थांबवताना कोणालाही त्रास होणार नाही. थांब्यांचा प्रश्‍न मार्गी लावून रिक्षाचालकांना दिलासा द्यावा. रेल्वे परिसरात खासगी वाहतुकीवर नियंत्रण आणल्यास बाहेर लागणार्‍या रिक्षांना आपल्या थांब्यावर थांबता येईल. विनाकारण होणार्‍या कारवाईने आता रिक्षाचालक वैतागले असून निवडून येणार्‍या लोकप्रतिनिधींनी यावर मनपात जाऊन तोडगा काढावा, अशी मागणी आहे.
- दिनेश माळी, रिक्षाचालक, जळगाव
 
@@AUTHORINFO_V1@@