जळगावनगरीची वाटचाल अस्वच्छतेकडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jul-2018
Total Views |

२५ महानगर पालिकेच्या शाळा
०६ पालिका रुग्णालये



 
 
शहरात अस्वच्छतेमुळे पुरता बोजवारा उडाला असून प्रत्येक प्रभाग, मार्केट, शाळा परिसर, हॉस्पिटल परिसर, कॉलेज परिसर, सामान्य रुग्णालय आदी ठिकाणे ही स्वच्छतेसाठी महापालिकेला गळ घालताना दिसून येत आहे. केंद्र सरकारने स्वच्छ भारत मिशनचा मंत्र दिला असतानादेखील याकडे महापालिका दुर्लक्ष करत असून एकप्रकारे केंद्र सरकारच्या नियमांचे मनपा उल्लंघन करताना दिसत आहे. शहरात सगळीकडे खुल्या भूखंडांचे डंपिंग ग्राउंड झाल्याने आजूबाजूला राहणार्‍या नागरिकांना यातून दिलासा देण्यासाठी महानगरपालिकेने लवकरात लवकर उपाययोजना करून रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
 
 
शहरात कुठल्याही प्रकारची महापालिकेने स्वच्छता केलेली दिसून येत नसल्याने नागरिक त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. शहरात महापालिकेचे ९ मार्केट असून या मार्केटमध्ये स्वच्छतेच्या नावाने बोंबाबोंब आहे. गेल्यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी गोलाणी मार्केटमध्ये कोणत्याही दुकानासमोर घाण दिसल्यास त्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पण, आता त्या कारवाईचा सगळ्यांनाच विसर पडल्याचे दिसत आहे. गोलाणी मार्केट परिसर हा शहरातील मुख्य परिसर असून हे मोबाईल मार्केट झाल्याचे निदर्शनास येत आहे. परंतु, याठिकाणीचे स्वच्छतागृहसुद्धा सफाईविनाच आहेत. कोणत्याही मार्केटमधील स्वच्छतागृहात जाताना नागरिकांना दहा वेळा विचार करावा लागत असल्याची स्थिती आहे. दरम्यान, अंधार पडल्यावर याठिकाणी प्रकाशयोजनेची आवश्यकता असतानाही ते लागत नसल्याने कुचंबणा होत आहे. आज जळगाव शहराची लोकसंख्या पाहता स्वच्छतेसाठी महापालिकेने योग्य नियोजन करणे काळाची गरज बनलेली असताना, महापालिका या गोष्टींकडे सोईस्कररीत्या दुर्लक्ष करत आहे. खुल्या भूखंडांची परिस्थिती याहून वेगळी नाही. रहिवासी घरात असणारा कचरा, घाण ही खुल्या भूखंडांवर टाकून देतात. त्यामुळे कचरा कुजून त्यातून दुर्गंधी पसरते. मात्र, याकडेही दुर्लक्ष करून महापालिका कोणतीही हालचाल करत नाही.
 
 
जळगाव शहराची ओळख ही सुवर्णनगरी असताना त्याचप्रमाणे सगळ्यात मोठी महापालिका आपल्याच शहरात असताना याचा काहीएक फायदा जळगाववासीयांसाठी होत नाही. जळगाव शहरात एकूण ९ मार्केट असून या सगळ्यांची स्वच्छतेच्या बाबतीत परिस्थिती सारखीच आहे. गोलाणी, फुले, बीजे, बीजे नवीन, शाहू, गांधी, मीनाताई ठाकरे, भास्कर मार्केट या सगळ्याच ठिकाणी अस्वच्छतेमुळे गाळेधारक व्यापारी आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आधीच पावसाळ्याचे दिवस असल्याने आणि अस्वच्छतेमुळे रोगराई पसरण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याने महापालिकेने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. महापालिकाअंतर्गत येणार्‍या शाळेच्या ठिकाणी गाजर गवत वाढले असून डासांच्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे समजते. शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांची रेलचेल असून या डासांच्या दंशाने अनेक विद्यार्थी आजारी पडून त्यांची प्रकृती खराब होण्याचीही शक्यता आहे. सामान्य रुग्णालयाच्या परिसरातही घाणीचे साम्राज्य पसरले असून त्याचीही स्वच्छता होत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचा याबाबत संताप होताना दिसत आहे. महापालिकेच्या अंतर्गत येणार्‍या या सगळ्यांच्या परिसरात स्वच्छता करून लवकरात लवकर नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
 
 
शाहू महाराज दवाखान्याच्या बाजूला डबके...
 
शाहुनगरातील छत्रपती शाहू महाराज दवाखान्याच्या परिसरात पावसाच्या पाण्याने डबके साचले असून त्याठिकाणी कुबट वास येत असल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले. दरम्यान, डासांच्या प्रमाणात वाढ होत असल्याने अनेक रोगराई पसरण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, याठिकाणी स्वच्छतेसाठी फवारणीही होत नसल्याने हा रुग्णांच्या जीवाशी खेळ नाही का? असा संतप्त सवाल रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. दवाखान्याच्या बाजूलाच शाहू मार्केट असून याठिकाणीही पावसाच्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरली असून गटारीही तुंबल्या आहेत. महानगरपालिकेने आता तरी नागरिकांच्या जीवाचा अंत पाहू नये, अशा तीव्र भावना नातेवाईकांनी व्यक्त केल्या आहेत.
 
खुले भूखंड बनेल डंपिंग ग्राउंड...
 
महानगरपालिकेचे शहरात जे ही खुले भूखंड आहेत, ते डंपिंग ग्राउंड बनण्याच्या परिस्थितीत आहे. रहिवाशांचा रोजचा कचरा ते घंटागाड्या वेळेवर न आल्याने खुल्या भूखंडावर टाकतात. परिणामी, हाच कचरा कुजून यातून कुबट वास येऊन रोगराई पसरते. यात डासांचे प्रमाण वाढून डेंग्यू, मलेरियासारखे आजार बळावण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे परिसरात कचराकुंड्या तुडुंब भरल्या जाऊन त्यातील कचरा हा भटके कुत्रे किंवा मोकाट जनावरे रस्त्यावर आणून सोडतात. याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे वेळोवेळी घंटागाड्यांतर्फे कचरा संकलन करून तसेच परिसरातील कचराकुंड्यांची वेळोवेळी पाहणी करून त्या स्वच्छ करण्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.
 
महापालिकेने आजपर्यंत केवळ साफसफाईच्या नावाखाली कागदी घोडे नाचवून वेळ मारून नेण्याचे काम केले आहे. आज अनेक भूखंड, मार्केट व रहिवाशांचे परिसर स्वच्छ करण्यात आलेले नसून यावर महापालिकेने विचार करून हे परिसर स्वच्छ करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आता करण्यात येत आहे.
 
 
 
 
 
प्रतिक्रिया १
 
महापालिका केवळ नावालाच...
 
 
शहरातील महापालिका ही केवळ नावालाच असून त्यांना नागरिकांशी काही देेणेघेणे नाही. आज रस्त्याने चालत असताना ठिकठिकाणी कचर्‍याचे ठिगारे दिसून येतात. मात्र, महापालिकेला दिसत नाही. मग यात दोष कोणाचा, हे आम्हा नागरिकांना समजले आहे. आज देशात ज्याप्रमाणे सर्वात घाणीचे शहर म्हणून भुसावळची ओळख झाली होती अगदी त्याचप्रमाणे जळगाव शहराचा नंबर लागणार असल्याचे दिसत आहे. महापालिकेने नागरिकांकडून कर वसूल करण्यापेक्षा सुविधा दिल्या तर नागरिक क्षणाचाही विलंब न करता महापालिकेचाही विचार करतील. दरम्यान, सफाई कर्मचार्‍यांनीही आपले काम चोख पार पाडावे, जेणेकरून आपलेच शहर हे स्वच्छतेच्या बाबतीत सुवर्ण दिसेल.
- हनुमान सुरवसे, नागरिक
 
प्रतिक्रिया २
 
महापालिकेचा भेदभाव
शहरातील गोपाळपुर्‍यात स्वच्छतागृहात भयंकर घाण असून १० दिवस झाल्यानंतरही त्याकडे महापालिका स्वच्छतागृहाच्या टाकीत पाणी भरत नाही की, स्वच्छताही करत नाही. त्यामुळे नागरिक वैतागले असून महापालिकेने यासाठी पुढाकार घ्यावा. त्याचप्रमाणे प्रतिष्ठित असलेल्या लोकांचा परिसर महापालिका स्वच्छ ठेवण्यास धन्यता मानते. पण, जुने जळगाव, कांचननगर, जैनाबाद या भागात स्वच्छताच करत नाही. काही ठिकाणी तर महिन्यातून एक वेळा महापालिकेचे कर्मचारी येऊन गटारीची घाण काढून गटारीच्याच बाजूला पुन्हा परिसर रोगराई करण्यास कारणीभूत ठरतात. तरी महापालिकेने हा भेदभाव नष्ट करून आम्हीही या जळगावचे रहिवासी असून आम्हाला जगण्याचा अधिकार आहे, असे समजून पावले उचलावी.
- आकाश बाविस्कर, नागरिक
 
@@AUTHORINFO_V1@@