काम न केल्यास वर्षभरात राजीनामा घ्यावा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jul-2018
Total Views |

अॅड. भरत बी. देशमुख यांची रोखठोक भूमिका

 

 
 
मतदारांनी जातपात आणि पैसा अन्य प्रलोभनांना बळी न पडता काम करणार्‍या उमेदवाराला मतदान करावे, आणि निवडून आल्यावर त्याने जर त्याच्या जाहीरनामा किंवा आश्‍वासनानुसार वर्षभरात काहीही कार्यवाही केली नाही, तर त्याने स्वत:हून नगरसेवकपदाचा राजीनामा द्यावा, अशी अपेक्षा ज्येष्ठ कायदेपंडित आणि महाराष्ट्र -गोवा राज्य वकील संघटनेचे माजी अध्यक्ष अॅड. भरत बी. देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
 
मनपा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ‘तरुण भारत’ने साधलेल्या सुसंवादात ते म्हणाले की, निवडणुकीआधी गोड गोड बोलणार्‍या, वारंवार हात जोडत पाया पडणारे निवडून आल्यावर आपले मतदार आणि प्रभागाकडे फिरकूनही पाहत नाहीत, अशी सर्वांच्या तक्रारी आहे, तेव्हा अशा अकार्यक्षम लोकप्रतिनिधींना काही निकषांच्या आधारे अपात्र ठरवण्यात यावे आणि मतदानात दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या उमेदवाराला त्याजागी नियुक्त केले जावे, अशा पद्धतीने लोकप्रतिनिधीत्त्व कायद्यात दुरुस्ती केली जावी, तरच भविष्यात बेपर्वा, चमको लोकप्रतिनिधींना चाप बसेल, असे माझे ठाम मत आहे.
 
 
 
 
सर्वांना सुख, समाधानाने जगता यावे, यासाठी शुद्ध व पुरेसे पाणी, खड्डेमुक्त रस्ते, फक्त रात्रीच सुरू असणारे पथदिवे या किमान सुविधांची अपेक्षा आहे. जीवघेणे, आजारांना आमंत्रण देणारे सध्याचे आणि पावसामुळे रोज रुंदावणारे खड्डे, बेहिशोबी गतिरोधक हे मनपाच्या, शासनाच्या पैशांची कशी लूट होते?..., याचे संतापजनक उदाहरण आहे. तुंबलेल्या गटारी व साचणारा कचरा, त्यामुळे वाढणारी डासांची उत्पत्ती, प्रदूषण, जंतूसंसर्ग यामुळे चिकुनगुनिया, स्वाईन फ्लू, डेंग्यूचा फैलाव होण्याची शक्यता आहे. उमेदवारांनी फक्त प्रचाराकडे लक्ष न देता फवारणी, धुरळणी मनपा यंत्रणेकडून वा स्वत: करून घ्यावी, असे केल्यास नगरसेवकांना आपल्या कामाची जाण होऊन व पद जाण्याची भीती वाटून ते प्रभागात काम करायला सुरुवात करतील, अशी आपली अपेक्षा असल्याचे अॅड. भरत बी. देशमुख यांनी स्पष्ट केले.
 
@@AUTHORINFO_V1@@