मनपा गाळ्यांचा वाद सामंजस्याने, तातडीने सुटावा - उद्योगपती रजनीकांत कोठारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jul-2018
Total Views |
 
 


सत्तेवर वा निवडून कुणीही येवो, पण चांगले, खड्डेमुक्त रस्ते आणि शुद्ध पाणी, न तुंबणार्‍या गटारी, संपूर्ण स्वच्छता या सर्व थरातील जनतेच्या आवश्यक प्राथमिक गरजा प्राधान्याने पूर्ण व्हाव्यात तसेच जळगावातील सध्या चिंतेचा विषय गाळे प्रश्‍न सुटावा, अशी अपेक्षा प्रसिद्ध उद्योगपती आणि सामाजिक कार्यकर्ते, के. के. कॅन्स या विख्यात उद्योगाचे सर्वेसर्वा रजनीकांत कोठारी यांनी व्यक्त केली आहे.
 
मनपा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तरुण भारतने साधलेल्या सुसंवादात त्यांनी अतिशय तळमळीने या समस्यांचा उहापोह केला. रजनीकांत कोठारी हे माजी नगराध्यक्ष व माजी मंत्री, माजी आमदार सुरेशदादा जैन यांचे बालपणापासूनचे जीवलग मित्र आहेत. जळगावातील गुजराती मित्रमंडळ आदी अनेक सामाजिक, सांस्कृतिक संस्थांच्या जडणघडणीत ते प्रारंभापासून अग्रेसर पदाधिकारी, कार्यकर्ते, मदतकर्ते राहिलेले आहेत. चिंचोली ता.जळगाव येथे जलसंधारणकामी गतवर्षी उन्हाळ्यापूर्वी लोकसहभागातून झालेल्या नदी-नाला खोलीकरण, रुंदीकरणातही त्यांनी गावकर्‍यांच्या हाकेला ओ देत उदार हस्ते सहकार्य करीत मोठे योगदान दिले आहे.
 
 
 
 
 
कोठारी म्हणाले की, मनपाच्या ९ दुकान संकुलातील सुमारे २ हजारांवर गाळ्यांच्या कराराचा व थकबाकीचा प्रश्‍न सन्मानाने लवकरच निकाली निघावा, त्यात गाळेधारक व मनपा दोघांचेही हित बघितले जावे, आणि हा वाद सुटत राज्यभर, देशभर चांगला संदेश जावा, अशी अपेक्षा आहे. जळगावातील आणखी महत्त्वाचा विषय आहे, औद्योगिक वसाहतीतील लहान मोठे उद्योग सुस्थितीत चालले, वाढले पाहिजेत. त्यासाठी लागणार्‍या मूलभूत, प्राथमिक सुविधांची उपलब्धता मनपा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वय आणि सन्मानपूर्वक करुन दिली पाहिजे. गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात विविध करांचा बोजा हे उद्योजक सोसत आहेत. त्यांना अनेक अडचणींना, समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत. नपा, आता मनपा आणि न्यायालय पातळीवर दाद मागूनही अडचणी कायम आहेत. या उद्योगांकडून मोठे उत्पन्न मिळते, याची तरी जाण ठेवत या सुविधा भविष्यात गांभीर्यपूर्वक विचार करुन मनपा देईल, अशी अपेक्षा आहे, अशीही उद्योजकांची प्रातिनिधीक भावना रजनीकांत कोठारी यांनी या सुसंवादात व्यक्त केली.
 
@@AUTHORINFO_V1@@