अत्रे साहेब...आपण चुकलात!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jul-2018
Total Views |
 

काय अत्रे साहेब? चुकलात आपण. भारतातील जनतेस जातीभेद पाळू नका, असे आवाहन करता आपण. कसं शक्य आहे? कुत्र्यास ईमानदारी, कोल्ह्यास धूर्तपणा, वाघास मदमस्तपणा, डॉल्फीनला जिव्हाळा आणि भारतीयांना जातीचा अभिमान सोडायला सांगणे मुर्खपणाचे आहे. हे कळू नये आपणांस? त्यातल्या त्यात निवडणुका समोर असताना असा उपदेश देणे म्हणजे आपणास भारतीयांबद्दलचे अजिबातच ज्ञान नाही असे दिसते. जातीभिमान पाळू नये म्हणजे काय? जाती कोणाला सुटल्यात सांगा बरे? वृक्षांना जाती, प्राण्यांना जाती, पक्ष्यांना जाती एवढेच काय तर दगडांच्याही जाती आहेतच. आता त्या जाती निर्माण करण्यासाठी काही मनुस्मृती नव्हती, तो भाग वेगळा. या जाती उच्चविभूषित विद्वान शास्त्रज्ञांनी पाडल्या आहेत. पण त्यांच्यात जातीवरुन काही आपापसात भांडणं होत नाही म्हणून बरं आहे. नाही तर त्या विद्वानांचेही पुतळे फुकले असते आणि त्यांचे ग्रंथही जाळले असते. असो. तर सांगा, जाती आहेच की नाही सगळ्यांना. मग माणसाने काय पाप केलंय? पाळल्या जातीप्रथा आणि ठेवला जातीभिमान तर बिघडतंय कुठे? सर्व प्राणीमात्रात बुद्धिमान प्राणी कोण? तर माणूसच ना. मग आपल्या जातीचा अभिमान असायला हरकत काय? तुम्ही चुकलात साहेब...तुम्ही चुकलात.
 
अहो अत्रेसाहेब भारतात सत्ता मिळवायची असेल ना, तर देशाचा विकास, संरक्षण सिद्धता, लष्कर सामग्री, रोजगार, आरोग्य यासारख्या गोष्टींचा कितपत विकास होतोय, याचा विचार नसतो करायचा. पाहायचं असतं ते जातीचं गणित. एखाद्या प्रदेशात ज्या जातीचे लोक जास्त, त्या जातीचाच उमेदवार राहिला पाहिजे. दुसर्‍या कुठल्या जातीची कितीही कर्तृत्वसंपन्न व्यक्ती असली व तिच्या अंगी कितीही चांगले नेतृत्वगुण असले तरी तिचे मूल्य शून्य ठरते. कारण काय तर जात. आणि जनतेने जरी विवेकबुद्धीने त्यास निवडून दिले तरी विरोधक व काही जातीयवादी बांडगुळं त्यास देशसेवा, समाजसेवा करु द्यायचे नाहीत. मग साक्षात देवाधिदेव देवेंद्र का असेना, त्यास या त्रासाला सामोरे जावेच लागते. त्याचा दोष एकच. अल्पसंख्याक असलेल्या जातीत जन्माला येणे! तेव्हा हे जातीपातीचे राजकारण म्हणजे आम्हा भारतीयांच्या पुरोगामी वैचारिकतेचे व समाजकारणाचे सुंदर आभूषण आहे, आणि तुम्ही तेच सोडायला सांगता. जनतेला एकवेळ अन्न, वस्त्र, निवारा मिळाले नाही तरी चालेल, शिक्षण व रोजगार नाही मिळाला तरी चालेल, नेत्यांनी कितीही भ्रष्टाचार करून जनतेची पिळवणूक केली तरी चालेल, निवडणुकीत कितीही गुन्हेगार प्रवृत्तीचा उमेदवार असला तरी चालेल, पण जातीवालाच आहे ना मग तो निवडून आलाच पाहिजे. आणि जो पार्ट्या व पैसा देईल त्याचाच जय झाला पाहिजे. कारण माणसाच्या प्रामाणिकपणाची बरोबरी करेलच कोण? ज्याचं मीठ खाल्लं त्याचे उपकार कसे विसरता येईल बरे. मग पार्टी देणार्‍याचे ऋण मत देऊन फेडायला नको? इथेच तर तुम्ही चुकलात साहेब. तुमच्याकडे ती उच्च विचारसरणी नाही. तुम्ही सांगता की, जनतेने कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. जातीचा विचार करण्यापेक्षा स्वच्छ चारित्र्यसंपन्न व्यक्तीस मतदान करावे. सर्वधर्मांचा आदर करणार्‍या व्यक्तीस निवडून द्यावे. अहो पण कसं शक्य आहे हे? पैसे घेतल्याशिवाय काय मतदान होत असते? तुम्ही कधी मतदानच केले नाही वाटतं. किंवा तुमच्यासारख्या उच्च विभूषित व्यक्तीकडे पैसे घेऊन यायला कुणी धजावले नसेल. अहो पण झोपडपट्टीत राहणारी अडाणी माणसं म्हणजे व्होट बँक असते.
 
हाताला काम नसलेली तरुण मंडळी कुठं तरी कट्ट्यावर सट्टा खेळत असतात तर कुठं तरी पत्त्यात मग्न असतात. आपल्या वॉर्डातील भाऊ-दादांनी थोडी जरी स्तुती केली की ही तरुण मंडळी जीव द्यायला अन् जीव घ्यायला मागे पुढे पाहत नाही. भाऊ दादा पैसा पुरवतात म्हणूनच तर दारु, हुक्का, गांजासारखी एकसे बढकर एक नशीली पदार्थ आजमवायला मिळतात. आयुष्य भलेही त्यांचे बरबाद होत असेल, पण जे क्षणिक सुख मिळते त्याचे काय? जशी खाल्या मिठाला जागणारी माणसं आहेत तशी खाल्ल्या दारू-मटणालाही जागणारी माणसं आहेत जगात. मग उपकाराची प्रामाणिकपणे परतफेड तर होणारच. अहो अत्रे जिथे शाहू, फुले, आंबेडकर काही करु शकले नाही, तिथे तुमच्या तोकड्या दोन शब्दांचा काय निभाव लागणार हो? आपापल्या जातीची श्रेष्ठता कशी हे समजावून सांगायचं सोडून तुम्ही समता, बंधूतासारख्या खुळचट गोष्टीचे कसले उपदेश देता आहात?
 
निवडणुका येतील व जातील पण जात्यभिमान कधीही जाणार नाही हेच खरे आहे. पण जळगावचे लोक जातीपेक्षा मातीला जास्त मानतात असे ऐकून आहोत. खरे खोटे काय ते लवकरच स्पष्ट होईलच. पण तुम्ही चुकलात हे नक्की.
 
 
 
 
- कल्पेश गजानन जोशी
 
@@AUTHORINFO_V1@@