झिम्बाब्वेत रात्रीस खेळ चाले...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jul-2018   
Total Views |


 

 
 

३७ वर्ष देशाची सत्ता उपभोगलेले मुगाबे यांना गेल्यावर्षी पक्षांतर्गत बंडाळी आणि लष्कराच्या उठावामुळे सत्तेतून पायउतार व्हावं लागलं होतं. देश स्वतंत्र झाल्यापासून मुगाबे व झिम्बाब्वे हे एक समीकरण तयार झालं होतं. त्यामुळेच सध्याच्या निवडणुकीत त्यांचा प्रत्यक्ष सहभाग नसला तरी त्यांना बेदखल करतादेखील येणार नाही.

 

काळा-गोरा वर्णभेद, गुलामी, गरिबी, रोगराई, हुकूमशाही, अशिक्षित अशा नाना विविध कारणांमुळे आफ्रिका देश नेहमीच चर्चित असतात. यात झिम्बाब्बे हा देशदेखील अशा चर्चेत मागे नसतो. मुळातच अनेक समस्यांनी ग्रासलेला आणि इतर देशांच्या तुलनेत मागास राहिलेला हा देश सध्या निवडणुकांच्या चर्चेमुळे पुन्हा प्रकाशझोतात आला आहे. या निवडणुका प्रतिष्ठेच्या होण्याचे कारण म्हणजे देशाचे माजी राष्ट्रपती रॉबर्ट मुगाबे यांचा या निवडणुकांमध्ये सहभाग असणार नाही. १९८० साली दक्षिण ऱ्होडेशियापासून ‘झिम्बाब्बे’ होण्यास महत्त्वाचे योगदान देणारे व तेव्हापासून सतत ३७ वर्ष देशाची सत्ता उपभोगलेले मुगाबे यांना गेल्यावर्षी पक्षांतर्गत बंडाळी आणि लष्कराच्या उठावामुळे सत्तेतून पायउतार व्हावं लागलं होतं. देश स्वतंत्र झाल्यापासून मुगाबे व झिम्बाब्वे हे एक समीकरण तयार झालं होतं. त्यामुळेच सध्याच्या निवडणुकीत त्यांचा प्रत्यक्ष सहभाग नसला तरी त्यांना बेदखल करतादेखील येणार नाही. कारण त्यांना मानणारा आजही खूप मोठा जनसमाज येथे उपलब्ध आहे.

 

आपल्या लेखाचा विषय जरी झिम्बाब्वे निवडणुका असला तरी या गोष्टींची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी या सर्व गोष्टींचा संदर्भ समजून घेणे गरजेचे आहे. या बहुचर्चित आणि प्रतिष्ठित निवडणुकीमध्ये झानू-पीएफ आणि एमडीसी हे दोन पक्ष येथे एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत. मुगाबे यांच्या पक्षाचे म्हणजेच झानू-पीएफ या पक्षाचे उमेदवार व सध्याचे राष्ट्रपती इमरसन मनंगाग्वा व एमडीसी पक्षाचे नेल्सन चमीसा यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. विशेष म्हणजे मुगाबे यांनी काल देशातील जनतेला निवडणुकीपूर्वी उद्देशून केलेल्या भाषणात आपल्याच पक्षाचा उमेदवार मनंगाग्वा यांना विरोध दर्शवला आहे. त्यांनी म्हटले की, “मी स्वतः मनंगाग्वा यांना मतदान करणार नाही. तुम्हीही मतदान करायला याल तेव्हा, लोकशाही, स्वतंत्रता व संविधान सुरक्षिततेचा विचार करूनच मतदानाला बाहेर पडा आणि मगच मतदान करा. नाहीतर तुम्ही गेल्या नोव्हेंबरपासून ज्या सरकाराला झेलत आहात, त्यांनाच पुन्हा सत्तेवर पाहावं लागेल. हे बदलायला हवं म्हणून माझा संपूर्ण पाठिंबा आणि मत चमीसा यांनाच असणार आहे.”

 

मुगाबे यांचा आपणच स्थापन केलेल्या पक्षाविरुद्धचे बंड साहजिकच होते. कारण गेल्यावर्षी ज्यामुळे मुगाबे यांना राष्ट्रपतीपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं, त्यात त्यावेळी उपराष्ट्रपती असलेले मनंगाग्वा यांचा आणि त्यांच्या समर्थकांचा मोठा हात होता. दरम्यान, या निवडणुकीत सध्या राष्ट्रपती असलेले मनंगाग्वा यांनी नव्या झिम्बाब्वेची घोषणा दिली आहे. देशात असलेल्या मतदारांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक ३५ वर्षांखालील मतदार आहेत. हे मतदार बेरोजगार, गरिबीमुळे त्रस्त आहेत. याच नाराजीला धरून मनंगाग्वा यांनी, “आपण मिळून नवीन राष्ट्र निर्माण करू आणि आपल्या प्रिय देशाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेऊ,” अशी घोषणा केली आहे. सध्या जगात राष्ट्रभक्तीच्या आणि रोजगाराच्या मुद्द्यावर निवडणुका जिंकण्याचा ट्रेंड चालू असल्याने यात मनंगाग्वा याच दिशेने प्रचार करून स्वतःचे हात धुऊ पाहत आहेत, तर दुसरीकडे चमीसा हे जिंकले तर ते देशातील सर्वात तरुण राष्ट्रपती ठरणार आहेत. त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधताना म्हटले की, “हे सरकार आजपर्यंत देशाची दिशाभूल करत आले आहे. यामुळेच देशाची प्रगती खुंटली आहे.”

 

साडेपाच कोटी मतदार असलेल्या या देशातील जवळपास ३ कोटी मतदार हे युवा आहेत. हा युवावर्ग वर उल्लेखल्याप्रमाणे अनेक गोष्टींनी त्रस्त आहे. त्यांना सत्तापरिवर्तन हवं आहे आणि विशेष म्हणजे या निवडणुकीत चमीसा हे आजपर्यंतचे सर्वात तरुण उमेदवार आहेत. अशातच येथील लोकप्रिय चेहरा असलेले ९४ वर्षीय मुगाबे निवडणुकीच्या आदल्या दिवशी अचानक जनतेसमोर येऊन चमीसा यांना पाठिंबा देतात, याचा झिम्बाब्वेच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होतो? कोणाला फायदा होतो? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

- विजय डोळे

@@AUTHORINFO_V1@@