गुलाबाचे काटे कमळास काळ!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jul-2018
Total Views |
 
 

 
कमळाचं आता काही खरं नाही. कमळाच्या फुलानं आपला लाटेतील रूबाब आणि चिखलातील फुलोरा फुग्यात भरून गिरी पर्वतावरून दूर आकाशात सोडून दिला पाहिजे. कारण, त्याचं जळगावातील भवितव्य धोक्यातच आलं म्हणावं लागेल. ना कसला सुगंध ना कसला देखावा, तरी कशी या कमळाने लोकांना मोहिनी घातली कुणास ठाऊक. जळगाव नामक बाग फुलण्यासाठी आता म्हणे देवाधिदेव देवेंद्र २०० कोट देणार आहेत. खुद्द गिरी पर्वतावरूनच झाली ना आकाशवाणी. मग असेलही खरे. पण आता काय करायचे त्याचे? चार वर्ष राज्यात सत्ता या कमळाची, तरी जळगावची बाग फुलवता आली नाही. आता काय करणार? अहो...दस्तरखुद्द गुलाबरावांचे शब्दबाण हे. बाण कसले काटेच म्हणा गुलाबाचे. बापरे! काही खरे नाही कमळाचे आता. कमळाविरुद्ध गुलाबरावांनी शड्डू ठोकले आहेत. कसे होईल कमळाचे?
 
गिरीपर्वतावरून आकाशवाणीत सांगितले जाते की, आमच्या हाती सत्ता आल्यास जळगावचा चेहरा मोहरा बदलून टाकू. विधानसभेत कमळाची सत्ता पण जळगावात नाही. म्हणून सरकारला काम करण्यास अडचण येते. आता कसा विश्वास ठेवावा? सोलापूर, लातूर, पुणे व नाशिकला जरी विकासकामाचा पूर आला असला तरी जळगावला येईलच अशी काय खात्री? गुलाबराव काय वाईट बोलताहेत? चार वर्षापासून मोदी लाटेतील शांत गारेगार विकासरूपी जलाशयात कमळ बघा कसे टवटवीत झाले ते. पण काही चिंता आहे का जनतेची, जळगांवकरांची? काय केले या कमळाने जळगावसाठी सांगा बरे? विमानतळ सुरू केले, चारपदरी महामार्गाचं बांधकाम सुरू झालं, काही कोटी मंजूर करवून आणले आणि इतर छोटी-मोठी कामं केली असतील. याला काय विकास म्हणतात का? इतरांच्या विकासनाम्यात पाहा बरे, कसे मोठमोठे संकल्प केलेत त्यांनी. काम कशी करावी? मोठमोठी. जसं गटारी बांधणे, खड्डे बुजणे, दिवाबत्तीची सोय करणे, मुतार्‍या बांधणे, कचराकुंड्या ठेवणे वगैरे वगैरे. याला म्हणतात विकास. याला म्हणतात कामं. या कमळाबाईची कामं करायचीच दानत नाही खरे म्हणजे. अन् म्हणतात की आम्ही जळगावात कामं केली असती, पण काय तर जळगावात वाघांची सत्ता आहे म्हणे. वाघांना जीव भ्यातो. ही काय कारणं झालीत का? आता वाघ शिकार सोडून कमळाची फुलं खायला लागले की काय? निव्वळ मुर्ख समजते बुवा ही कमळगँग जनतेला. पण आता कमळालाही आता कळून चुकले असेल. जे कमळ सुगंध नसताना आणि एवढ्या चिखलात पसरलेले असताना जनतेला हवंहवंसं वाटतं. मग विकासपुरुष गुलाबराव का नाही वाटणार? आता तर गुलाबरावांस इतका राग आलाय की संतापाने लालबुंद झाले आहेत ते. त्यातच कमळाने काही गुलाबांची घरवापसी करून कमळात रूपांतर करवून घेतले. त्यामुळे संतापलेले गुलाब आपल्या शब्दवाणीरूपी अणीकुचीदार काट्यांनी कमळाला असे काही घायाळ करतील की कमळ आयुष्यात गुलाबाच्या वाटेला जाणार नाही.
 
जनताही यंदा गुलाबालाच आपलंसं करेल बघा. कारण गुलाबरावांनी सत्तेत नसतानाही गटारा बांधल्या, रस्त्यांची कामे केली आणि उद्यानासाठी प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. एवढी सारी कामे केल्यावर जनता बेहद खुश असेल. म्हणूनच जळगावच्या वाघांनीही आपल्या विकासनाम्यात गटारी, रस्ते, उद्यानांची आश्वासनं अंतर्भूत केली आहेत. असा हा प्रभाव गुलाबरावांचा. पण या सगळ्या लढाईत एकट्या गुलाबरावांचीच घड्याळातील सेकंद काट्याप्रमाणे काय ती धावपळ चालू आहे. मिनिट काटा गुंगलाय, तर तास काटा झोपी गेलाय. त्यांचं उद्बोधन करायला आपल्या संविधानाचे रक्षक आपल्या कामातून वळसा घेऊन घेऊन जळगावी दाखल होणार आहे. म्हणूनच कमळाचं काही खरं नाही. गुलाबाची संतापलेली तिक्ष्ण काटे कमळासाठी काळ ठरतील?
 
 
 
 
- कल्पेश गजानन जोशी
 
@@AUTHORINFO_V1@@