निकाल, निराशा आणि निराकरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jul-2018
Total Views |


 

 

आजची शिक्षणपद्धती ज्या पद्धतीने चालली आहे, ते पाहता अशा प्रकारचा ताण येणे साहजिकच आहे. या शिक्षणपद्धतीत जी जीवघेणी स्पर्धा आहे, त्यात आपला श्वास वाचवायची प्रत्येकाची धडपडच मनाला शॉक देऊन जाते.
 

आयुष्यात असे काही कसोटीचे क्षण असतात की, त्यावेळी आपला विश्वास एका आव्हानाच्या अंतिम टोकावर असतो. ते आव्हान आपल्याला पेलण्याची तीव्र ऊर्मी तर असतेच; पण ते पेलता नाही आले, तर आपली सत्त्वपरीक्षा असते. पूर्वीच्या काळी हे कसोटीचे क्षण कधी वैचारिक, तात्विक किंवा मूल्यसदृश असत. आज मात्र ते खूप ऐहिकच आहेत. असाच एक कसोटीचा क्षण आहे तो म्हणजे दहावी-बारावीचे निकाल. या निकालानंतर कित्येक जणांचाच ‘निकाल’ लागण्याची वेळ आलेली असते. खरे तर ही सत्त्वपरीक्षा पालकांचीही असते. खरे पाहता परीक्षेचा धसका आजच्या पालकांनीच घेतला आहे. हाच धसका मुलांमध्येपण परावर्तित झालेला आहे. याची अनेक कारणं आहेत. काही विवेकनिष्ठ आहेत, काही सामाजिक आहेत व काही केवळ भावनिक आहेत. जगण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे हे, सगळ्यांना माहिती आहे. त्यानुसार पुढे नोकरीची संधी वा कमवायची संधी मिळते. आताचे राहणीमान सामान्यांसाठी महागडे झालेले आहे. त्यानुसार जगायला तेवढी आर्थिक कुवत असलेली नोकरी आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षण आवश्यक आहे. आज शिक्षणच खूप महागडे झालेले आहे. शिक्षणासाठी आर्थिकसंचय करायचा, तर पालकांची कंबर खचायला लागते. कष्टातून पुरेसा पैसा मिळाला नाही, तर वेगळे भ्रष्टाचाराचे मार्ग काही पालक स्वीकारतात.

 

पण, या सगळ्या गोष्टींचा पालकांवर जबरदस्त मानसिक ताण येतो. गेल्या तीन-चार वर्षात मी काही माता आपल्या मुलांना व्यवस्थित मार्क मिळाले नाहीत किंवा ती नापास झाली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न करताना पाहिले आहे. स्त्रियांना मुलांच्या शैक्षणिक विकासाचे खूप प्रेशर येते खरे. इतर नातेवाईक सासू-सासरे व शेजारीपाजारी मुलांना कमी गुण मिळाले, तर ‘आईचे लक्ष कुठे होते?’ असा एक कालबाह्य प्रश्न आजही विचारतात. आपल्या बछड्याला गुण कमी मिळण्याचे दुःख मातेला असतेच, पण दुसऱ्या नी जरी काही नाही सुनावले तरी मनात मात्र एक अपराधी भावना असतेच. याशिवाय, वडिलांनी व आजकाल आईनेसुद्धा दिनरात कष्ट करून, महागड्या क्लासेसला घालून भरपूर पैसे ओतलेले असतात. त्यांना अपेक्षा असते की, पुढे मुलांनी टक्के चांगले मिळविले, तर कॉलेज चांगले मिळेल व पुन्हा उगाचच भरपूर पैसा ओतायला लागणार नाही. या सगळ्यांबरोबर इतर स्पर्धात्मक गोष्टी आल्याच. अशावेळी पालकांच्या व मुलांच्या भावना अनावर होतात. अनाहूतपणे पालक आपल्या मुलांना कडवटपणे अपमानित करतात. त्यांना ती ‘आपली मुले नसती तर बरे झाले असते, दगडं झाली असती तर बरे झाले असते, आता तुम्ही आयुष्यात काहीच करणार नाही, हमाली कराल किंवा भांडी घासाल,’ अशा प्रकारच्या वाक्बाणांनी घायाळ करतात.

 

हे सारे काळजाला घायाळ करणारे शब्द खरे. मुले आधीच दु:खी असतात. क्षमता असो वा नसो आपण किती कष्ट केले आहेत याची जाणीव असो वा नसो मुलांना मात्र गुणांची अपेक्षा असते. त्या आशेने ती जगत असतात. अशावेळी आपल्या मित्रमैत्रिणींपेक्षा आपल्याला कमी गुण मिळाले किंवा आपण नापास झालो आहोत, याचे दुःख त्यांना अधिक असते. दुखावलेल्या मनात स्वतः यश न मिळाल्याची जितकी खंत असते, तितकाच स्वतःवर प्रचंड रागही असतो. या सगळ्यांबरोबर स्वत:ची प्रतिमा खालवल्याची तगमग असते. याबरोबर आपले भविष्य कसे असेल, आपल्या मनातली महत्त्वाकांक्षा पुरी होईल का? अशा अनेक प्रश्नांनी गोंधळलेल्या मनाला खरे तर या कोमल मनाला याक्षणी गरज असते ती एका प्रेम सांत्वनाची. अशावेळी त्यांना स्नेहाची, धीराची ऊब देणे खूप आवश्यक आहे. याक्षणी जे काही कमी मिळवले आहे किंवा याक्षणी जे गमावले आहे ते कायमसाठी नाही, हे समजणे आवश्यक आहे.

 

- डॉ. शुभांगी पारकर

@@AUTHORINFO_V1@@