जळगावचे भविष्य कुणाच्या हाती?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jul-2018
Total Views |
 

 
जळगाव मनपा निवडणुकीला आता केवळ चार ते पाच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांचा प्रचार जोरदार सुरू आहे. एकमेकांवर होणार्‍या आरोपांची व टीका-टिपणीची राळ उठली आहे. कुणी विकासनामे प्रसिद्ध करतय तर कुणी कॉर्नर बैठका करण्यात गुंतलेय. पण या सगळ्याने मतदार खरच प्रभावित होईल का? २०१३ च्या निवडणुकात केवळ ५५ टक्के मतदान झाले होते. म्हणजे जवळजवळ अर्ध्या जळगाववासीयांनी मतदान करण्याकडे पाठ फिरवली होती. ज्यांनी मतदान केले त्यांच्यापैकीही काहींनी ‘नोटा’ (वरीलपैकी नाही) हा पर्याय निवडला होता. मग याचा अर्थ जळगावात मागची पाच वर्षे जे उमेदवार निवडून आले त्यांच्यावर जनतेला पूर्ण विश्वास होताच, असे म्हणता येणार नाही.
 
 
आजही जळगावातील बर्‍याच वॉर्डांमध्ये नगरसेवकांविषयी नाराजी नव्हे तर संताप व्यक्त होतोय. नगरसेवक निवडून आल्यानंतर पुन्हा वॉर्डात पाच पाच वर्षे उलटून जाईपर्यंत फिरकलेच नाहीत. त्यामुळे जनता प्रचंड नाराज झालीये. वॉर्ड क्र. ३ मधील वाढलेले घाणीचे साम्राज्य, तुंबलेले डबके, डुकरांचा व कुत्र्यांचा वावर रोगराईला आमंत्रण देत आहे. गटारीतील पाणी लोकांच्या घरात जाते. पावसाळ्यात तर जीणे हलाखीचे होत आहे. बहुदा एवढी घाण परिस्थिती असल्यामुळेच नगरसेवक महाशय फिरकत नसावे. पण ही समस्या मिटवणार कोण? मनपा कर्जाच्या ओझ्याखाली इतकी दबलीयेच, की तिला गावातील स्वच्छतेसाठीही उपाय योजता येणे अशक्य झाले आहे. त्यामुळे जळगावात नेमकी सत्ता कुणाची? घाणीची, दुर्गंधीची, अस्वच्छतेची की मनपाची? असा प्रश्न निर्माण झालाय. एवढेच नव्हे तर जनतेचा दिवसेंदिवस मनपावरून व नगरसेवकांवरून विश्वासही उडत चाललाय. त्यामुळे निवडणूक आयोग जरी मतदान वाढवण्यासाठी प्रयत्न करत असेल, तरी त्यांच्या हाती कितपत यश येणार आहे? हे काही सांगता येत नाही.
 
याचा अर्थ जळगावात लोकांना पक्षांशीही काही देणंघेणं नाही, तर लोकांना हवाय विकास. जो विकास करेल व जनतेच्या मागण्या पूर्ण करेल त्याला जनता निवडून देईल. पण नगरसेवक निवडणुकीच्याच वेळी उगवत असतील तर मतदाराला आमिष व प्रलोभनं दाखवून तरी काय उपयोग? आम्ही प्रचार करणार्‍यांना वॉर्डात पाय ठेवू देणार नाही, असे म्हणण्यापर्यंत लोकांची मजल जाते. यावरून लोकांच्या मनातील रोष प्रकट होतो. नगरसेवक जर आपापल्या वॉर्डातील जनतेशी चांगले नाते प्रस्थापित करू शकले तर जातीय समीकरणांची व निवडणुकीपूर्व आमिषांची गरजच भासणार नाही. पण ज्यांच्या मनातच जनसेवेचा भाव नाही, असे लोक निवडणुकीला उभे राहतात व खरे जनसेवक राजकारणापासून अलिप्त राहतात. म्हणूनच ही परिस्थिती उद्भवते. समाजातील सज्जन लोक राजकारणाला वाईट ठरवून मोकळे होतात. मग वाईट हेतू मनात बाळगलेल्यांना मोकळं रान मिळतं. आता हेच बघा ना, जळगावातील उमेदवारी मिळालेल्या ३०३ जणांपैकी २४ उमेदवार अशिक्षित आहेत, ही शोकाची बाब आहे. एवढेच काय तर तब्बल ८४ उमेदवार नववी व नववीच्या आतील शिक्षण घेतलेले आहेत. ४० जण दहावी तर ७७ उमेदवार बारावी उत्तीर्ण आहेत. यावरून आपण आकलन करू शकता की, जळगावचे भविष्य कुणाच्या हाती जाणार आहे. याचा अर्थ हा नाही की, जे कमी शिकलेले आहेत त्यांना संधी मिळू नये; तर प्रयत्न हा असला पाहिजे की जे उच्चशिक्षित आहेत त्यांनी राजकारणात उतरले पाहिजे. त्यामुळे आपण मत कोणास देतोय, याचा विचार जनतेने आधीच करून ठेवावा. नाहीतर निवडून आलेला नगरसेवक पुन्हा २०२३ लाच जनता जनार्दनाला दर्शन देईल. तेव्हा जळगावचे भविष्य जनतेच्या हातात आहे की, नगरसेवकांच्या हे मतदाराने लवकर ठरवले पाहिजे.
 
 
 
- कल्पेश गजानन जोशी
 
@@AUTHORINFO_V1@@