भरता खड्ड्यांवरचे ते व्रण...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jul-2018   
Total Views |



दादासाहेब बिल्होरेंचा १६ वर्षांचा प्रदीप २०१५ साली अंधेरीतील खड्ड्यांमुळे अपघातात दगावला पण, आपला तरणाबांड मुलगा गमावल्याचे दु:ख कसेबसे पचवून ते शांत बसले नाहीत. यामुळे त्यांच्या मुलाचा नाहक बळी गेला, पण इतर वाहनचालकांवर अशी दुर्देवी वेळ ओढवू नये म्हणून त्यांनीच स्वत: खड्डे भरायला सुरुवात केली. पालिकेच्या किंवा एमएमआरडीएच्या भरवशावर न बसता २०१५ पासून दादासाहेब खड्डे भरण्याचे काम अव्याहतपणे करत आहेत. या कामात त्यांना प्रदीपच्या मित्रांची तसेच इतर समविचारी मंडळींची साथही लाभली. नुकतेच त्यांचे ५०० पेक्षा जास्त खड्डे बुजवून झाले. हे उदाहरण ढिम्म प्रशासनासोबतच नागरिकांच्याही डोळ्यांत अंजन घालणारे आहे. कारण, ज्या वडिलांनी आपला तरुण मुलगा गमावला, तेच आता न खचता, इतरांचा जीव जाऊ नये म्हणून खड्ड्यांवर मातीची-रेतीची भर घालत हिंडतात. त्यांना कामधंदे नाही, दुसरा उद्योग नाही किंवा भरपूर पैसा पदरी आहे, म्हणून दादासाहेबांनी हा मार्ग निवडला नाही, तर केवळ आणि केवळ समाजभावनेपोटी ते रस्त्यावर उतरले. खड्ड्यांमुळे आपला मुलगा या जगात नाही, ही भावनाच त्यांना स्वस्थ बसू देईना पण, तरीही हे असहनीय दु:ख उगाळत न बसता, दादासाहेब समाजधर्माला सर्वार्थाने जागले. किमान, त्यांच्या या प्रयत्नांकडे बघून तरी ढिम्म प्रशासनाला पाझर फुटेल, अशी अपेक्षा होती परंतु, तसे अजिबात झाले नाही. त्यानंतरही असेच खड्ड्यांनी कित्येकांना गिळंकृत केले. पण, किमान एक सकारात्मक बाब म्हणजे, दादासाहेबांनी स्वखर्चाने भरलेले खड्डे किमान दहा दिवस तरी टिकतात आणि तेवढ्यापुरते का होईना, अपघात टळतात. मुंबईकरांचा जीव भांड्यात पडतो. आजचे मरण उद्यावर ढकलले जाते, म्हणूया हवं तर... खरं तर खड्डे भरणे-बुजविणे हे एकट्या माणसाचे किंवा नागरिकांचे काम नाहीच कारण, त्यासाठीची यंत्रणा, तंत्रज्ञान, साहित्य आपल्या पदरी नाही. पण, खेदाची गोष्ट हीच की, मुलाच्या मृत्यूनंतर सुतकातील त्याचे धीर गळलेले वडील सर्व ताकद एकवटून खड्डे भरताहेत, मात्र सुस्त प्रशासनाला आजही त्याचे सोयरेसुतक नाही. तेव्हा, यापुढे खड्ड्यांकडे दुर्लक्ष न करता, त्याची रीतसर तक्रार दाखल करा. त्याचा पाठपुरावा करा. तुम्हाला-आम्हाला खड्डे भरणे प्रत्यक्ष शक्य नसलं तरी ते हेल्पलाईन क्रमांकावरून, अॅपच्या माध्यमातून फोनवरूनच प्रशासनाला हलवून त्यांना जागे करूया; अन्यथा खड्डेबळी थांबणार नाहीत.

 

काटकसरी भारतीय पालक...

 

आधी घरच्यांसाठी, मग नव्या घरासाठी, त्यानंतर लग्नासाठी, लग्न झाल्यावर प्रसूतीसाठी, मग मूल झाल्यावर त्याच्या शिक्षणासाठी, ते मोठे झाल्यावर त्याच्या उच्च शिक्षणासाठी, पश्चात त्याच्या लग्नासाठी... असे अविरतपणे कमाईचे, कोणासाठी तरी काटकसरीचे भारतीय पालकांचे आर्थिक चक्र अव्याहतपणे सुरूच असते. या सगळ्या संसाराच्या रहाटगाड्यातून जर कुठे वेळ मिळाला, चार पदरचे पैसे वाचले, तर मग पालक आपल्या सुखाच्या, आनंदाच्या क्षणांचा विचार करतात. जवळपास बहुतांशी मध्यमवर्यीय भारतीय कुटुंबात कमी-अधिक प्रमाणात हेच चित्र. त्यातही बदलती जीवनशैली, महागाई आणि त्यासोबत वाढलेल्या उत्पन्नामुळे परिस्थिती थोडीफार पालटत असली तरी काटकसर ही मुळी आपणा भारतीयांच्या अगदी रक्तातच म्हणावी लागेल. भारतीयांच्या याच काटकसरीच्या, मुलांसाठीच्या अपार काळजीपोटी स्वसुखाच्या समर्पणाच्या भावनेवर आता एका जागतिक सर्वेक्षणातूनही शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात सहभागी ६० टक्के भारतीय पालकांनुसार, मुलांच्या शिक्षणासाठीच्या बचतीमुळे घराबाहेर सिनेमा पाहायला जाणे असो वा हॉटेलमधील ऊठसूठ खानपानावर बंधने येतात. त्याचबरोबर जवळपास ५० टक्के असे पालक आहेत, जे मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सुटीच्या दिवशीही काम करणे पसंत करतात. एवढेच नाही तर मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज घेण्याबाबतही भारतीय पालकच आघाडीवर आहेत. कारण, जवळपास ६४ टक्के भारतीय पालकांना मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज घ्यावी लागतात, तर जागतिक स्तरावर हे प्रमाण केवळ ३५ टक्के इतके आहे. खरंतर वरील निष्कर्ष सादर करायला तशी कुठल्याही अहवालाची गरज नाही. कारण, भारतीय हे आपल्या मुलांची जन्मभर काळजी घेण्यास समर्थ नसले तरी जबाबदारी झटकत नाही. पाश्चिमात्य देशात मूल १८ वर्षांचे झाले की, ते स्वातंत्र्य, स्वार्थ, स्वारस्य यांच्यात पुरते गुरफटून जाते. दिशाहीन भटकते. पण, भारतीय पालकांना त्यांची मुले वयाने कितीही मोठी झाली, सक्षम झाली तरी लहानच वाटतात. ही पालकत्वाची उदात्त-निरपेक्ष भावना भारतीयांव्यतिरिक्त कुणी समजूही शकत नाही. तेव्हा, भारतीय संस्कार, मूल्ये पुनश्च अधोरेखित करणारे हे सर्वेक्षण जरी असले तरी आपल्या कुटुंबाचे पाश्चात्त्यिकरण करणारीही कुटुंबे आहेतच. म्हणूनच, आपण सुखी अन काटकसरी व्हायचे की कोडगे केअरफ्री पालक, ते सर्वस्वी आपल्या पालनपोषणावरच निर्भर करते.

@@AUTHORINFO_V1@@