चैतन्यशक्ती (भाग-3)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jul-2018
Total Views |


 

 

आपण पाहिले की, पेशींनी बनलेला माणूस चैतन्यशक्ती शिवाय मृत आहे. या शक्ती शिवाय कुठलेही काम तो करू शकत नाही आणि जीवंतही राहू शकत नाही. ही चैतन्यशक्ती निरोगी व आजारी माणसात कशी कार्य करते ते आज आपण जाणून घेऊया...
 

निरोगी माणसात ही चैतन्यशक्ती सर्व शरीराचे कार्य ताब्यात ठेवण्याचे काम करते. शरीर हे पूर्णपणे चैतन्यशक्तीच्या जोरावरच काम करते. शरीराची सर्व कार्य जसे रक्‍ताभिसरण, श्‍वसन, हृदयाचे कार्य, पचनक्रिया, उत्सर्जन क्रिया आणि रोगप्रतिकारकशक्ती या सर्वांवर चैतन्यशक्तीचा ताबा असतो. ही शक्ती शरीरातील सर्व अवयवांच्या कार्याची व्यवस्थित सांगड घालून व एकत्रितरित्या चालू असते. हृदयाचे कार्य तसेच श्‍वसन क्रिया शिवाय पचनाचे कार्य हे व्यवस्थित सांगड घालून चालू असते. निरोगी माणसाला हे कळतदेखील नाही की, ही कार्ये शरीरात चालू आहेत. याशिवाय मन व शरीर यांच्यातील समतोल राखण्याचे कामही ही चैतन्यशक्ती करत असते. या समतोलामुळेच माणूस त्याचे आयुष्य नीट जगू शकतो व चांगल्याप्रकारे कार्य करू शकतो.  निरोगी माणसामध्ये चैतन्यशक्ती ही समतोल असल्यामुळे ती इतर आजारांपासून त्याचे रक्षण करत असते. रोगप्रतिकारकशक्तीला ही ऊर्जा पुरवत असते म्हणून बाहेरच्या रोगकारकशक्तींना आपले शरीर लगेच बळी पडत नाही.

 

आजारी माणूस

चैतन्यशक्ती ही भौतिक अस्तित्व नसलेली गतिशीलशक्ती आहे. जेव्हा माणूस कुठलीही अनुचित गोष्ट करतो म्हणजेच शारीरिक पातळीवर व मानसिक पातळीवर चुकीच्या गोष्टी करतो, तेव्हा या चैतन्यशक्तीच्या सुरळीत असलेला कामांमध्ये अडथळा येतो व ही चैतन्यशक्ती थोडीशी कमकुवत होते. मग अशा कमकुवत झालेल्या चैतन्यशक्तीच्या कामात अडथळा आल्यामुळे माणूस आजारी पडतो. शरीराची सुसूत्रता निघून जाते व याचा परिणाम म्हणून मग शरीर व पेशी काही लक्षणे व चिह्ने दाखवू लागतात. त्याला आपण ‘रोग झाला’ असे म्हणतो. सुरुवातीला जेव्हा ही लक्षणे व चिह्ने शरीरावर दिसू लागतात, त्यावेळी ही चैतन्यशक्ती प्रतिकार करू लागते. जर बाहेरील शक्ती आतील शक्तींपेक्षा कमकुवत असेल, तर शरीरातील चैतन्यशक्ती बाहेरील शक्तीला वरचढ ठरते व तिला शरीरात येण्यापासून रोखते व कुठलीही बाहेरची मदत म्हणजेच होमियोपॅथीचे औषध न घेताही आजार बरा होतो. पण, या प्रक्रियेत चैतन्यशक्तीचेही नुकसान होते व तिची बरीचशी ऊर्जा यात खर्च होते. परिणामी, माणसाला अशक्‍त वाटू लागते.

 

कधीकधी तर बाहेरील शक्ती शरीरातील चैतन्यशक्तीपेक्षा वरचढ ठरते व अशा वेळेस चैतन्यशक्ती हतबल होते. होमियोपॅथिक औषधं घेतल्याशिवाय मग चैतन्यशक्तीला जोर येत नाही. औषधांच्या मदतीने मात्र ती बाहेरील शक्तीला परतावून लावते व परत आरोग्य राखण्यास सुरुवात करते. होमियोपॅथीच्या योग्य औषधोपचारांमुळे चैतन्यशक्तीच्या ऊर्जेचा र्‍हास टळतो व रुग्णाचे जीवनही वाचते. काही जुनाट आजारांमध्ये, तर चैतन्यशक्ती अत्यंत कमकुवत असते, अशावेळी बराच काळ औषधे घेऊन या चैतन्यशक्तीला बरे करावे लागते पुढील भागात आपण अजून काही माहिती पाहू.

- डॉ.मंदार नि पाटकर

@@AUTHORINFO_V1@@