भावोजी आणि वाघ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jul-2018
Total Views |
 
 
पार्वतीभाभी घरातली काम उरकून नुकत्याच टीव्ही पाहत बसल्या होत्या. आणि टीव्हीवर पाहताय काय, तर ’होम मिनिस्टर’. म्हंटलं तर मालिका, म्हंटलं तर कार्यक्रम. पण पार्वतीभाभी नियमित न चुकता तो कार्यक्रम पाहतात. त्यासाठी आपली सगळीच कामं त्या उरकून घेतात. आजही पाहत होत्या आणि नेहमीसारख्या स्वप्नात गुंग झाल्या होत्या. ‘होम मिनिस्टर मधले आदेश बांदेकर आपल्या घरी काय आले. कॉलनीतल्या जोडप्यांसोबत त्यांनी खेळ खेळले. त्यात आपण जिंकलो. आपल्याला आदेश भावोजींच्या हस्ते पैठणी मिळाली आणि आपल्या नवर्‍याने आपल्याला मिठीत घेऊन उचलले. ‘बया बया बया. पार्वतीभाभींचं स्वप्न पुराण काही संपायचं नाव घेत नव्हतं. आपल्या गोड स्वप्नात त्या फार तल्लीन झाल्या होत्या.
 
तितक्यात त्यांच्या घराची डोअर बेल वाजली. मोठ्या अनिच्छेने पार्वतीभाभी दरवाजा उघडायला गेल्या आणि दार उघडून पाहता तो काय? आपल्या दारात चक्क होम मिनिस्टरवाले आदेश भावोजी! पार्वतीभाभींचा विश्वासच बसेना. त्यांना वाटले आपण स्वप्नातच आहोत. पण बाहेर खरंच आदेश बांदेकर उभे होते. सोबत शे-पन्नास भगवीधारी बाई-माणसं. ते पाहून जास्तच धक्का बसला भाभींना. भगव्या वस्त्रात आपले भावोजी दिसत आहेत, हे पाहून संन्यास बिन्यास घेणार की काय असे वाटले? भाभींच्या काळजात एकदम धस्स झालं. आपली होम मिनिस्टर मालिका कोण करणार मग? वहिनी, आपली निशाणी लक्षात ठेवा, व आपले अमूल्य मत आमच्या वाघांनाच द्या. आदेशसाहेबांचे बोल ऐकून भाभी भानावर आल्या. भाभींच्या डोक्यात उजेड पडला. त्यांच्या एव्हाना लक्षात आले होते की, भावोजी तर साक्षात व्याघ्र रुपात आले होते. आणि तेही मत मागायला. प्रचार करायला. पैठणीचं स्वप्न पाहणार्‍या भाभी नाराजच झाल्या. शिवाय भावोजी मत मागून घाईघाईत पुढल्या घरी निघून गेले. यामुळे भाभी जास्तच व्यथित झाल्या. भाभींनी पाहिलेले स्वप्न हवेतच विरून गेले.
 
काय भावोजी हे? तुम्हाला पाहून हर्षोल्हासीत होणारे लोक आणि विशेषत: महिला आपल्यावर नाराज होऊ लागल्या हे आश्चर्यच म्हणावं लागेल. पैठणी घेऊन येणारे लाडके भावोजी प्रथमच काही तरी मागायला आले. तुमच्याकडे पाहून देतीलही लोक मतं तुमच्या पक्षाला. पण शेवटी तुम्हीही आलात ते प्रलोभन दाखवायलाच ना. तुम्ही जळगाव मनपाचे उमेदवार असते, तर तुम्हाला भरभरून मतं दिलेही असते लोकांनी. पण तुम्ही पडलात मुंबईकर. जळगावची काळजी तुम्ही कशी करणार?
 
याबाबतीत केवळ भावोजींचाच विचार तो का व्हावा? प्रचारासाठी आपल्या मतदारसंघातील कामं सोडून जळगांवकडे धावा करणारी बरीच मंडळी आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचा लौकिकही असेल. पण म्हणून जळगावकरांनी त्यांचं का ऐकावं? मागच्या पाच वर्षात ज्यांना जळगांवकरांनी संधी दिली होती त्यांना भीती वाटते का जनतेला सामोरे जायला? ज्यांनी कालपर्यंत जळगांवमध्ये जनसेवा केली त्यांनी तर जनतेला हक्काने मत मागायला पाहिजे. पण बहुधा त्यांना भीती वाटतच असावी. कारण, त्याच नगरसेवकांचे पाठिराखे असलेलली राजकिय नेते मंडळी काल परवा रोटरीतर्फे आयोजित एका कार्यक्रमातून पळ काढत होते, हे सगळ्यांनीच पाहिलं. जनतेच्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे नव्हती. का नव्हती? आपल्याच पक्षातील निवडून दिलेल्या नगरसेवकांना त्यांच्या कामाबद्दल विचारणा करण्याचे धारिष्ट्य या तमाम ज्येष्ठ नेते मंडळींनी केले असते, तर अशी चालू कार्यक्रमातून पळून जायची वेळच आली नसती.
 
आदेशजी आपल्या भोवती बरीच गर्दी गोळा होती. तुम्ही लोकांना तुमच्या पक्षाला मत देण्याचं आवाहन केलं. काही लोक मतं देतीलही तुमच्यावरील प्रेमापोटी. परंतु उद्या तुमच्या पक्षाचे जे काही उमेदवार निवडून येतील त्यांनाही भेट द्यायला वेळ काढा. आज देणार्‍या आश्वासनांची पूर्ती झाली की नाही, याचा जाब विचारा. कारण आज ज्यांच्यासाठी तुम्ही मते मागता आहात, तेच उमेदवार उद्या जनतेची कामं करताना अपयशी ठरले तर त्याला जबाबदार कोण राहणार? तुम्ही आलात. जळगांव नगरी पावन झाली. तुम्हाला पहायला गर्दीही उसळली. पण ही गर्दी शिवसेनेच्या वाघाला पहायला गोळा झाली होती, की होम मिनिस्टरवाल्या लाडक्या भावोजींना? या प्रश्नाचे उत्तर आपणांस माहित असले पाहिजे. अन्यथा पार्वतीभाभींप्रमाणे तुमचाही भ्रमनिरास होईल.
 
 
 
 
 
- कल्पेश गजानन जोशी
Kavesh37yahoo.com
 
@@AUTHORINFO_V1@@